- ओंजळ: पल्लवी अष्टेकर
कोल्हापुरात मी एकदा काव्यसंमेलनाला गेले होते. तेव्हा व्हीलचेअरवर बसून एक बाई आल्या. चेहरा अतिशय प्रसन्न, शांत, बुद्धिमत्तेचे तेज दाखविणारा! शेजारी कुबड्या काखेत घेऊन त्यांचे मिस्टर उभे होते. हसतमुख चेहरा! या सुंदर जोडप्याचे नाव मी ऐकले होते. कोल्हापुरात आपल्या बहारदार लेखणीने अनेक वृत्तपत्रे गाजविणाऱ्या, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत अनेक मासिकांत बालकथा, कविता लिहिणाऱ्या डॉ. वासंती इनामदार-जोशी. आपल्या अर्थपूर्ण, गंमतशीर कवितांनी श्रोत्यांना खिळवून ठेवणाऱ्या! तो कार्यक्रम संपल्यानंतर मी त्यांच्याकडून त्यांच्या घरचा पत्ता घेतला.
वासंतीताईंना घरी जाऊन भेटण्याची ओढ मला काही स्वस्थ बसू देईना. त्यांच्याकडून मी त्यांचा घरचा फोन नंबर घेतला होता. मी फोन करून त्यांच्या घरी जाण्यासाठी वेळ व दिवस निश्चित केला. कोल्हापुरातील ताराबाई पार्कात निसर्गाच्या कुशीत वसलेले ओम गणेश गृहनिर्माण संस्थेचे अपार्टमेंट.
मी लुनाने त्यांच्या घरी गेले. वासंतीताईंनी प्रसन्न चेहऱ्याने दार उघडले. त्या जमिनीवर सरकत सरकत दार उघडायला आल्या होत्या. बघता बघता त्या, मी व त्यांचे मिस्टर अशा आमच्या गप्पा सुरू झाल्या. मी एखाद्या वेगळ्या, अपरिचित ठिकाणी आले आहे, असे मला वाटतच नव्हते. तेव्हा मी कॉलेजात होते. वासंतीताई व काका पोलिओमुळे दिव्यांग होते. माझ्याशी गप्पा करता करता सरकत त्या स्वयंपाकघरात चहा करायला गेल्या. त्यांच्या स्वयंपाकघरात त्यांच्या हाताला येतील अशी भांडी, धान्य, पिठं, फळं-भाज्या अशी व्यवस्था होती. मग मी चहा घेऊन त्यांच्या आतल्या खोलीत आले. अहाहा! काय सुंदर चहा केला होता त्यांनी! हल्ली कोल्हापुरात ठिकठिकाणी अमृततुल्य चहा, बासुंदी चहा अशी नावं दुकानांवर वाचायला मिळाली की, मला हमखास वासंतीताईंची आठवण येते.
हळूहळू मी वासंतीताई व काकांच्या घराचा एक भाग होत होते. आमची मैत्री दिवसेंदिवस घट्ट होत चालली होती. वासंतीताईंच्या मिस्टरांच्या सात शस्त्रक्रिया झाल्या होत्या; परंतु त्या वेदनांचा लवलेशही त्यांच्या चेहऱ्यावर नसायचा. गणेश चतुर्थीच्या काळात दर वर्षी वासंतीताई मला त्यांच्या सोसायटीतील खालच्या अंगणातून दुर्वा आणायला सांगायच्या.
अतिशय बुद्धिमान अशा वासंतीताई आपल्या लेखनातून भरारी घ्यायच्या. ‘वेळ कसा घालवू?’ असा प्रश्न त्यांना कधी पडला नाही. आमची तिघांची बैठक जिथे जमायची, त्या शेजारच्या खोलीत वासंतीताईंची साहित्य संपदा होती. दुपारचं जेवणं झाली आणि काका जरा वामकुक्षी करायला लागले की, त्या आपल्या साहित्यविश्वात रमून जात. तीनशे कथा, सोळा समीक्षा लेख, बालकथांची पुस्तके त्यांच्या नावावर होती. मी अचंबित होऊन जायचे. त्यांचा उत्साहाचा धबधबा पाहून मलासुद्धा लिहायची इच्छा होऊ लागली. मग मी वर्तमानपत्रे, मासिके यात लेख लिहू लागले.
वासंतीताई व काकांचे सामाजिक संबंध अतिशय सुदृढ होते. मी कधीही त्यांच्या घरी गेलेले असले तरी पाठोपाठ दोन-तीन तरी फोन खणखणत असायचे. मग त्यांच्या मनसोक्त गप्पा चालायच्या. आमच्या दोघींच्या पुस्तकांचे डीटीपी करणारे, चित्रकार अशी आमची साहित्य मैफल जमून जायची. पुस्तकांच्या वितरणाला काका सज्ज व्हायचे. त्यांच्या स्कुटरला साईड कार होती. त्यात कधी-कधी वासंतीताई बसायच्या, नाही तर काका त्यात त्यांच्या पुस्तकांचे गठ्ठे ठेवायचे. त्यांची ही जगावेगळी धडपड पाहून माझे मन भरून यायचे. दरवेळी छापखान्यातून नवीन पुस्तक आले की, ते आमच्या घरी यायचे.
‘हेल्पर्स ऑफ द हॅन्डीकॅप्ड’ कोल्हापूर या संस्थेच्या संस्थापिका नसीमा हुरजूक यांच्याशी त्यांची मैत्री होती. बाबूकाका दिवाण या आपल्या गुरूंकडून प्रेरणा घेऊन नसीमा हुरजूक यांनी १९८४ मध्ये आपल्या समविचारी मित्र-मैत्रिणींच्या सोबतीने दिव्यांगांना सहाय्यभूत ठरेल, अशी ही संस्था काढली. ‘चाकाची खुर्ची’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
वासंतीताईंच्या साहित्यसेवेबद्दल पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. रोजचे वर्तमानपत्र वाचणे हा त्यांचा आवडता छंद! त्यांच्या माहेरी सासरकडील पाहुणे त्यांच्याकडे येऊन-जाऊन असायचे. त्यांची कराड येथे राहणारी बहीण दरवेळेस त्यांच्याकडे येताना फराळाचे पदार्थ घेऊन यायची. त्या माझ्यासाठी आठवणीने पावडरची डबी आणायच्या. मला खूप अप्रूप वाटायचे. कधीतरी मी संध्याकाळी त्यांच्या घरी जायचे, तेव्हा त्यांच्या स्वयंपाकघरातील देवघरात त्या मला समई लावायला सांगायच्या. मग आम्ही तिघे प्रार्थना म्हणायचो. काकांना दररोज वासंतीताईंच्या हातचा वाफाळलेला वरण-भात लागायचा.
वासंतीताईंनी पीएच.डी. केले होते. काही काळ त्या शिवाजी विद्यापीठात मराठी विषयाच्या प्राध्यापक म्हणूनही जायच्या; परंतु दररोज जिने चढणे-उतरणे हा व्याप त्यांच्यासाठी अशक्य होता. त्यामुळे ती नोकरी त्यांनी बंद केली; परंतु त्याबद्दल नाराज न होता त्यांनी आपले लिखाण चालू ठेवले. त्यांच्या घरात दिव्याची, पंख्याची बटणे खालीच होती, जेणेकरून त्यांना हाताळण्यासाठी ती सोपी जावीत. दिवसातील अर्धा-पाऊण तास ते दूरदर्शन पाहत. शालेय पाठ्यपुस्तकात वासंतीताईंच्या शैक्षणिक काळातल्या लढ्याविषयी विद्यार्थ्यांनी धडा वाचला असेल.
कोल्हापुरातील बाजार, नर्सरी, देवालय यांची काकांना इत्यंभूत माहिती होती. एरव्ही बहुतांशी वेळा काका वासंतीताईंना घरातले सामान आणून देत. स्वावलंबी राहण्याचा त्यांचा प्रयत्न असे. एकदा मी त्यांच्या घरी गेले असताना त्यांच्याकडे एक बाई आल्या. त्यांची दोन्ही मुले शाळेत शिकत होती. कामाच्या निमित्ताने त्या बाईंचे पती बाहेरगावी गेले होते. मुलाची परीक्षा फी भरायची होती. डोळ्यांत पाणी आणून त्या वासंतीताईंना ही घटना सांगू लागल्या. फीचे पैसे देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. काकांनी कसलाही विचार न करता पटकन त्यांना पैसे दिले. माणुसकीची श्रीमंती या जोडप्याकडे भरपूर होती. जाता जाता त्या मला जगण्याचा एक मंत्र देऊन गेल्या – ‘जगता यायला हवं.’