काँग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेमुळे खूप लोकप्रिय झाले आहेत, असा एक समज काँग्रेसवाल्यांच्या मनात आहे. तो किती पोकळ होता, ते त्रिपुरासह तीन राज्यांतील निवडणुकांतील निकालांवरून देशाने अनुभवलेच आहे. ईशान्य भारतातून काँग्रेस नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आणि एका मूठभर कसबा मतदारसंघात भाजपचा पराभव झाल्यावर शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यालाही देशात बदलाचे वारे वाहत असल्याचा भ्रम होत आहे. ते असो. पण राहुल गांधी यांचा बालिशपणा इतका की, त्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारवर देशात रोजच्या टीकेचा रतीब लावला असतानाच आता इंग्लंडमध्ये म्हणजे केंब्रिज विद्यापीठात देशात सरकार कसा अन्याय-अत्याचार करत आहे, लोकशाहीचा गळा घोटत आहे आणि विरोधी पक्षांचा आवाज दाबून टाकत आहे, वगैरे नेहमीचीच रेकॉर्ड लावली आहे. शिवाय त्यांनी न्यायव्यवस्थेवर भाजपचा कब्जा आहे असाही एक आरोप लावला आहे. ज्यावेळी न्यायालयाने मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्तीसाठी तीन सदस्याची समिती नेमण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला, त्यावेळी असे आरोप करणे हास्यास्पद नव्हे, तर अज्ञानीपणाचे लक्षण आहे. अर्थात परदेशी भूमीवर भारतातील मोदी सरकारवर आगपाखड करण्याचा राहुल यांचा हा पहिलाच प्रकार मात्र नव्हे. त्यांनी आतापर्यंत सात वेळा अशी परदेशातील भूमीवरून भाजप सरकारवर बिनबुडाचे आरोप केले आहेत. राहुल विसरतात की त्यांच्या आजीने म्हणजे इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात विरोधकांवर कसे अत्याचार केले होते. अनेकांना विनाचौकशी तुरुंगात डांबले होते आणि त्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा वापर केला होता. इंदिरा गांधी जेव्हा वृत्तपत्रांच्या कार्यालयात आपल्या माहिती आणि प्रसारण खात्याचे अडाणी अधिकारी घुसवत होत्या आणि त्यावेळी अनेक वर्तमानपत्रांनी सरकारचा निषेध म्हणून अग्रलेखांची जागा कोरी ठेवली होती, त्यावेळी राहुल कदाचित शाळेत जात असतील. पूर्वी कोणतीही अप्रिय घटना घडली की, परकीय हात असल्याचा आरोप होत असे. पण आता परकीय भूमीवरच जाऊन भारतातील सरकारवर काँग्रेसचे नेते आरोप करू लागले आहेत.
राहुल अशा पहिल्या पंतप्रधानांचे चिरंजीव आहेत ज्यांच्यावर बोफोर्स प्रकरणात दलाली खाल्ल्याचा आरोप लावला होता आणि त्याच प्रकरणात त्यांची सत्ता गेली होती. दलाली प्रकरणाची चौकशी स्वीडनचे पंतप्रधान ओलोफ पाल्मे यांनी सुरू केली तेव्हा खुद्द राजीव यांनी स्वीडिश अधिकाऱ्यांना फोन करून चौकशी थांबवण्यासाठी दबाव आणला होता. भारत आज गुंतवणुकीच्या दृष्टीने सर्वात आकर्षक स्थळ आहे. पण राहुल यांच्या आरोपांमुळे भारतातील गुंतवणुकीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्यांचे आरोप हे बालिश नेत्याचे आरोप म्हणून इतक्यावर सोडून देता येण्यासारखे नाहीत. राहुल जेव्हा संसदेत आम्हाला बोलू देत नाहीत, अशी लहान मुलासारखी तक्रार परदेशात करतात. पण संसद अधिवेशन सुरू असताना ते संसदेत उपस्थित राहातच नाहीत. ते कुठे मोर्चे काढ किंवा बैलगाडी घेऊन संसदेत ये, असले स्टंट करत असतात. जेव्हा मोदी यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करण्याची संधी असते तेव्हा वर्ग बुडवणाऱ्या विद्यार्थ्यासारखे ते बाहेर असतात. त्यांच्या अशा करण्याने कार्यकर्त्यांचाही हिरमोड होतो आणि त्यांचा उत्साह ढासळतो. राहुल यांना कदाचित हेच अभिप्रेत असावे. वास्तविक भाजपने राहुल गांधी यांचे उपकारच मानायला हवेत. कारण त्यांनी असेच आरोप करून भाजपला त्यांच्यावर हल्ला चढवण्याची एक संधीच दिली आहे. भाजपने राहुल यांच्यावर परदेशाच्या संस्थेच्या पेरोलवर आहेत की काय, अशी शंका उपस्थित करण्याची संधी घेऊन जोरदार हल्ला चढवला आहे. राहुल यांनी आपल्या फोनमध्ये पेगासस या इस्रायली स्पायवेअर घुसल्याचा आरोप केला आहे. राजीव गांधी यांनीही चंद्रशेखर सरकार पाडण्यासाठी आपल्यावर पाळत ठेवली जात आहे, असेच कारण शोधले होते. पण तेव्हा काँग्रेसकडे सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याइतपत लोकसभेच्या जागा तरी होत्या.
आज काँग्रेसची अवस्था पाहिली तर त्यांना धड विरोधी नेतेपद घेण्याइतक्याही जागा नाहीत. तरीही असे आरोप करून राहुल यांना आपल्याला अजूनही महत्त्व आहे, हेच तर सांगायचे असावे. राहुल यांनी ज्या पाच प्रमुख बाबी भारतीय लोकशाहीवरील हल्ल्यासंदर्भात दिल्या आहेत, त्या पाचही बाबी आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांच्याबाबत अगदी तंतोतंत जुळणाऱ्या आहेत. विरोधकांची टेहळणी, माध्यमे आणि न्यायव्यवस्थेवर नियंत्रण वगैरे वास्तव चित्र होते. गांधी घराण्याच्या बाहेरच्या व्यक्तीने वरील आरोप केले, तर भाजपला उत्तर देण्यासाठी जरा तरी डोकेफोड करावी लागेल. पण राहुल यांच्यासाठी भाजपला जराही विचार करावा लागत नाही. विरोधकांचा आवाज दडपून टाकण्याचा आरोप मोदी यांच्यावर राहुल करतात, तेव्हा त्यांनी अगदी फार पूर्वी नाही, तर आठ महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार विरोधकांची कशी मुस्कटदाबी करत होते, त्यावर मौन पाळले होते, हे आठवावे. त्या काळात महाविकास आघाडीचे सरकार कोणत्या लोकशाहीचे देदीप्यमान प्रदर्शन करत होते? त्या सरकारमध्ये काँग्रेसचा सहभाग होता. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावरून उठवण्याची ठाकरे सरकारची मजल गेली होती. कंगना राणावतचे घर तोडले आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांना खोट्या प्रकरणात अटक केली होती. तेव्हा राहुल यांना लोकशाहीची गळचेपी का दिसली नाही, असे विचारले तर राहुल यांच्याकडे काही उत्तर आहे का?
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…