Sunday, July 14, 2024
Homeसाप्ताहिककोलाजसकारात्मकतेची ‘होळी’

सकारात्मकतेची ‘होळी’

  • गुलदस्ता: मृणालिनी कुलकर्णी

होळी हा हिंदू धर्माचा पारंपरिक सण असून होळीला सामाजिक, पौराणिक आणि सांस्कृतिकही महत्त्व आहे. होळी हा सण वसंत ऋतूत साजरा होत असल्याने तो रंगाचा, प्रेमाचा, नात्याचा सण असून हर्षाचा, उल्हासाचा, वसंताचा आणि मुख्यतः सकारात्मकतेचा आहे, हा उद्देशच आता विसरला जात आहे. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि पाचव्या दिवशी रंगोत्सव अशी तीन भागांत होळीच्या दिवसांची
विभागणी होते.

होळी हा लोकांद्वारे साजरा होणारा लोकोत्सव! वसंत ऋतूचे आगमन होणार असल्याने होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडाची विधिपूर्वक पूजा करून जाळण्यात येतात. होळी म्हणजे निसर्गाची संक्रमण अवस्था, बदलत्या ऋतूचा काळ. हिवाळ्याच्या अखेरीस सर्वत्र झालेल्या पानझडीमुळे वनश्री रिती झालेली असते. सगळीकडे पडलेला उदास पालापाचोळा, वाळलेली लाकडे, झाडाच्या फांद्या हा जैविक कचरा एकत्र करून होळीत दहन केला जातो. होळीला ग्रामस्वच्छतेचा कार्यक्रम हाती घेऊन वसंताच्या स्वागतासाठी परिसर स्वच्छ केला जातो. आज लाकडे तोडली, कापली जातात हे योग्य नाही. काही ठिकाणी फांदी रंगीत कापडांनी पूर्ण झाकतात. होळीच्या पूजेत पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून ‘होळी रे होळी पुरणाची पोळी’ असा जयघोष होतो. होळीच्या पूजेत आपण अग्नीला शरण जातो. होळीत प्रत्येकाने नारळ, पुरणपोळी घालण्याऐवजी भुकेलेल्यास खायला द्या. माणसाच्या जठरामधला जठराग्नीही महत्त्वाचा आहे.

होळी – हिरण्यकश्यपू हा राक्षसी असुरांचा राजा, नकारात्मक विचारांचा प्रतीक. त्याची बहीण होलिका, वाईट प्रवृत्तीची. हिरण्यकश्यपूचा मुलगा, विष्णूचा निस्सीम भक्त, प्रल्हादाला मारण्यासाठी प्रज्वलित केलेल्या अग्निकुंडात राक्षसी होलिकेचाच अंत झाला. तो दिवस फाल्गुन शुद्ध पौर्णिमा! होळी पौर्णिमा!
प्रल्हादाचे नारायणाने रक्षण केले. या आनंदाप्रीत्यर्थ होळी सणाला प्रारंभ झाला. होलिकेचा अंत म्हणजेच वाईट प्रवृत्तीचा नाश. यातून वाईटाचा नाश हा वाईटानेच होतो आणि मनापासून केलेल्या कामाला यश मिळते. हा संदेश होळी देते.

पूर्वी होळी पेटल्यावर शंख ध्वनी होत असे. त्याऐवजी आज मनातील दुष्ट प्रवृत्तीला शांत करण्यासाठी काही लोक बोंबा मारतात. होळी हा दुष्ट प्रवृत्तीचा अमंगल, आचार-विचारांचा नाश करणारा सण! असत्याला जाळून सत्याचा, सकारात्मकतेचा प्रकाश पसरविणे हाच होलिका दहनाचा उद्देश! मनुष्याने नकारात्मकता जाळावी, हीच सकारात्मकतेच्या होळीमागची कल्पना. त्यातून मन निर्मल होईल.
नकारात्मकतेची होळी उदा. – १. मानसशास्त्रीयदृष्ट्या मनातील मळमळ काढा. २. स्वतःकडील लहान-लहान अहंकाराची होळी करा. ३. जबरदस्तीने रंग लावणे, पाण्याचे फुगे, बोंबा मारणे या विचारात पूर्णतः बदल करा. ४. निवडलेल्या क्षेत्रांत काम करताना क्षणाक्षणाला सकारात्मक परिणामांकडे पाहत पुढे चला. ५. नकारात्मक विचारापासून मुक्त होऊन सकारात्मक ऊर्जा अंगात भरा.
धुळवड – कुमकुमतिलक म्हणून होलिकेतील राख आणि गुलाल एकमेकांना लावून धुळवड साजरी केली जाते. धुळवडीला सारे एकत्र येऊन मुक्तपणे कोरड्या रंगांची उधळण करत, त्या त्या रंगांचा स्वीकार करत सारे मुक्त होतात. या दिवशी मानसिकदृष्ट्या मुक्त होणे महत्त्वाचे असते. हाच हर्षोत्सव! आज धुळवडीची लौकिकता काही ठिकाणी घसरली आहे.

