काही वर्षांपूर्वी एका वर्तमानपत्रात काम करत होतो. कामाचा भाग असलेल्या एका खेळाशी निगडित पत्रकार परिषदेला गेलो. फार मोठी बातमी होणारच नव्हती. पण निघता निघता एक गोष्ट जाणवली. संयोजकांनी राज्यभरातून आलेल्या स्पर्धकांना मामुली बक्षीस रक्कम देऊ केली होती. त्याचवेळी त्या परिषदेला आलेल्या पत्रकारांना मात्र किमती घड्याळं सदिच्छा भेट म्हणून देण्यात आली. हा विरोधाभास होता. सदिच्छाभेटी वाटायला पैसे आहेत पण मेहनत करून यश मिळवणाऱ्या मुला-मुलींना द्यायला पैसे नाहीत. एरव्ही स्पर्धा अमुक ठिकाणी आहे अशी संक्षिप्त बातमी झाली असती. पण त्या विरोधाभासाची बातमी दिली.
बातमी प्रसिद्ध झाली. भल्या सकाळी फोन आला. पत्रकारांचा दिवस उशिराच संपतो. त्यामुळे प्रातकाळी कंप पावणारा फोन शोधून डोळे चोळत कोणाचा फोन आहे ते पाहिलं. नाव झळकत होतं – करमरकर सर कॉलिंग. झटकन उठून कॉल घेतला. हॅलो सर म्हणताच, पलीकडून आवाज आला. झोपमोड केली का रे? तू नाही म्हणशील पण झोपमोड झालेय असं म्हणत हसले. चांगली बातमी केलीस असं ते म्हणाले. कानांवर विश्वासच बसेना. ज्या माणसाने खेळांसाठी आयुष्य वाहून घेतलं, खेळ प्रशासनातले अनेक घोटाळे बाहेर काढले, हल्ल्यांना पुरून उरले, कोणत्याही मोठ्या पदावरच्या व्यक्तीकडून चूक झाली असेल तर त्यांनी झोडपून काढलंय असा माणूस आपल्या बातमीचं कौतुक करतोय यावर विश्वास बसेना. मुलांना अशी तुटपुंजी बक्षीस रक्कम देऊन दुसरीकडे अय्याशी करण्याच्या नाठाळपणावर लिहिलंस ते बरं केलंस म्हणाले. सकाळ एकदमच प्रसन्न वाटू लागली. मूठभर मांस चढलं. त्या स्टोरीत अजून काय काय लिहिता आलं असतं हे ते सांगू लागले. त्या स्पर्धेचं अख्खं अर्थकारण त्यांनी उलगडून सांगितलं. स्पर्धेशी निगडित संघटकांची कुंडलीच मांडली. अशा स्पर्धा मुलांसाठी किती महत्त्वाच्या असतात ते समजावून सांगितलं. मुलं-पालक यांची मुंबईत राहायची व्यवस्था नसल्याने कसे हाल होतात. कुठून कुठून प्रवास करून ही मंडळी येतात ते सांगितलं. मी फक्त एक बातमी केली होती. त्यांनी त्या बातमीसंदर्भातले सगळे कोन समोर ठेवले. हे सांगताना कोणताही अहंभाव नव्हता. मला कसं सगळं माहितेय असा दावा नव्हता. क्रीडा पत्रकारितेत नवख्या मुलाच्या बातमीसाठी त्यांनी कॉल केला.
करमरकर सर आधारवड होते. ते खेळांचा चालता-बोलता कोश होते. खेळ कसा खेळला जातो इथपासून खेळांच्या प्रशासनापर्यंत सगळ्या बाजूंचा त्यांचा सखोल अभ्यास असे. हे सगळं एसी खोलीत बसून नाही. उन्हातान्हात, प्रवास करून स्पर्धांना जाऊन खेळाडू-प्रशिक्षक-संघटक-आयोजक यांच्याशी बोलून कमावलेली अधिकारवाणी होती. सत्तरी ओलांडल्यानंतरही सर अनेकदा पत्रकार परिषदांना येत. नव्या पत्रकारांची नेहमी विचारपूस करत. कोरडी औपचारिकता नसे. गाव कुठलं, आई-बाबा काय करतात, रोज किती वेळ प्रवास करावा लागतो, काय वाचतोस-काय पाहतोस, स्वत:ला फिट ठेवण्यासाठी काय करतोस, असं सगळं विचारत.
