- स्वयंसिद्धा: प्रियानी पाटील
अशिक्षित अडाणी म्हणून वत्सलाने घरात केलेला प्रवेश चार भिंतीतच स्वयंपाक करण्यापुरता सीमित राहिलेला. नवऱ्याच्या दारूच्या व्यसनामुळे घर दारिद्र्याने भरलेलं. वत्सला अशिक्षित म्हणून चार पैसे कमावण्याचं धाडस ती आजवर करू शकली नाही. माहेरच्यांच्या पैशांवर जगताना तोंडघशी पडल्यासारखी अवस्था होऊन बसली होती. ती दर महिन्याला माहेरची वाट पकडायची एवढंच काय ते घराबाहेर पडणं असायचं. नवरा कधी काम करून पैसे आणायचा, कधी नाही. वत्सलाची ओळख विद्यार्थ्यांच्या परीक्षेदरम्यान झाली एवढंच.
विद्यार्थ्यांच्या गलक्यात भूक भूकचा आलेला सूर आणि त्यांच्यासमोर गरमागरम आलेल्या नाश्त्याच्या डिश, तो पदार्थांचा खमंगपणा बघून पोटातील भुकेने अधिकच काहूर माजेवलेलं. किती छान झालाय नाश्ता म्हणून सर्वांनीच आवडीने खाल्ला. वत्सला हे सारं पाहत राहिलेली. अजून हवा का कुणाला म्हणून तिने कुणालाही विचारलं नाही. कारण डब्यात काहीच शिल्लक राहिलं नव्हतं.
मुलं वत्सलाकडे थोडी नैराश्याने पाहत राहिली. तशी ती हसली. म्हणाली, उद्या थोडा जास्तीचा आणते.
कोण बनवतं? मुलांचा प्रश्न
‘मीच!’ वत्सला म्हणाली
‘वा! किती सुंदर चव आहे तुमच्या हाताला…’ म्हणून मुलांनी तिच्या भोवतालीच गलका केला. तसा तिचा मुलगा धावत तिथे आला. म्हणाला, माझी आई सुगरण आहे सुगरण. तिला कोणताही पदार्थ बनवायला सांगितला तरी ती सहज बनवते. तशी ती जास्त शिकलेली नाही. म्हणजेच अडाणीच म्हणतात तिला सारे घरात. पण माझ्यासाठी ती अडाणी नाही. मला ती खूप काही शिकवते. अन्नाचं परिपूर्ण ज्ञान आहे तिला. कोणताही पदार्थ जिच्या हातून शिजून ज्याने इतरांचं पोट भरतं. आम्हाला पैसे मिळतात, माझं शिक्षण चालतं. ती माझी आई अडाणी नाही. मुलगा बोलला.
‘अरे, पण कोण म्हणंतय तुझ्या आईला अडाणी, आम्ही थोडेच बोलतोय? उलट आम्ही स्तुती करतोय तुझ्या आईची.’ सगळीजण बोलली.
‘तुम्ही बोलत नसले तरी घरात आणि आजूबाजूच्यांसाठी ती अडाणीच आहे.’ त्याने आपल्या आईचा हात हातात घेतला. पण ती विव्हळली.
‘काय झालं हाताला?’
‘भाजला.’
‘जेवण करताना भाजला का?’
‘नाही, तिच्यावर बाबाने राग काढला. आजीने साथ दिली. तरी ती काम करतेय.’ मुलगा बोलला.
‘अरे देवा! मग तुम्ही नका कष्ट घेऊ. आम्ही दुपारच्या जेवणाची सोय दुसरीकडे करतो.’
‘नाही नाही, दुपारच्या जेवणाची तयारी झाली आहे. दोन माझ्यासारख्या गृहिणी आहेत माझ्या जोडीला. काळजीचं कारण नाही काही.’ ती बोलली.
‘खरं की काय?’ खरंच तिच्या कामाचं कौतुक वाटून गेलं. म्हणजे हिच्यामुळे आणखी दोन गृहिणींच्या संसाराला हातभार लागणार होता. कमाल वाटली. मुलगाही किती हुशार आहे. ती निघून गेल्यावर मुलं अभ्यासात गुंतली. दुपारी तिने पाठवलेलं जेवण तितक्याच आवडीने वत्सलाचं गुणगान गात जेवली. पुन्हा अभ्यसात गुंतली. सायंकाळच्या वेळी बाहेरून कसलासा आवाज आला. मालवणी नाटकाचा सूर घुमतोय तसे काहीसे शब्द कानावर पडले. साऱ्यांचे लक्ष तिकडे वळले. पाहिलं तर वत्सलाचा मुलगा डोक्यावर कसलासा डबा घेऊन इथवरच आलेला.
‘अरे तू?’
‘होय मी, तुमच्यासाठी गरमागरम नाश्ता
घेऊन आलोय.’
‘अरे पण आम्ही सांगितला नव्हता आतासाठी?’ आईने बनवलाय खास तुमच्यासाठी. घ्या, घ्या पटापट बघू म्हणून त्याने डिश मुलांकडे सरकवल्याही. मुलांना त्याचं कौतुक वाटलं.
‘ए तू मघाशी काय बोलत आला रे, ते नाटकासारखं?’ मुलांनी विचारलं
‘ते होय, ते वस्त्रहरण नाटकातील डायलॉग होते. करून दाखवू का तुम्हाला? तुमचा नाश्ता होईपर्यंत…’
‘हो हो!’ मुलं आनंदली. त्याने सर्वांसमोर नाटकाला सुरुवातच केली. म्हणता म्हणता त्याने अर्ध नाटक करून दाखवलं तेही तोंडपाठ डायलॉगसह. मुलांची तन्मयता, टाळ्या आणि नाश्त्याचा आस्वाद असं वातावरण त्या मुलाच्या आगमनाने प्रफुल्लित करून गेलं. सारे हसत होते, त्याच्या नाटकाचा आनंद घेत होते, सोबत त्याच्या आईच्या हातच्या नाश्त्याची चव असं एकंदरीत वातावरण पाहता धन्य वाटून गेलं. साऱ्यांनी त्या मुलाचं कौतुक केलं. अभ्यासाचा ताण जरा सैल झाला.
हे सारं आईमुळे शिकलो, असं तो म्हणाला आणि साऱ्यांच्या नकळत पाठीमागे येऊन उभ्या राहिलेल्या वत्सलाच्या डोळ्यांत पटकन पाणी आलं. म्हणाली, मुलगा आयुष्यात आला आणि माझं सारं जीवनच पालटलं. ही वत्सला सारं काही शिकली. उंबरठ्याबाहेर कसं वावरावं हे तिला कळलं. स्वत:चं पोट भरायला शिकली. अभ्यास काय असतो हे ती शिकली. आज मला माझा मुलगा वाचायला, लिहायला शिकवतोय आणि काय हवं? म्हणून तिने आपल्या मुलाला पोटाशी कवटाळलं. सारी मुलं तो ममतेचा जिव्हाळा, वात्सल्य आपल्या डोळ्यांत साठवत राहिली.