- अर्थभूमी: उमेश कुलकर्णी
माणसाला नेहमीच मिळतो त्यापेक्षा जास्त पैसा हवा असतो आणि त्यात काही गैर नाही जोपर्यंत त्याचे मार्ग इमानदारीने पूर्णपणे व्याप्त असतात. पूर्वी मुंबई जेव्हा गिरणी कामगारांची होती, तेव्हा पगार झाल्यावर बराचसा गिरणी कामगारवर्ग हा मटका लावायचा. रतन खत्री याचे तेव्हा राज्य चालायचे. तेव्हाही गिरणी कामगारांचे पगारात भागत नव्हते तेव्हा ते मटकाकडे वळले. शेअर बाजार हा कितीही कायदेशीर असला आणि त्यावर सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड या नियामकाची सत्ता असली तरीही तोही एक प्रकारे जुगारच आहे, हे निर्विवाद आहे. अनेकांना मी म्हणतो ते पटणार नाही. पण वास्तव हे आहे की, शेअर बाजारातील आपले भाग्य आपले नशीब किंवा आपली हुषारी ठरवतच नाही. ते ठरवतात काही शेअर बाजारातील मूठभर लोक ज्यांना अनेक नावे आहेत. त्यात मॅनिप्युलेटर्स आहेत तसे काही मोजक्या बड्या कंपन्या आहेत. काही बड्या कंपन्या शेअर्स मुद्दाम घाऊक प्रमाणात घेऊन त्यांचे भाव चढवतात किंवा मुद्दाम मोठ्या प्रमाणावर ते विकून टाकून उतरवतात.
सामान्य शेअरबाजारातील ग्राहकाचा घाटा होतो. तसे तर हे गणित समजायला खूप अवघड आहे. आपला कष्ट करून कमावलेला पैसा गेला, हे कळल्यावर आपण शुद्धीवर येतो तेव्हा आपली बरीचशी संपत्ती भलत्याच कुणाच्या तरी घशात गेलेली असते. अशाच एका घोटाळ्याचा पर्दाफाश खुद्द सेबीनेच केला आहे. शेअर बाजारात अशीच एक योजना आहे पंप अँड डंप. पंप म्हणजे शेअर्स खरेदी करणे आणि डंप म्हणजे भाव वाढल्यावर ते अचानक विकून टाकणे. हा एक प्रकारचा फसवाफसवीचा प्रकार होता आणि त्यात गुंतले होते यूट्युबर ज्यांनी काही ठरावीक शेअर्सबद्दल खोटी माहिती देणारे व्हीडिओ सतत अपलोड केले. त्यातून ग्राहक फसले आणि या प्रकारातून शेअर्स डंप करणाऱ्यांची चांदी झाली. या घोटाळ्यातील आरोपी बॉलिवुडचा लोकप्रिय स्टार अर्शद वारसी आणि त्याची पत्नी मारिया गोरेट्टी हे दोघे होते. त्यांनी या पंप अँड डंप घोटाळ्यातून कित्येक कोटींची अगदी क्षुल्लक रकमेतून कमाई केली. ही योजना म्हणजे शेअर्स खरेदी करून त्याची किमत कृत्रिमरीत्या वाढवायची आणि नंतर स्वतःला भरपूर फायदा झाला की ते शेअर्स विकून टाकायचे. यात ज्यांनी त्याच कंपनीचे शेअर्स खरेदी केले असतात ते देशोधडीला लागतात. अर्शद वारसी आणि त्याच्या पत्नीने साधना ब्रॉडकास्ट आणि शार्पलाइन ब्रॉडकास्ट या कंपन्यांचे शेअर्सबद्दल चुकीची माहिती देणारे व्हीडिओ अपलोड केले. त्यात मनीष नावाचा कुणी आणखी एक यूट्यूबर होता त्याने दोन शेअर्सबद्दल माहिती देणाऱ्या
यूट्यूब वाहिन्या चालवल्या होत्या. त्यांनी खोटा प्रचार केला आणि त्यामुळे वरील दोन्ही कंपन्यांच्या शेअर्सच्या भावात प्रचंड वाढ झाली. त्यानंतर वारसी आणि गोरेट्टीने ते शेअर्स भरपूर नफा घेऊन विकून टाकले.
या कंपन्यांच्या शेअर्सची किमत दोन रुपयांपासून पाच रुपयांपर्यंत होती, ती अचानक तीनशे रुपयांपर्यंत गेली. कारण जे व्हीडिओ अपलोड केले त्यात अदानी समूह यापैकी एका कंपनीचे टेकओव्हर करणार आहे, अशीही माहिती दिली होती. हा साराच बनवाबनवीचा प्रकार होता. पण लोक सामान्यतः अशा बातम्यांची खातरजमा करत नाहीत. त्यामुळे या शेअर्सची खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली आणि या मॅनिप्युलेटर्स म्हणजे बेईमान लोकांमुळे हजारो ग्राहक तोंडघशी पडले. सेबीने या प्रकरणी कारवाई केली असून अर्शद वारसी आणि त्याच्या पत्नीला शेअर बाजारात व्यवहार करण्यास बंदी घातली आहे. अर्थात वारसीनेही सर्व आरोपींप्रमाणेच आपल्याला शेअर बाजारातील काहीच कळत नाही, असे म्हणत स्वतः किती निर्दोष आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पण यात सेबीचे मात्र कौतुक करावे लागेल की, सेबीने जास्त वेळ न दवडता कारवाई केली. पण सेबीची नाचक्की यातून भरपूर झाली. जेव्हा शेअर्समधून भरपूर कमाई झाली आहे असे वारसी आणि त्याच्या साथीदारांना कळले तेव्हा त्यांनी शेअर्स विकून टाकले आणि गुंतवणूकदारांचा पैसा गेला. याला सेबीने फसवणुकीची योजना असे म्हटले असून त्यात गुंतवणूकदार निव्वळच मूर्ख बनवले जातात. अर्थात शेअर बाजारात हा काही पहिलाच प्रकार नाही की गुंतवणूकदारांना सर्वस्व गमवावे लागले आहे. पण केवळ बॉलिवूड स्टार त्यात गुंतला आहे म्हणून त्याच्या ग्लॅमरच्या भागावरच लक्ष केंद्रित न करता सेबीने अशा प्रकारांना जबाबदार असलेल्यांवर कठोरातील कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. यात अर्शद वारसी आणि त्याच्या पत्नीची भूमिका ही व्हॉल्युम क्रिएटरची होती. काही महिन्यांपूर्वी असाच एक प्रकार झाला होता. त्यात तर एनएसई म्हणजे नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा सुब्रमण्यम या गुंतल्या होत्या. त्यांनी शेअर बाजारातील व्यवहार जेथे चालतात तेथील मुख्य संगणक सर्व्हरजवळ आपली यंत्रणा बसवून त्यांच्यामार्फत गुंतवणूकदारांना शेअर्स कोणते चढणार आहेत, याची आगाऊ माहिती देत होत्या. त्यातून त्यांनी किती पैसा मिळवला, याची चौकशी सुरू आहे. पण सगळा शेअर बाजार हा फसवणूक नाही. पूर्ण खबरदारी घेऊन आणि अभ्यास करून त्यात उतरले की पैसाही
मिळतो आणि तो कायदेशीर असतो. संपूर्ण अभ्यास करून शेअर बाजारात उतरा, कोणत्याही परिस्थितीत कुणी दिलेल्या टिप्सवर पैसा गुंतवू नका.