साप्ताहिक (Horoscope) राशिभविष्य, दि. ५ ते ११ मार्च २०२३
 |
नवीन संधी मिळतील
मेष – हा कालावधी आपणास अत्यंत चांगला आहे. उद्योगातून आणि इतर धंद्यातून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. नवीन संधी चालून येणार आहे. पालकांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. दूरचे प्रवास संभवतात. परीक्षेत यश मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा उंचावणे या काळात घडणार आहे. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. विपरित परिस्थिती समोर आली तरी आपण आत्मविश्वासाने सामोरे जाणार आहात. कुटुंबामध्ये शुभवार्ता मिळतील. प्रगती होईल. कुटुंबामधील तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येऊन त्यांना दिलासा मिळेल. सहकुटुंब-सहपरिवार धार्मिक ठिकाणी प्रवास कराल. |
|
नैराश्य जाईल
वृषभ – आपल्या अपेक्षेनुसार आपली कामे पार पाडण्यात यश मिळेल. अपेक्षापूर्ती होईल. बरेच दिवस एखादे महत्त्वाचे काम होण्याची आपण वाट पाहत होता, असे कार्य पूर्ण झाल्यामुळे उत्साहात व आनंदात वृद्धी होईल. मात्र कोणत्याही बाबतीत अतिरेक टाळा. थोड्या संयमाने शत्रूवर विजय प्राप्त करता येईल. मानपानाची प्रसंग येऊ शकतात. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करा. नैराश्य जाईल. कुटुंब-परिवारात सुवार्ता मिळून वैयक्तिक भाग्योदय होईल. धनलाभाचे योग व्यावसायिक पर्यायातून विशेष लाभ, काही फायद्याचे सौदे हाती येतील. त्यानुसार नियोजन बदलावे लागेल. नफ्याचे प्रमाण वाढेल. ऑटोमोबाइल क्षेत्र लाभान्वित होईल. |
|
मध्यस्थी फलद्रूप होतील
मिथुन –आपल्या रोजच्या जीवनात बदल घडल्याचे अनुभवण्यास मिळेल. अनुकूल ग्रहमान संरक्षक कवच उभारेल. परमेश्वराचा आशीर्वाद लाभल्याने येणारी संकटे परस्पर जातील; परंतु आपण आपल्या वर्तणुकीवर बोलल्यावर ती नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कोणाचाही अपमान करू नका. काही वेळेस कुटुंब-परिवार, मित्रमंडळी, नातेवाईक, आप्तेष्ट यांच्याबरोबर मतभेद संभवतात. कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण केल्यामुळे आत्मीक समाधान वाटून कृतकृत्य व्हाल. विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह निश्चित होतील. मनासारखा जोडीदार निवडता येईल. ओळखी मध्यस्थी फलद्रूप होतील. |
 |
नोकरी-व्यवसाय-धंद्यात अनुकूलता
कर्क – नोकरी-व्यवसाय-धंद्यात अनुकूलता लाभेल. नोकरीमध्ये वेतनवृद्धी, पदोन्नती यासारख्या घटना घटक होऊ शकतात. केलेल्या कामाचे घेतलेल्या कष्टाचे फळ मिळेल. उत्पन्नात वृद्धी होऊन नोकरीतील अधिकार कक्षा रुंदावतील. पण त्याचबरोबर जबाबदाऱ्याही वाढतील सरकारी स्वरुपाच्या नोकरीत मानसन्मान मिळून अतिरिक्त कार्यभार सोपविला जाऊ शकतो आपल्या अधिकार मर्यादेचे उल्लंघन करू नका. व्यवसाय-धंद्यात तेजी वाढून नफ्याच्या प्रमाणात वृद्धी होईल. व्यवसाय विस्ताराच्या योजना हाती घेता येतील. नवे नियोजन कराल. भागीदारीच्या व्यवसायात भागीदाराबरोबर मतभेद टाळणे इष्ट ठरेल. स्पर्धकांवर मात कराल.
|
 |
उन्नती आणि प्रगती होईल
सिंह – काही वेळा विरोधकांचे मुद्दे पटणारे नसले तरी वाद-विवाद वाढवू नका. ते हिताचे ठरेल. थोडे सबुरीने व संयमाने घ्या. तसेच कुटुंब-परिवारात आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका. समोरील व्यक्तीच्या मतास उचित प्राधान्य देणे श्रेयस्कर ठरेल. सर्वच क्षेत्रातील समस्या जाणून घेतल्यास त्यावर मार्ग काढू शकाल. जीवन साथीचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कोणत्याही स्वरुपाच्या लहान-मोठ्या कार्यात यश मिळण्यासाठी ग्रहमान तसेच वातावरण अनुकूल आहे. समोरील व्यक्तीचा अपमान करू नका. कार्यक्षेत्रात उन्नती आणि प्रगती होईल.
|
 |
कार्यात यश मिळेल
कन्या – अनुकूल कालावधी. हातात घेतलेल्या कार्यात यश. दीर्घकाळ रखडलेली जमीन-जुमला स्थायी संपत्ती याविषयीची कामे गतिशील होतील. आर्थिक फायदा होऊ शकतो. आर्थिक बाजू चांगली राहिल्याने नवीन गुंतवणुकीचा विचार असेल; परंतु नवीन लहान-मोठी कोणतीही गुंतवणूक करताना सतर्क राहणे जरुरीचे. गरज पडल्यास त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींचा सल्ला घ्यायला विसरू नका. पूर्वी केलेल्या गुंतवणुका भरघोस फायदा मिळवून देतील. सभा समारंभाची निमंत्रणे मिळतील. एखाद्या समारंभात मानाचे स्थान भूषवू शकाल. नोकरी-व्यवसायातील स्थिती सामान्य राहील.
|
 |
परदेशगमन होईल
तूळ – आपण आनंदी आणि उत्साही वातावरणाचा लाभ घेऊ शकाल. आर्थिक ओघ मोठा राहून आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. त्यामुळे मनसोक्त खर्चही करू शकाल. कुटुंब परिवारातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण केल्याचे समाधान मिळेल. काही कार्यानिमित्त जवळचे तसेच दूरचे प्रवास करावे लागतील. प्रवास कार्य सिद्ध राहतील. जे जातक नोकरीच्या शोधात आहेत, अशा जातकांचा नोकरीविषयक शोध संपुष्टात येईल. बेरोजगारांना रोजगार मिळेल. कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींच्या समस्या सुटतील. शिक्षणासाठी परदेशगमन होऊ शकते.
|
 |
स्पर्धकांवर मात करू शकाल
वृश्चिक – हितशत्रू यांच्यावर या कालावधीमध्ये मात करू शकाल. मात्र थोडा संयम आवश्यक आहे, सबुरीने घ्या. घाईगर्दीत कोणताही लहान-मोठा निर्णय घेण्याचे टाळा. तसेच स्वतःच्या क्रोधावर वागण्यावर व बोलण्यावर नियंत्रण आवश्यक राहील. कोणालाही अपमानास्पद वागणूक देऊ नका. समोरील व्यक्तीचे म्हणणे पूर्णपणे समजून घेऊन नंतर त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणे हिताचे ठरेल. नेमकी संधी ओळखून आपली पुढील पावले उचला. कुटुंब-परिवारातील परिस्थिती मतभेदांमुळे अस्थिर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या मतास उचित प्राधान्य द्या. ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल.
|
 |
खरेदी विक्रीतून लाभ
धनु – सदरील कालावधीमध्ये आपल्या भौतिक सुखसुविधांमध्ये वृद्धी होईल. त्याचबरोबर सामाजिक प्रतिष्ठा, यश आणि कीर्ती वाढेल. राहत्या घरासाठीच्या सुशोभीकरणासाठी खर्च होईल. व्यवसाय-धंद्यात मोठे करार-मदार होऊन काही फायद्याचे सौदे हाती येण्याची शक्यता. व्यवसायिक उलाढाल वाढेल. जमीन-जुमला स्थायी संपत्ती इत्यादींच्या खरेदी विक्रीतून लाभ मात्र वादविवाद टाळा. वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा मिळू शकतो. रखडलेले व्यवहार गतिमान होऊन पूर्णत्वाच्या मार्गावर येतील. ओळखी, मध्यस्थी फलद्रूप होऊ शकतात. कुटुंब परिवारामध्ये लग्नकार्य ठरतील. |
|
आत्मविश्वासात वृद्धी होईल
मकर – या काळात जरी आपल्याला मिश्र फळे मिळणार असतील तरी आपल्या आत्मविश्वासात वृद्धी होईल. आपल्यासमोरील मोठी क्लिष्ट स्वरूपाची कार्य आपण आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर पूर्ण करू शकाल. भूमी, भवन, प्रॉपर्टी यांच्यापासून मोठ्या आर्थिक लाभाची शक्यता. वैद्यकीय आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित जातकांना मोठ्या स्वरूपातील फायद्याचे सौदे हाती येण्याच्या शक्यतेसह नवीन संधी उपलब्ध होतील. विद्यार्थी स्पर्धात्मक यश मिळवू शकतात. नोकरीत अनुकूल कालावधी. पदोन्नती, वेतनवृद्धीचे योग. सामाजिक कार्यात रस घ्याल. मानसन्मान वाढेल. कुटुंब-परिवारात भावंडांविषयी प्रेम, जिव्हाळा वाटेल.
|
 |
आरोग्याची काळजी घ्या
कुंभ – आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरणार आहे. खाण्या-पिण्यावर नियंत्रण आवश्यक. पथ्यपाणी सांभाळा. त्याचप्रमाणे वैवाहिक जीवनात प्रेमसंबंध दृष्टिकोन बदलाची शक्यता मतभेद, वादविवाद यापासून अलिप्त राहा. आपल्यासमोरील कार्य पूर्ण करण्यासाठी अधिक परिश्रमाची आवश्यकता. आपल्या क्रोधावर वेळीच नियंत्रण ठेवा. मनस्वास्थ बिघडवणाऱ्या घटना घटित होऊ शकतात. बौद्धिक क्षेत्रातील जातकांना अनुकूल कालावधी घेतलेल्या कष्टाचे अपेक्षित फळ मिळू शकते. नोकरीत केलेल्या कामाचे चीज होईल. उत्पन्नात वृद्धी होण्याची शक्यता. |
 |
वातावरण आनंदी राहील
मीन –सुरुवातीला रोजच्या जीवनात अनपेक्षित घटना घटित झाल्यामुळे आपल्या जीवनक्रमामध्ये बदल घडू शकतो. मनात गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता पूर्ण विचाराअंती व शांत चित्ताने आपल्या समोरील परिस्थितीचा विचार करून निर्णय घेणे योग्य ठरेल. यशप्राप्ती होईल. व्यवसाय-धंद्यात जुनी येणी वसूल होतील व सभेच्या वेळी वाद-विवाद नको. व्यवसायिक उलाढाल वाढेल. तिचा अनुभव घेता येईल. उत्सव प्रदर्शन यशस्वी होऊन व्यवसायिक जुनी संबंध नव्याने प्रस्थापित होतील. नवे अनुबंध जुळून येतील. नव्या संधींची उपलब्धता शेअर मार्केट तसेच तेजी-मंदी संबंधित व्यवसायातून आर्थिक फायदा होऊ शकतो.
|