रंग हा होळीच्या उत्सवातील सर्वांत आनंदाचा भाग! रंगपंचमी सृष्टीला नवा रंग देते. होळीची नकारात्मकता दूर करत वसंत ऋतूच्या आगमनाची रंगीबेरंगी फुले, कोवळी पाने जीवनात सकारात्मकता आणते. निसर्गाचे खुललेले सौंदर्य पाहतानाच रंगांचे महत्त्व लक्षात येते. रंगाचा प्रकाशाशी दाट संबंध आहे. जगात रंग आहे म्हणूनच जग सुंदर आहे.

बालवयातील खोडकर श्रीकृष्णाला राधेसमोर स्वतःचा सावळा रंग जाणवतो. मुलाला शांत करण्यासाठी यशोदामाता राधेच्या चेहऱ्याला रंग लावायला सांगते, ज्यामुळे दोघांचे रंग सामान होतील. येथूनच रंग लावण्याच्या खेळाला सुरुवात झाली. नंतर ती परंपरा बनली. रंग उधळण्याची मजा खरंच अद्भुत आहे. रंग ही प्रेमाची अभिव्यक्ती बनते. म्हणूनच म्हणतात, “बुरा ना मानो, होली हैं।”

धूलिवंदनाला रजा असल्याने सारे धुळवडीलाच रंग खेळतात. चेहऱ्याला लागलेल्या रंगामुळे आपण एकमेकांना ओळखूही शकत नाही. आपण सारे एक आहोत, ही एकात्मकतेची आणि बंधुत्वाची भावना रंग निर्माण करते. रंगपंचमी हा रंगांचा सण आहे, पाण्याचा नाही. रंग लावणे आणि रंग मारणे यात फरक आहे. रासायनिक रंगामुळे आणि इतरही कारणामुळे बरेचजण धुळवडीपासून दूर राहणेच
पसंत करतात.

विज्ञानाच्या मते होळी हा प्राचीन अग्नी उत्सव होय! अग्नी पूजा हा परंपरेचा आविष्कार. अन्न शिजविताना उष्णता देणाऱ्या अग्नीची पूजा. पंचतत्त्वांमध्ये अग्नीचे स्थान महत्त्वाचे आहे. अग्नी दाहक आहे. जे जे भक्ष मिळेल त्याला भस्मसात करण्याची ताकद अग्नीत आहे. त्याच्या ठिकाणी केवळ शुद्धता शिल्लक राहते. अशुद्धता संपूर्ण नष्ट होते. म्हणूनच अनेक संकटे झेलून मिळालेला विजय महत्त्वाचा ठरतो. भक्त प्रल्हादाला अनेक प्रकारे मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्याची ती अग्निपरीक्षा होती. सीतामाईने अग्निपरीक्षा दिली होती. सोन्याची शुद्धता अग्नीत तपासली जाते. अग्निदिव्य, अग्निपरीक्षा या संज्ञा यातून तयार झाल्या असाव्यात.

कोकणातली होळी वेगळ्याच वैशिष्ट्याने सजते. दर वर्षी शिमग्याला मुंबईहून गावाला जाणारे अनेक आहेत. शिमग्याचा त्यांच्या अंगात उत्साह संचारतो. होळीच्या दिवसांत देवळाच्या बाहेर होळी पेटवितात. शिमग्याला पालखीतून देव प्रत्येकाच्या अंगणी, भक्तांची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी येतात. भक्तांना देवाकडून मिळालेल्या संरक्षणाने वर्षभराचे कष्ट सारे विसरतात. देवाच्या जयजयकाराचा सभोवताल दणाणतो.

होलिकाप्रमाणेच ढुण्ढा, पुतना या राक्षसीण गावात लहान मुलांना त्रास द्यायच्या. त्यांना गावातून हाकलून देण्यासाठी ठिकठिकाणी आगी लावण्यात आल्या होत्या. भगवान शंकर तपात असताना आपल्याला कोण चंचल करतोय, हे पाहण्यासाठी डोळे उघडताच कामदेव जळून गेला. यासाठी उत्तरेत पूतनेला, दक्षिणेत कामदेवाचे होळीच्या रात्री दहन केले जाते. जबरदस्तीच्या वर्गणी, रात्रीची ओली पार्टी, दुसऱ्या दिवसाचे आजचे रूप पाहता अनेकजण होळीपासून दूर जात आहेत. तरी होळी सण, अग्निपूजा झालीच पाहिजे. होळी हेच सांगते, ‘जीवनात चांगले आचरण ठेवा, सत्यवादी राहा आणि सकारात्मकतेने होळी साजरी करा.’

mbk1801@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -