- मुंबई डॉट कॉम: अल्पेश म्हात्रे
होळी रे होळी पुरणाची पोळी… अशी आरोळी ठोकत दरवर्षी आपण लाकडे जाळून त्यांची विधिवत पूजा करून होळी हा सण साजरा करतो, त्यानंतर रंगपंचमीही आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. आपल्या राज्यात वेगवेगळ्या प्रांतीय रचनेनुसार होळी साजरी केली जाते, मात्र कोकणात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, दरवर्षी पर्यावरणवाद्यांकडून होळीनिमित्त प्रदूषण होत असल्याची बोंबाबोब मोठ्या प्रमाणात होते, तसेच धूलिवंदनाच्या दिवशीही पाण्याचा मोठा अपव्यय होतो, म्हणून या सणावरच काही घटकांकडून टीका होत असते.रंगपंचमी साजरी करताना तर रासायनिक रंगांची उधळण केली जाते. यावरही बऱ्याच प्रमाणावर मतं-मतांतरे आढळतात. पण खरंच असे असते का? होळी ही खरंच प्रदूषणविरहित साजरी करता येऊ शकते का?
मुळात होळी हा सण का साजरा करतात हे जाणून घेतले पाहिजे. होळी हा सण आपल्या संपूर्ण देशभर साजरा केला जातो. बहुतेक ठिकाणी लोक एकमेकांना रंग लावून हा सण अगदी मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करतात. काही ठिकाणी रंगांऐवजी फुलांचा देखील वापर केला जातो. बरेचशे लोक आपल्या घराची साफ-सफाई देखील करतात. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी या दिवशी लोक रात्री झाडांची लाकडे, गौऱ्या यांना एकत्रित करून त्याचे दहन करतात. यामागे असे कारण सांगितले जाते की, ज्याप्रमाणे वाईट प्रवृत्तीची होलिका या अग्नीमध्ये जळून नष्ट झाली, त्याचप्रमाणे वाईट विचार, वाईट गोष्टी यांचा त्याग करून आपले जीवन अधिक सुख-समाधानाचे बनवणे, असा आहे. ज्यावेळी होळी हा सण असतो, त्यावेळी हिवाळा नुकताच संपलेला असतो आणि उन्हाळा सुरू होण्याचा प्रारंभ असतो या काळात आपल्याला थोडासा थकवा आल्यासारखे वाटते. हिवाळा संपून उन्हाळा सुरू होण्याच्या बदलाला आपल्या शरीराने देखील स्वीकारावे, यासाठी देखील होळी हा सण साजरा केला जातो. कारण होळी दहनामुळे आपल्या शरीराला एक प्रकारची उष्णता व चैतन्य प्राप्त होत असते. होलिका शब्दावरूनच होळी या नावाची सुरुवात झाली, असे म्हणतात. होळीचा सण मुख्य स्वरूपात भारतात आर्याव्रत लोकांकडून साजरा केला जातो; परंतु त्याच्यामागे देखील एक मोठं कारण आहे. ते कारण म्हणजे होळी हा उत्सव फक्त रंगांचा नव्हे तर प्रेमाचा आणि आपुलकीचा देखील आहे. जसं आपण होळीत रंग खेळताना विविध रंगांचा वापर करतो, तसाच आपण समाजात राहून सगळ्यांशी प्रेमाने व आपुलकीने राहिले पाहिजे, अशी शिकवण देतो. मग अशा या वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने साजरा केल्या जाणाऱ्या होळी सणावर आक्षेप का घेतला जातो. प्रत्येक गोष्टीची एक बाजू असते, तर दुसरी बाजूही असतेच की. सध्या व्यावसायिक कारणामुळे होळीला काही घटकांकडून विकृत रूप दिले जात आहे. मागच्या काही वर्षांमध्ये या सणामध्ये शिरलेल्या अपप्रवृत्तींमुळे या सणाचे पावित्र्य लोप पाऊ लागले आहे. होळीचे निमित्त करून प्रचंड प्रमाणात वृक्षतोड केली जाते, होळीच्या आधीपासूनच काही दिवसांपासून इमारतींच्या टेरेसमधून, बस गाड्या रेल्वे गाड्यांवर व येणाऱ्या-जाणाऱ्यांवर पाण्याने भरलेले फुगे, दूषित पाण्याचे फुगे, प्लास्टिक पिशव्या फेकून मारल्या जातात, यामध्ये महिलांना मोठ्या प्रमाणात लक्ष्य केले जाते. केवळ फुगे मारल्यामुळे दरवर्षी कितीतरी लोकांना आपले डोळे गमवावे लागतात, तर कित्येक लोक अपंग बनतात, आपले जुने वैमनस्य काढण्यासाठी इतरांच्या वस्तू चोरून त्या होळीत स्वाहा केल्या जातात, धूलिवंदनाच्या दिवशी तर रस्त्यारस्त्यांवर कहरच पाहायला मिळतो. होळी या सणाला काही ठिकाणी पारंपरिक प्रथेप्रमाणे भांग प्यायला मिळते, मात्र दुसरीकडे या परंपरेचा आधार घेऊन दारू प्रचंड प्रमाणात रिचवली जाते, यामुळे या चांगल्या सणाला विकृतीचे रूप येते, या दिवशी रासायनिक रंगांचा वारेमाप वापर होतो त्यामुळे त्वचेचे विकार होतात, तसेच ओळख असो वा नसो महिलांना मुद्दामहून रंग लावले जातात. रंग फासताना महिलांचे विनयभंग केले जातात, काही ठिकाणी नासकी अंडी फेकून मारली जातात. रंगपंचमीच्या दिवशी मद्यपान करून रस्त्यारस्त्यांवर धुडगूस घातला जातो. महिलांना पाहून अश्लील शेरेबाजी केली जाते, लोकांकडून जबरदस्तीने पैसे उकळले जातात. प्रत्येक सण आणि उत्सव यामागे लोककल्याणाचा आणि सामाजिक एकोप्याचा उदात्त हेतू दडलेला असतो, मात्र होळीसारख्या सणाला सध्या लाभलेले ओंगळलेले स्वरूप पाहता आपणच या सणाची अवहेलना तर करत नाही ना याचाही आपण आता विचार करण्याची वेळा आली आहे.
आता आपणही निर्धार केला पाहिजे की आम्ही आमचे सण साजरे करू पण पर्यावरणाचे भान राखूनच खेळू. होळी साजरी करताना, आनंद घेताना पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे. एका दिवसाच्या आनंदासाठी हजारो लिटर पाणी वाया घालवावे लागते. एकीकडे जनावरांनाही तसेच शेतीला पाणी मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत व दुसरीकडे आपण क्षणिक आनंदासाठी लाखो लिटर पाणी वाया घालवत आहोत. आपणही त्याच समाजाचा भाग आहोत, याचे भान ठेवण्याची आपणास गरज आहे. होळी म्हणजे रंगांचा सण. त्यानिमित्त सर्वांनी एकत्र येऊन रंगांची उधळण आपण केलीच पाहिजे, परंपरा जपत होळी नक्की बांधलीच पाहिजे; पण त्यासाठी वृक्षतोड करण्याचे सर्वांनीच टाळले पाहिजे. नुकतीच मुंबई महापालिकेनेही होळी या सणास वृक्षतोड करणाऱ्यास जबरी आर्थिक दंड बसवण्याचे घोषित केले आहे. ते टाळण्यासाठी झाडाच्या लाकडांना पर्याय म्हणजे टाकाऊ पदार्थांची होळी करा.
ग्रामीण भागातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करून शक्य तितक्या सुक्या आणि इकोफ्रेंडली रंगांनी होळी खेळण्याची आज गरज आहे. रंगपंचमी खेळताना आजूबाजूच्या मुक्या प्राण्यांची काळजी घेणेही गरजेचे असते. तुम्ही आनंद घेत असताना त्यांच्या अंगावर रंग टाकून त्यांना विद्रूप करू नका. रंग अनेक दिवस तसेच राहत असल्याने प्राण्यांना त्वचेचे रोग होऊ शकतात. आपल्या समुद्रकिनाऱ्यांवर पडणारा प्लास्टिकचा खच टाळण्यासाठी होळी ही इकोफ्रेंडली खेळून तिचा आनंद आपण घेतला पाहिजे, याच गोष्टी पाहून आपली पुढील पिढीही त्याचे अनुकरण करेल. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा आपल्या देशाला होळीनिमित्त दरवर्षी आवाहन करत असतात की, होळी सण साजरा करा, आपल्या धर्माचे, संस्कृतीचे पालन करा, त्याचबरोबर निसर्गाचेही रक्षण करा व पुढील पिढीसमोर एक आदर्श निर्माण करा. चला तर आता आपणही होळी पेटवू, रंगपंचमी साजरी करू पण निसर्गाचे रक्षण करूनच, हो पुढील वेळी जर कोणी आपल्याला रंग लावलाच तर आपण ही त्याच्यावर न रागावता, उलट त्याच्याबरोबर आनंदाने रंगपंचमी साजरी करूयात कारण त्याच्यामुळेच आपल्या धर्माचे व संस्कृतीचे खऱ्या अर्थाने रक्षण झाले आहे, ही जाणीव ठेवूया.