Monday, March 17, 2025
Homeसाप्ताहिककोलाजजरतारी हे वस्त्र मानवा...

जरतारी हे वस्त्र मानवा…

  • नॉस्टॅल्जिया: श्रीनिवास बेलसरे

जगाच्या पाठीवर’ हा आजही अनेकांच्या स्मरणात असलेला सिनेमा आला होता १९६०ला. म्हणजे तब्बल ६२ वर्षांपूर्वी! त्यातली जवळजवळ सर्वच गाणी आजही लोकांच्या ओठावर आहेत. गीतकार होते ग. दि. मा.! या सिनेमाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जसे मनोजकुमारच्या सिनेमात ‘सबकुछ मनोजकुमार’ असे असते तसेच इथे राजा परांजपे भैयांचे होते. दिग्दर्शक राजा परांजपे, लेखक राजा परांजपे आणि निर्मातेही राजाभाऊच!

तशी त्या काळी राजाभाऊ परांजपे ही मोठी हस्ती होती. त्यांच्या कोणत्याच सिनेमात सिनेमाचे संवादलेखन कुणी तरी मुद्दाम केले आहे, पटकथा कुणी तरी ‘रचली’ आहे, चटकदार संवाद जाणीवपूर्वक ‘पेरले आहेत’ असे वाटतच नसे. एखाद्या ठिकाणी, एखाद्याच्या घरात किंवा एखाद्या कार्यालयात अगदी नैसर्गिकपणे जे घडू शकते तेच राजाभाऊंच्या सिनेमात दिसायचे. जणू राजाभाऊ कोणतीही तयारी न करता अशा एखाद्या ठिकाणी नुसते हळूच कॅमेरा घेऊन गेलेत आणि त्यांनी तिथे जे घडले ते सगळे शूट करून आणले, असेच वाटायचे! इतका त्यांचा सिनेमा खरा वाटे!

या सिद्धहस्त मराठी कलाकाराने एकूण २९ सिनेमांचे दिग्दर्शन केले आणि २० सिनेमांत तर स्वत: कामही केले. आज किती मराठी प्रेक्षकांना हे माहीत असेल की, ‘मेरा साया’(१९६६) हा हिंदी सिनेमा राजाभाऊंच्या ‘पाठलाग’(१९६४) चा रिमेक होता! येत्या २४ एप्रिलला राजा परांजपेंचा ११३वा वाढदिवस येतो आहे. ‘पेडगावचे शहाणे’, ‘लाखाची गोष्ट’, ‘पाठलाग’, ‘हा माझा मार्ग एकला’, ‘आधी कळस मग पाया’, ‘सुवासिनी’, ‘पडछाया’, ‘आधार’, ‘ऊन पाऊस’, ‘पुढचं पाऊल’ असे एकापेक्षा एक सिनेमे देणाऱ्या या मराठी कलाकाराची आठवण निदान मराठी चित्रपटसृष्टीत तरी कितीजण ठेवतात बघू या!

‘जगाच्या पाठीवर’ची सगळी गाणी गदिमांनी अर्थात मराठीच्या वाल्मिकी मुनींनी लिहिली होती. एकेक गाणे ऐकले की, गदिमांना त्रिवार वंदन करावेसे वाटते. केवढी प्रतिभा, केवढी अचाट कल्पनाशक्ती, कसल्या चपखल उपमा आणि केवढे महान तत्त्वज्ञान गाण्यातल्या चार शब्दांच्या पेन ड्राइव्हमध्ये कोंबून बसवायची त्यांची जादू! गदिमांना शब्दप्रभू नाही म्हणायचे तर कुणाला? या सिनेमात गदिमांनी चक्क एक छोटीशी भूमिकाही केली होती. सिनेमात सुधीर फडके यांनी गायलेले एक अत्यंत सुंदर गाणे होते –

‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे…’

हे त्या वेळच्या समाजाचे सर्वसाधारण वास्तव गदिमांनी नेमक्या शब्दांत पकडले होते. त्या गाण्याशी सर्वांना आपली परिस्थिती जुळवून घेता यायची आणि कदाचित म्हणूनच ते अतिशय लोकप्रियही झाले होते. हल्ली जसे गगनचुंबी इमारत बांधताना मोठमोठ्या यंत्राचा वापर होतो, प्रचंड लोखंडी फाळ जमिनीत घुसवून मोठमोठ्या यंत्रांनीच माती उपसली जाते, खोल पाया खणला जातो, तसे औद्योगिक जगाने त्या काळी आपली राक्षसी नखे भूमातेच्या पोटात खुपसून तिची आतडी बाहेर काढून भौतिक सुबत्ता आणलेली नव्हती! त्यामुळे माणसाच्या जीवनात ‘एकच धागा’ सुखाचा असे. दु:खाचे धागे मात्र शंभर असायचे! कारण सगळ्याच गोष्टींची कमतरता होती. वस्तू कमी, नोकऱ्या कमी, पगार कमी, दळणवळण कमी, सुखाची सगळीच साधने कमी. त्यामुळे ‘चित्ती कितीही समाधान’ असले तरी भौतिक सुखाची वानवाच होती. म्हणून कवी गदिमांनी म्हटले होते –

‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे…
जरतारी हे वस्त्र माणसा
तुझिया आयुष्याचे…’

इथे गदिमा समग्र जीवनाचे तत्त्वज्ञान एका अगदी वरच्या पातळीवर जाऊन सांगत आहेत. ते म्हणतात, ‘मानवा, तुझ्या आयुष्याचे वस्त्र हे दोन धाग्यांनी विणलेले आहे. त्यात एक धागा सुखाचा आहे आणि शंभर धागे दु:खाचे आहेत. तू जरी या जगात असे हे जरतारी वस्त्र पांघरत असला तरीही येताना तू उघडाच येतोस आणि हे जग सोडून जातानाही तू उघडाच असतोस.’ खरे तर श्रीकृष्णाने गीतेत ज्याला ‘आत्म्याचे वस्त्र’ म्हटले आहे, ते शरीरही आपण इथेच सोडून जात असतो. मग ‘या जगातल्या व्यर्थ बडेजावासाठी कशाला खोट्या स्वप्नात रंगतोस रे?’ असा गीतकारांचा प्रश्न आहे.

पांघरसी जरी असला कपडा,
येसी उघडा, जासी उघडा…
कपड्यासाठी करिसी नाटक
तीन प्रवेशांचे…

आपली उपमा अधिक स्पष्ट करताना गदिमा किती चित्रमय शैली वापरून सगळे समजायला सोपे करून टाकतात ते पाहणे मोठे रंजक आहे. त्यांनी अलगद शेक्सपिअरने आयुष्याला दिलेली तीन अंकी नाटकाची उपमा सूचित केली आहे.

गदिमा म्हणतात, लहानपणी बाळाला कौतुकाने जी अंगडी-टोपडी घालतात, ती जणू शरीराचीच प्रतीके आहेत. त्या बाळाला काही कळत नसते. आई-वडील, आजी-आजोबा कौतुकाने जे काही घालतील, त्यात ते खूश असते. मात्र तरुणपणी एकंदरच शारीरभावना सर्वार्थाने तीव्र होते. आपले शरीर हा आपला प्रेमविषय झालेला असतो. मग यौवनातील व्यक्ती हौसेने रंगीबेरंगी कपडे परिधान करते. पण कपडे म्हणजे केवळ वस्त्र का? कविता गदिमांची आहे, त्यांना एवढा मर्यादित अर्थ कसा अपेक्षित असेल? त्यांचा अंगुलीनिर्देश आहे तारुण्यातील आसक्तीकडे, विषयात रममाण होण्याच्या वृत्तीकडे! त्याचे वर्णन ते फक्त तीन शब्दांत करतात,

रंगीत वसने तारुण्याची
मुकी अंगडी बालपणाची…
जीर्ण शाल मग उरे शेवटी,
लेणे वार्धक्याचे’

गदिमांची प्रत्येक उपमा किती यथार्थ आहे ते पाहा! म्हातारपणी शरीर थकलेले असते, ते झिजलेले, आकसलेले, छोट्याशाही आघाताला बाध्य झालेले असते. म्हणून ते वृद्धपणातील शरीराला जीर्ण शालीची उपमा देतात. शेवटी कवी स्वत:च अंतर्मुख होतो, कारण त्याला श्रोत्यालाही अंतर्मुख करायचे आहे. शेवटच्या कडव्यात स्वगतासारख्या ओळीत तो स्वत:लाच विचारतो? ‘हे माणसाच्या जीवनाचे असे सुख-दु:खाचा असमतोल निर्माण करणारे वस्त्र निर्माण करतो तरी कोण?’ तरीही किती विविधता असते या वस्त्रांत! कोणत्याच दोन माणसांचे आयुष्य सारखे असत नाही. अगदी जुळ्या भावंडांतही काही ना काही वेगळेपणा असतेच. इथे गदिमा थांबतात आणि स्वत:च्या प्रश्नाचे उत्तर देतात. तेच म्हणतात, युगानुयुगे माणसांच्या कोट्यवधी पिढ्यांच्या आयुष्याची वेगवेगळी वस्त्र विणणारा तो ‘वरचा’ विणकर तर अदृश्यच आहे.

या वस्त्रांते विणतो कोण?
एकसारखी नसती दोन…
कुणा न दिसले त्रिखंडात
त्या हात विणकराचे…’

असे अगदी साधे-साधे विषय घेऊन जुने कवी त्यातून जीवनाचा केवढा तरी गूढ अर्थ सहज सांगून जात. म्हणून तर ही अनमोल गाणी आठवायची. त्यासाठीच तर आपला हा ‘नॉस्टॅल्जिया’!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -