मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात मुंबई, ठाणे, भिवंडी नाशिक, कोकणासह ठिकठिकाणी होळी रंगपंचमीचा सण अर्थात धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कोरोनानंतर होळीची धूम सर्वत्रच धामधुमीत साजरी होताना रंगांचे आविष्कार, गाणी, त्यातच पावसाचे आगमनाने चिंब होत होळी, रंगपंचमीचा उत्साह लहानांपासून थोरांपर्यंत वाखाणण्याजोगा दिसून आला.
भिवंडी शहर व ग्रामीण भागात सोमवारी रात्री होळीनिमित्त ठिकठिकाणी होलिका दहन झाले. याशिवाय ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये एक गाव एक होळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच वडघर ग्राम पंचायतीच्या वतीने होळी निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक लहान मुलांनी या नृत्य स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्याचबरोबर नवीन लग्न झालेल्या गावातील मुली व जावयांचा सन्मान देखील या निमित्त वडघर ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमासाठी गावातील शेकडो नागरिक व महिलांनी हजेरी लावली होती.
मुंबईमध्ये जुहू चौपाटीवर मोठ्या प्रमाणात होळी साजरी करणाऱ्यांची संख्या पाहायला मिळाली. मुंबईसह उपनगरातून मोठ्या प्रमाणात तरुण अनेक कुटुंब जुहू चौपाटीला होळी साजरी करण्यासाठी एकत्र आल्याचे पाहायला मिळाली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ठाणे निवासस्थानी धुळवड साजरी केली. सहकुटुंब आणि शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.