Thursday, July 18, 2024
Homeसाप्ताहिककोलाजमुरबाडमध्ये कित्येक वर्षे केली जातेय कलिंगडांची काशी!

मुरबाडमध्ये कित्येक वर्षे केली जातेय कलिंगडांची काशी!

  • मुक्तहस्त: अश्विनी पारकर

काशी केली, मथुरा केली, केली द्वारका,
जगात देव नाही पांडुरंगासारखा”

हे भजन वेगवेगळ्या स्वरांत आणि शब्दांतही वेगवेगळे बदल करून ऐकायला मिळते. यातील काशी या शब्दाचा अर्थ, संदर्भ शोधायला अगदी अलीकडील बाजीराव-मस्तानी चित्रपटापासून सुरुवात करणे यासारखा उत्तम शुभारंभ नाही. कारण, मरून रंगाच्या साडीतील बाजीराव पेशवे यांची पत्नी काशीबाई ऊर्फ सौंदर्यवती, अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने मराठीत एखाद्याची वा एखाद्या गोष्टीची काशी करणे म्हणजे काय असत ते त्या चित्रपटात काशीबाईची अभिनय करताना केले आहे.

काशी या शब्दाला विविध छटा आणि कंगोरे आहेत. तर दादा कोंडके यांनी काशी गं… काशी, असं म्हणतं नायिकेला मारलेली लडिवाळ हाक म्हणून रोमँटिक छटा असलेलं नावंही आहे. एखाद्याची काशी करणे म्हणजे त्याची वाट लावणे हा मराठीतील शब्दप्रयोग प्रचलित आहेच, तर काशी शब्दाचा समावेश असलेला काशीकर म्हणजे भयंकर लुच्चा माणूस असाही काशी या शब्दाचा अर्थ होतो.
काशी या शब्दाचा खर तर मराठी संत साहित्यात चोख समाचार घेतला आहे. संत एकनाथांच्या भागवत ग्रंथाला काशीतील प्रकांड पंडितानी मराठी भाषेचा दर्जा जोखत केलेला विरोध याला एकनाथांचं हे पद म्हणजे चोख उत्तर आहे. संत एकनाथ म्हणतात,

काशी क्षेत्र श्रेष्ठ सर्वांत पवित्र ।
परी तेथें वेंचे जीवित्व श्रेष्ठ तेव्हा॥१॥
तैसी नोहे जाण पंढरी हे ।
पेठ वैकुंठा वैकुंठ जुनाट हें ॥२॥

याचा अर्थ असा, “काशीत कोणी मृत्यू पावलं तर तिथेच त्याला मोक्ष मिळतो, हे काशीचं मोठं वैगुण्य आहे. पण पंढरपूरमध्ये असं नाही. पंढरपूर वैकुंठाचेही वैकुंठ आहे. तिथे अशा कल्पनांना स्थान नाही.
संत ज्ञानेश्वर यांनी-

काशी, अयोध्या, कांची, अवंती, मथुरा माया गोमती।
ऐसी तिर्थे इत्यादिके आहेसी, परी सरी न पवती ये पंढरी ।।

असं म्हणत पंढरीचा महिमा गायला आहे. संत साहित्याने काशीचा घेतलेला समाचार कितीतरी उदाहरणांतून उद्धृत करता येणे सहज शक्य आहे. पण लेखाचा उद्देश काशी या शब्दाचा समाचार किंवा पुरावलोकन करणं नसून कलिंगडाची काशी म्हणजे काय, याचे उत्तर देणे आहे. त्यामुळे कलिंगडाची काशी करतात म्हणजेच काय करतात हे जाणून घेऊ.

नुकतीच मुरबाडमधील कलिंगडांवर केलेली अत्यंत सुरेख बातमी वाचनात आली. त्यात हे दोन शब्द होते. ते म्हणजे कलिंगडाची काशी…! काशी या शब्दाचे वर वर्णिलेले अन् न वर्णिलेले पण अस्तित्वात असलेले अनेक अर्थ लक्षात घेता सहाजिक शंकचे निरसन करणे क्रमप्राप्त झाले. त्यासाठी गुगल मास्तरांकडे वारंवार वेगवेगळे शब्द वापरून विचारणा करूनही काही धड उत्तर मिळेना. मग मुरबाडमधील शेतकरी बळीराम भवार्थे यांच्याशीच संवाद साधला आणि या प्रश्नाचे उत्तर मिळालेच.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी मुरबाड तालुक्यात किशोर, असोले, करवेळे तसेच मुरबाड शहरातील काही भागात कलिंगडांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जायची. साधारण, भात पिकाची कापणी झाली की, त्यानंतर शेतात कलिंगडाची लागवड केली जात असे. यालाच ‘कलिंगडाची काशी’ असे म्हणतात. यात गावातील दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन कलिंगड लागवड करायचे आणि त्यानंतर तयार झालेली कलिंगडे विक्री होईपर्यंत त्यांचा मुक्काम शेतामध्ये व मांडवात करत.