२००५ मध्ये माहितीचा अधिकार संमत झाला आणि पत्रकारांना अत्यावश्यक असणारी बरीच माहिती सहज मिळू लागली. पण करमरकर सर त्या आधी अनेक वर्षं कागदपत्रं खणून काढत. त्यांच्या लेखात खणखणीत डेटा असे. त्यांना कधी खुलासा द्यावा लागत नसे किंवा माघार घ्यावी लागत असे. करमरकर सरांनी हातांनी लिहिलेला लेख आमच्याकडे येत असे. तो लेख वाचल्यावर उद्या कोणाची नोकरी जाईल किंवा दणकून कारवाई होईल, असा जहाल मजकूर असे. पण सर नेहमी ठाम असत. लेख छापून आला की अक्षरक्ष: फटाके वाजू लागत. सरांचा लेख क्षेपणास्त्रासारखा विषयाचा वेध घेत असे. करमरकर सर आपल्या प्रत्येक शब्दासाठी अतिशय जागरूक असत. जागा नसल्यामुळे त्यांचा लेख छोटा करावा लागला, तर दुसऱ्या दिवशी त्यांचा ओरडा खावा लागत असे. जुन्या वळणाचं मराठी, छोटं फरांटेदार अक्षरातला त्यांचा लेख वाचताना आपण असं काम कधी करणार असं वाटायचं.
इंटरनेट नसताच्या काळात ते इतकी माहिती कुठून काढत असतील याचं कुतूहल वाटायचं. संघटनेतल्या लोकांनाही अचंबा वाटेल असे तपशील त्यांच्याकडे असायचे. संघटनेच्या अध्यक्षापासून हाऊसकीपिंगच्या माणसापर्यंत प्रत्येकाशी त्यांचे ऋणानुबंध असायचे. एखाद्या स्पर्धेला करमरकर सर येणार म्हटल्यावर आयोजकांची पळापळ उडत असे. काय नेमका प्रश्न विचारतील आणि पितळ उघडं पाडतील याची आयोजकांना धास्ती असे. आमच्या वेळी असं होतं, नवीन पिढीचं काही खरं नाही असं ते कधीच बोलत नसत. उलट नवीन मुलांबद्दल त्यांना विशेष आत्मीयता होती. नवीन मुलांना अधिकाधिक ठिकाणी जाता यावं यासाठी ते प्रयत्नशील असत. संघटकांशी बोलून एखाद्या स्पर्धेला चार-पाच पत्रकारांना वृत्तांकनासाठी नेता येऊ शकेल का यासाठी ते पुढाकार घेत. फिल्डवर दिसत नाही यासाठी अनेकदा नवीन मुलांना झापत असत. तुम्ही मैदानावर गेलात नाहीत, खेळाडू कसा घडतोय ते पाहिलं नाहीत तर तुम्ही काय लिहिणार असं सवाल करत. खेळाचे नियम त्यांना तोंडपाठ असत. त्या खेळात आंतरराष्ट्रीय पातळीवर काय चाललंय याचीही चोख माहिती त्यांच्याकडे असे. सरांचं घर म्हणजे वर्तमानपत्रं, मासिकं, पाक्षिकं यांची अजस्र गुहाच होती. त्यांच्या जाण्याने मराठी क्रीडा पत्रकारितेचा आधारवडच निखळला आहे.
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…
निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन - वन मंत्री गणेश नाईक मुंबई : कोकणातील फळबागा आणि…
गागोदे खुर्द अनुसूचित जातीसाठी, १४ ग्रामपंचायतीत आदिवासी सरपंच पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत…
राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…