कोकणातला शिमगोत्सव

Share
  • दृष्टिक्षेप: अनघा निकम-मगदूम

कोकणात सध्या चैतन्य, उत्साह, आनंद पसरला आहे कारण, फाक पंचमीपासून होळीचे वेध प्रत्येक कोकणवासीयांना लागले आहेत. फाक पंचमीला कोकणातील अनेक गावांमध्ये आंब्याच्या, शेवरीच्या होळ्या उभ्या राहिल्या आहेत. रात्री टीव्हीमध्ये किंवा अन्य कुठे अडकलेला गावातला तरुण वर्ग आता रोज रात्री या होळीभोवती जमू लागला आहे. गावागावात जोरजोरात फाका घातल्या जाऊ लागल्या आहेत. कधी काळी कुणाचं भांडण झालं असेल, त्यांच्यातील वाद रात्री होळीभोवती पेटणाऱ्या होमात नष्ट करून पुन्हा नव्या मैत्रीचे, नव्या नात्याचे बंध निर्माण होत आहेत. वाईट गोष्टी दूर करत नव्याचे, मंगलाचे स्वागत करण्यासाठी सगळेच सज्ज झाले आहेत.

जशी होळी गावात आली आहे, तसतशा ग्रामदेवातांच्या पालख्या गाव प्रदक्षिणेसाठी मंदिराबाहेर पडल्या आहेत. देवाला रूपं लागली आहेत. वर्षभर देवाला देवळात भेटणारा भक्त त्याच्या स्वतःच्या घरी देवाचं स्वागत करणार आहेत. जी देवता गावाचं आणि गावकऱ्याचं रक्षण करते तीच देवता आता गावात, वाडीवस्तीत सगळं ठीक आहे ना? हे प्रत्यक्ष बघायला पालखीतून बाहेर पडतं आहेत. यानिमित्ताने वेगवेगळ्या देवांच्या पालख्यांची भेट होऊन गावागावातील ऋणानुबंध घट्ट होतं आहेत.
आपल्या घरात पालखीतून देव येणार म्हटल्यावर फक्त मुंबई, पुण्यातूनच नव्हे, तर जिथे कुठे चाकरमानी असेल तिथून तो रेल्वे, बस, खासगी वाहने करून गावी परतत आहेत. भाद्रपदातील गणेशोत्सवनंतर शांत झालेली गावे, बंद झालेली गावातील घरे पुन्हा गजबजू लागली आहेत. घराघरांची साफसफाई होऊन रांगोळी, रंगाने घर सजवली जात आहेत. गोडाच्या सणाला पुरणपोळी आणि तिखट सणाला मांसाहाराचे बेत घराघरात रंगू लागले आहेत.

जेवणात परसातल्या आंब्याच्या झाडाला लागलेल्या कैरीचं लोणचं, कुठे पिकलेला आंबाच्या फोडी, फणसाच्या कुयरीची चविष्ट भाजी, फणसाचे गरे कापे खायचे की बरके यावर चर्चा झडू लागल्या आहेत. गावातल्या घरात अनेक महिने एकटीने काढणाऱ्या आज्जी-आजोबांना मुलं-मुली, नातवंड सणासाठी घरी आल्याने जोर आला आहे. त्यांचे दुखणारे गुडघे, वळणारे पाय, अंधुक झालेली दृष्टी… हे सगळे आजार आता गायब झाले आहेत.

ही कला काळाच्या उदरात गडप झाली, असं म्हणणाऱ्यांना खोटं ठरवत गोमू, नाखवा गावागावांत बाहेर पडले आहेत. पुठ्ठ्यातून तयार झालेल्या छोट्यांच्या पालख्या सजल्या आहेत. वार्षिक परीक्षा तोंडावर असल्या, गावात कुणाच्या दहावीच्या, बारावीच्या परीक्षा सुरू असल्या तरीही शिमग्याच्या उत्सवात दंगून जाण्यासाठी सगळेच सज्ज झाले आहेत.

अनेक ठिकाणी फाल्गुन पौर्णिमा आणि धूलिवंदनापर्यंत होळी उत्सव साजरा केला जात असला तरी कोकणात मात्र खरे रंग खेळले जातात ते रंगपंचमीला! तोपर्यंत आणि काही गावांमध्ये त्यानंतरही शिमगोत्सव सुरूच असतो. पालख्यांसोबत होळीच्या होमाभोवती ढोल-ताशे यांचा गजर होत असल्याने परिसरातील वातावरणात अचानक वेगळा रंग दिसू लागला आहे. हे बदलते वातावरण केवळ कोकणातील शिमगोत्सवामुळे झाले आहे.

कडक ऊन, त्यामुळे येणारं पाण्याचं दुर्भीक्ष, बदलत्या हवामानात अडकलेला आंबा, काजू, मासेमारी, मुसळधार पावसामुळे विस्कळीत होणारे आयुष्य, रोजगाराचा अभाव, अनेक आवश्यक सुविधांअभावी विकासाच्या व्याख्येत अद्यापही न बसणाऱ्या या कोकणात आजही अनेक अडचणी, अनेक समस्या आहेतच. जीवनमान सुसह्य, सुखकारक करण्यासाठी आजही इथे संघर्ष करावा लागतो आहे.
तरीही त्या सगळ्या वेदना, कष्ट, घोर, चिंता, ताण हे सगळं होळीच्या होमात भिरकावून घरी येणाऱ्या

ग्रामदेवतेच्या पालखीच स्वागत करत त्याच्या मिरवणुकीत आनंदाने सहभागी होऊ शकतो, तो पक्का कोकणीच. त्याच्या अनंत अडचणी, समस्यावर उपाय मिळेल की नाही, याचं उत्तर त्यांच्याकडे नाही. पण होळीच्या होमात, गुलालच्या रंगातून तो नवी ऊर्जा मिळवतो, लढण्याचं बळ मिळवतो आणि येणाऱ्या नव्या हिंदू नववर्षाचं स्वागत करण्यासाठी सज्ज होतो.

हीच ऊर्मी कोकणात शिमगोत्सवामुळे मिळतं असते. म्हणूनच जस बाप्पाच्या आशीर्वादासाठी इथला गणेशोत्सव महत्त्वाचा तसंच नवऊर्मी, नवउत्साह आणि लढण्याच्या नव्या ऊर्जेसाठी शिमगा उत्सवसुद्धा महत्त्वाचा आहे, हे कोकणी माणूस जाणतोच. म्हणूनच गाव-गाव गजबजले आहे, उत्साह प्रत्येक ठिकाणी ओसंडून वाहत आहे. शिमग्याला कोकणात सुरुवात झाली आहे आणि फाकांनी आसमंत दुमदुमत आहे.

हुरा रे हुरा नि आमच्या ग्रामदेवतेच्या पालखीला सोन्याचा तुरा रे… होलिओ…!
करवत रे करवत नि आमचा देव आला मिरवत रे… होलिओ…!!

Recent Posts

कोकणातील माकडे व वानरांचे निर्बीजीकरण करणार!

निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन - वन मंत्री गणेश नाईक मुंबई : कोकणातील फळबागा आणि…

11 minutes ago

६४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण सोडत जाहीर

गागोदे खुर्द अनुसूचित जातीसाठी, १४ ग्रामपंचायतीत आदिवासी सरपंच पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत…

23 minutes ago

SRH vs MI, IPL 2025: सनरायजर्स हैदराबादचे मुंबईला १४४ धावांचे आव्हान, क्लासेनची जबरदस्त खेळी

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स…

1 hour ago

पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार!

राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…

1 hour ago

IPL सामन्यात काळी पट्टी बांधून उतरले खेळाडू, चिअरलीडर्स गायब…पहलगाम हल्ल्यानंतर झाले हे बदल

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…

1 hour ago

अधिकाऱ्यांनी पूर्व परवानगीशिवाय कार्यालय सोडल्यास होणार निलंबनाची कारवाई

मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…

1 hour ago