आजही मुरबाडमध्ये शेतकरी अशा पद्धतीने कलिंगडाची काशी करतात. भाताचे पीक सरले की, त्याच जागेत आजूबाजूचे दोन-तीन शेतकरी एकत्र येऊन कलिंगडाची सामूहिक शेती करतात. घामाचं पाणी शिंपून हाताने मशागत करतात. यातून पिकतात ती हिरवेगार आणि आतून लालभडक कलिंगड. ही चवीला रवाळ आणि गोड व्हावी म्हणून मग ती शेतकरी काही काळ सुकवतात. मग ही वजनदार कलिंगड वजनाने हलकी होतात. त्याला दर कमी मिळतो, कारण ग्राहकांना वाटतं की, वजनाने हलकं कलिंगड म्हणजे कमी दर्जाचं. त्याचा पिकलेला देठ म्हणजे जुना माल. पण, हेच कलिगंडाच्या अस्सल चवीचं गुपित आहे.

मुरबाड-वासिंद रस्त्यावर मोठ मोठ्या मंडपात तुम्हाला ही कलिंगड दिसतील. तिथून पुढे पर्यटन, ट्रेकिंगसाठी प्रवास करणारे वाटसरू तिथे थांबतात. कलिंगडाची ही शिदोरी आरोग्यदायी खाऊ म्हणून बांधून घेतात. त्या शेतकऱ्यांना याचे कमी पैसे देतात. पण उन्हाच्या कडाक्यात मांडवात बसलेल्या कष्टकऱ्यांच्या मेहनतीने झालेल्या कलिंगडांचं मोल त्यांना कळत नाही. खरंतर, कलिंगड वजनाने हलकं, त्याचा देठ सुकलेला आणि बुंध्याकडे थोडा पिवळसर म्हणजेच आतला गर मधुर आणि तृप्त करणारा.

होळीच्या आधीच थंडीने काढता पाय घेतला आहे. ग्लोबल वॉर्मिंग उन्हाळ्यात तुम्हाला शहरातही वाळवंटाची सैर घडवून आणतोय. त्यामुळे येत्या काही दिवसांत कंपन्या नवनवीन फ्लेवर्ससह खास ऑफर असलेली शीतपेय आणखी जोमाने विकायला सुरुवात करतील. त्याआधी या कलिंगडाचा फडशा पाडायला सुरुवात करा. या लालेलाल, थंडगार कलिंगडाच्या फोडी तोंडात गेल्या की, ही महागडी शीतपेय फुटकळ वाटायला लागतील आणि मग उन्हाळा आणखी कडक झाल्यावर आईसक्रीम, थंडाच्या दुकानांकडे वळू लागणारे तुमचे पाय कलिंगडाच्या ठेल्याकडे वळतील. या महागड्या शीतपेयांवर १०० रुपये खर्च करून अतृप्त राहण्यापेक्षा तुम्ही २० ते ३० रुपयाचं कलिंगड घेऊन गरमी में थंडी का मजा घ्याल आणि म्हणाल, कलिंगड खाके बोलो, थंडा थंडा कुल कुल.

कलिंगडांचा इतिहास थोडक्यात

कलिंगडे मूळची इजिप्त की दक्षिण आफ्रिकेतील याच्यावर अजूनही खल सुरू आहे. लिबियात कलिंगडाच्या वेली प्रथम सापडल्याचे म्हणतात, तर दक्षिण इजिप्तमध्ये ममीच्या सोबत पिरॅमिडमध्ये कलिंगडाचे पुरावे सापडले आहेत. सुमारे ७व्या शतकापासून भारतात कलिंगडाची लागवड केली जात होती आणि १०व्या शतकात ते चीनमध्ये पोहोचले होते. १३व्या शतकात मूर्स या विशिष्ट समाजाने इबेरियन द्वीपकल्पात कलिंगड आणले आणि तेथून संपूर्ण दक्षिण युरोपमध्ये त्याचा प्रसार झाला. सध्या जगातील कलिंगडाचे सर्वात जास्त उत्पादन घेणारा देश हा चीन आहे. त्यानंतर अमेरिकेत कलिंगडाचे सर्वात जास्त उत्पादन घेतले जाते. भारत हा कलिंगडांचे उत्पादन घेण्याऱ्या देशांच्या यादीत २८वा आहे. भारत जगाच्या पूर्ण कलिंगडांच्या उत्पादनापैकी ३८ टक्के उत्पादन घेतो. भारतात कर्नाटक राज्यात कलिंगडाची जास्त लागवड केली जाते. महाराष्ट्रात मुरबाड, सोलापूर जिल्ह्यात कलिंगडाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. कोकणातले शेतकरी आता आंबा, काजू, कोकम या पारंपरिक पिकांएवजी कलिंगडाच्या शेतीकडे वळत आहेत. अनेक प्रयोगशील शेतकरी यात नवनवे प्रयोग करत आहेत. जितकी उष्णता जास्त तितके हे वेलीवरचे मोठे फळ जोमाने फोफावते. जपानमध्ये तर आता चौकोनी कलिंगडंही तयार केली जातात. यासाठी कलिंगडाच्या पिकानं बाळसं धरलं की, त्याला चौकोनी आकाराच्या पेटीत ठेवलं जातं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -