
- कथा: रमेश तांबे
आई-बाबांच्या भांडणाला कंटाळून रवी घराबाहेर पडला. काल रात्रीपासून घरात भांडणं सुरू होती. खरं तर आजपासून रवीची सहामाही परीक्षा सुरू होणार होती. पण त्याच्या परीक्षेची चिंता ना आईला होती, ना बाबांना. रात्रभर रवी रडत होता, रडता रडताच तो उपाशीपोटी झोपी गेला. सकाळी जाग आली तेव्हाही दोघांची खडाजंगी सुरूच होती. रडून-रडून रवीचे डोळे सुजले होते. अंघोळ न करताच रवी घराबाहेर पडला. तो इतक्या सकाळी बाहेर कुठे चाललाय याची चौकशीसुद्धा आई-बाबांनी केली नाही!
फिरता फिरता रवी समुद्रावर पोहोचला. अथांग समुद्र मागे-पुढे हेलकावे खात होता. ती भरतीची वेळ होती. समुद्राच्या लाटा जोरदारपणे उसळत होत्या. रवी तिथंच वाळूत बसला. समुद्राकडे एकटक बघत. मनात विचारचक्र सुरू होते. आई-बाबांना माझी काळजी नाही. त्यांचं माझ्यावर प्रेम नाही. माझ्या परीक्षेचं महत्त्व त्यांना नाही. मग मी जगून तरी काय उपयोग! विचार करता करता त्याला रडू येत होते. त्यावेळी समुद्रावर फार गर्दी नव्हती. पण जे कोणी हजर होते ते आपापल्या परीने मजा घेत होते. रवी अचानक उठला अन् समुद्राच्या दिशेने पुढे चालू लागला. भरती असल्याने लाटा किनाऱ्यावर जोरात आपटत होत्या. पण लाटांकडे न बघता तो पुढेच जात राहिला. आता पाणी त्याच्या गुडघ्यापर्यंत आले होते. तेवढ्यात मागून कुणी तरी ओरडले. “अरे पोरा मागे फिर! मरायचंय का?” पण रवी मात्र पुढेच जात राहिला!
तेवढ्यात रवीच्या दंडाला धरून कुणीतरी त्याला मागे ओढले अन् भरभर ओढत पाण्यातून बाहेर काढले. “काय रे मरायचंय का!” असं जोरात खेकसला. रवीने मान वर करून पाहिले, तर तो माणूस रवीच्या वडिलांच्या वयाचाच होता. रवीचे पाण्याने भरलेले लाल लाल डोळे बघताच तो माणूस रवीला म्हणाला, “काय झालं बाळ सांग तरी मला!” तसा रवी ओक्साबोक्सी रडू लागला. रवी सांगू लागला, “काका माझे आई-बाबा घरात रोज भांडण करतात, एकमेकांना मारतात, शिव्या देतात. अनेकदा मला उपाशीच झोपावं लागतं. आज तर माझी परीक्षा होती. पण कुणालाही त्याची चिंता नाही. माझं कुणी ऐकत नाही. माझ्यावर कुणाचं प्रेम नाही. मग मी जगून तरी काय करू!” असं म्हणून तो पुन्हा मुसमुसून रडू लागला.
काका म्हणाले, “बाळ रडू नकोस. आपण पोलिसांत तक्रार करू. ते तुझ्या आई-बाबांना समजावतील. मग ते काका रवीला एका हॉटेलमध्ये घेऊन गेले. रवीने तेथे त्याचे तोंड धुतले. त्यामुळे रवीला जरा बरे वाटले. मग त्यांनी त्याला पोटभर खाऊ-पिऊ घातले. रवी आता चांगला ताजातवाना झाला. मग दोघेही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेले. तिथे मोठ्या साहेबांच्या केबिनमध्ये शिरले अन् रवी बघतो तर काय, समोर त्याचेच आई-बाबा खूर्चीत बसले होते. आपला मुलगा हरवल्याची तक्रार द्यायला ते आले होते. आईला बघताच रवीने आईला हाक मारली, “आई...” रवीचा आवाज ऐकताच आईने धावत जाऊन रवीला गच्च मिठी मारली, अन् “कुठं होतं माझं बाळ” असं म्हणत घळाघळा रडू लागली.
बाबादेखील रवीच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले, “रवी कुठे होतास रे इतक्या वेळ, किती घाबरून गेलो होतो आम्ही.” तोच काका म्हणाले, “भरतीच्या वेळी भर समुद्रात उभा होता. त्याला जगायचं नाही असं म्हणत होता. मी त्याला ओढत पाण्याबाहेर आणलं. मुलांचा जरा विचार करा नाही, तर आयुष्यभराचं नुकसान करून घ्याल. आई-बाबा म्हणून थोडं जबाबदारीने वागा” असं म्हणून ते काका तिथून निघून गेले. इकडे रवीच्या आईने हंबरडा फोडला, “अरे रवी बाळ चुकलो आम्ही” असं म्हणू लागली.
शेवटी बाबांनी पोलिसांना या पुढे आम्ही दोघे मुळीच भांडणतंटा करणार नाही, असे आश्वासन देऊन आई-बाबा रवीला घेऊन घरी निघाले. तेव्हा रवीच्या आईने रवीचा हात चांगला घट्ट पकडल्याचे दिसत होते!