Wednesday, July 24, 2024

सातबारा

  • क्राइम: अ‍ॅड. रिया करंजकर

दीनानाथ हे नेहमीप्रमाणे आपल्या वावरात गेले आणि वावरातील काम करू लागले. तेव्हाच त्यांच्या भावबंदकीमधील साळुंखे तिथे आले व म्हणाले की, “तुम्ही या वावरात काम करायचे नाही, कारण हा वावर आता आम्ही विकत घेतलेला आहे.” दीनानाथ यांना काही समजेना की, हा वावर केव्हा विकला गेला. तेव्हा साळुंखे यांनी सांगितले की, “तुमचा भाऊ रामभाऊ याच्याकडून हा वावर आम्ही विकत घेतला आहे.” दीनानाथ यांचं तिथेच डोकं फिरलं. सरळ घरी आले आणि रामभाऊ यांना याबाबत जाब विचारला असता, रामभाऊ यांनी उत्तर दिले की, “मी तो वावर विकलेला आहे.” दीनानाथ यांनी साळुंखे यांच्याविरुद्ध कोर्टात केस फाइल केली. कारण जो वावर होता, त्याची सध्याची प्राइज १७ ते २० लाखांपर्यंत होती आणि रामभाऊ यांनी साळुंखे यांना ७० हजारांत तो विकला होता. ज्यावेळी हा व्यवहार केला होता. त्यावेळी ते दारूच्या नशेत होते. एवढेच नाही, तर त्यांचा मुलगा नीलेशही त्यांच्यासोबत त्यावेळी होता. कोर्टामध्ये ज्यावेळी केस दाखल केली, त्यावेळी दीनानाथ यांनी कोर्टासमोर आम्ही चार भाऊ व एक बहीण असे आहोत व आमचा जो वावर आहे, शेतजमीन आहे, त्याची आजपर्यंत कायदेशीररीत्या भावंडांमध्ये विभागणी झालेली नाही. कोणाकडे तसे विभागणीचे कागदपत्रे नाहीत, त्याच्यामुळे सातबारावर आमच्या सगळ्या भावंडांची नावे आहेत. त्याचप्रमाणे रामभाऊ जसे म्हणतात की, माझा हिस्सा विकला. आम्हा भावंडांनी जमिनीचे हिस्से आजपर्यंत केलेले नाहीत. मग रामभाऊ यांचा नेमका हिस्सा कसा? हे त्याला कसे कळले आणि जर आमच्या पाच भावांना हिस्से केले, तर ते समान झाले पाहिजेत. पण रामभाऊ याने जी जमीन विकली, ती तर प्रत्येकाला समान येते. त्याच्यापेक्षा जास्त जमीन त्याने विकलेली होती.

दुसरे कारण असे होते की, जमिनीचा व्यवहार करताना कुठल्याही भावंडाची एनओसी त्याने घेतलेली नव्हती आणि जमिनीचा जो व्यवहार झालेला होता. त्याचे कागदपत्र बघितले, तेव्हा फक्त एक बाँड पेपर केलेला होता आणि ७० हजाराला ती विकत घेतली, असे त्यामध्ये नमूद होते. मोजमापणी केल्यानंतर त्या जमिनीची प्राइज १५ ते २० लाखांना आहे. मग ती ७० हजारांना विकत दिली आणि घेतली कशी? त्यावेळी राजाभाऊ यांनी सांगितले की, साळुंखे यांच्याकडून मी साठ हजारांचे कर्ज घेतले होते आणि ते मला फेडायला जमत नव्हते. म्हणून त्यांनी माझ्याकडून जमीन घेतली आणि साठ हजार रुपये वजा करून मला फक्त दहा हजार रुपये दिले आणि या व्यवहारात रामभाऊ यांना त्यांचा मुलगा नीलेश यांनी मदत केलेली होती. कारण झालेल्या कागदपत्रांवर फक्त रामभाऊ आणि नीलेश याची सही होती. म्हणजे पंधरा ते वीस लाखांचा वावर ७० हजारांत विकून रामभाऊ यांना हातात फक्त दहा हजार रुपये मिळालेले होते. साळुंखे यांनी सरासरी रामभाऊ आणि त्यांच्या मुलांची फसवणूक केलेली होती. सर्व कागदपत्रे बघून व सातबारावरील दीनानाथ आणि त्यांच्या भावंडांची अजूनपर्यंत असलेली नावे पाहता या भावंडांमध्ये अजूनही हिस्से पाडलेले नव्हते. याची शहानिशा करून न्यायालयाने दीनानाथ यांच्या बाजूने निर्णय दिला.

या निर्णयानंतर दीनानाथ व साळुंखे या दोघांचे निधन झाले. तरी साळुंखे यांचा मुलगा तो वावर सोडायला तयार नव्हता. जबरदस्तीने त्या वावरामध्ये तो वावरत होता. म्हणून दीनानाथ यांच्या मुलाने पुन्हा एकदा न्यायालयात ही गोष्ट निदर्शनास आणून दिली. म्हणून न्यायालयाच्या झालेल्या ऑर्डरवर साळुंखे यांच्या मुलाने अपील दाखल केले. साळुंखे यांच्या मुलाचा राजकारणात असलेल्या ओळखीमुळे तो दीनानाथ यांच्या मुलावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करून पुन्हा ती जमीन बळकवण्याचा प्रयत्न करत आहे व त्या वावरातून तो मागे फिरायला तयार नाही. न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरुद्ध साळुंखे यांच्या मुलाने जे अपील केले, चार वर्षांनंतर त्या अपिलावर आता न्यायालय सुनावणी सुरू झालेली आहे. सगळी कागदपत्रे, न्यायालयाचा निर्णय दीनानाथ यांच्या बाजूला असूनही जबरदस्तीने साळुंखे यांचा मुलगा त्या जमिनीवर कब्जा करून बसलेला आहे. अजूनही सातबारावर दीनानाथ यांच्या मुलांच्या आणि दीनानाथ यांच्याच कुटुंबांची नावे आहेत. त्या सातबारावर साळुंखे आणि त्यांच्या कुटुंबाने जबरदस्तीने नाव घालण्याचा प्रयत्न केला. पण न्यायालयाच्या निर्णयामुळे ते त्यांना जमले नाही.

दारूच्या व्यसनामुळे आणि पैशाच्या लालसेमुळे माणूस आपला लाखमोलाचा व्यवहार हा कवडीमोलाने घरच्यांच्या संमतीशिवाय करताना फसत आहे. एवढेच नाही, तर चुकीच्या व्यवहारात घरातल्या लोकांनाही नाहक मनस्ताप देत आहे. रामभाऊ आणि त्यांच्या मुलामुळे विनाकारण दीनानाथ व त्यांच्या भावंडांना आणि कुटुंबाला आजपर्यंत मन:स्ताप सहन करावा लागला आहे. सातबारा व भावंडांमध्ये न झालेला वाटपाचा हिस्सा म्हणून आजपर्यंत तो वावर अजूनही दीनानाथ यांच्या कुटुंबाकडे आहे.(सत्यघटनेवर आधारित)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -