Sunday, July 21, 2024
Homeसाप्ताहिककोलाजकेसांचे आरोग्य

केसांचे आरोग्य

 • हेल्थ केअर: डॉ. लीना राजवाडे

रेशमी जुल्फे” या ओळी असोत किंवा “मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे” हे गीत असो. स्त्रीच्या सौंदर्यात मोलाचा वाटा असणारे असे हे केस. या “केसांचे आरोग्य” हाच आजच्या लेखाचा विषय आहे.
केस हा अस्थी धातूचा मल सांगितला आहे. हाडे तयार होत असताना त्यांच्यापासून केस, नखे या गोष्टी तयार होतात. त्यामुळे हाडांच्या मजबुतीवर केसांची बळकटी अवलंबून असते.

केसाचे साधारण प्रकार – कुरळे, सरळ
केसाचा रंग – काळा, पिंगट
केसांचे कार्य :  केसांमुळे त्वचेच्या तापमानाचे नियंत्रण होते.

थंड हवेमध्ये केसांची मुळे स्नायूच्या आकुंचनामुळे उचलली जाऊन केसांच्या आवरणाची जाडी वाढते व थंडीपासून संरक्षण होते. केसांमुळे आघातापासून संरक्षण मिळते.

केसाच्या सामान्य तक्रारी – केस गळणे, कोंडा होणे, केस रूक्ष किंवा राठ होणे.
याखेरीज केसाच्या गंभीर समस्या – अकाली केस गळणे, पिकणे·

या समस्या जाणवण्यामागची प्रमुख कारणे –

 • कौटुंबिक इतिहास
 • हार्मोनल सायकलमध्ये बिघाड
 • आजाराचा भाग-मोठा ताप येऊन गेला आहे, तर त्यानंतर शक्ती कमी होण्याने
 • औषधांचा साइड इफेक्ट
 • प्रदूषण
 • रेडिएशन थेरपी
 • मानसिक ताण
 • हेअर स्टाइलिंग आणि ट्रीटमेंट याचा
  अतिवापर
 • केसाच्या समस्या अधिक गंभीर होण्याची प्रमुख कारणे
 • वय
 • वजन खूप कमी होणे
 • डायबेटिस
 • ताण
 • कुपोषण

हे विस्ताराने सांगण्याचे कारण, केसांवर अनेक गोष्टी परिणाम करतात. त्यापैकी काही गोष्टींवरच उपचार करता येतात. त्यात सातत्य मात्र आवश्यक असते. ‘पी हळद हो गोरी’ असा कोणताच उपाय करता येत नाही. केसांवर प्रदूषणामुळे होणारे परिणाम यासाठी उपचार करता येतात.

आज जगात स्पेन, जपान, स्वीडन हे पहिल्या क्रमांकावर आहेत, पण त्याच्यापाठोपाठ भारत, रशिया, फ्रान्सही दुसऱ्या क्रमांकावर आहेत. केसासंबंधी उत्पादने तयार करण्यात आज अनेक भारतीय कंपन्यांची चांगली उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत.

केस चांगले राहावे यासाठी सामान्य उपचार –

 • केस नियमित कोमट पाण्याने धुवावेत. खूप गरम पाणी केस धुवायला वापरू नये.
 • डोक्यावर केसाच्या मुळांना तेल लावणे. नाकात तूप सोडणे, ·माका, आवळा, नागरमोथा यांचा पाणी, गुलाबपाणी – मध एकत्र करून लेप करणे. जास्वंद जेल, कोरफड जेल याचाही कंडिशनर म्हणून फायदा होतो.
 • अरोमाथेरपीचाही उपयोग होऊ शकतो. जेरेनियम, लव्हेंडर यांचा वापर नियमित केसांच्या पोषणासाठी चांगला होतो. केसांना चमक येण्यासाठी केस धुतल्यावर फायनल रिन्स म्हणून रोझमेरी, ऑरेंज जास्वंद जेलबरोबर वापरावे.

केसातील उवा, लिखा होण्यावर उपाय –

 • सीताफळ बियांची पावडर, तुळस, कडुलिंब यांचा कोरफड जेलसोबत लेप करावा.
 • अतिघाम येणे, विशेषकरून डोक्यात येणे, याने डोक्यातील उष्णता वाढते. त्यावर वरील उपाय फायदेशीर ठरतात. खाण्यात हाडांना बळकटी देणारे पदार्थ ठेवावेत. नारळ, तीळ, मेथ्या यांचा समावेश आहारात जरूर करावा.
 • योग्य आहार, वनौषधींचा सल्ल्याने वापर, केसांची निगा आणि व्यायाम याने केसांचे आरोग्य सांभाळता येते.
 • समतोल आणि पोषक आहार, नियमित व्यायाम, केसांच्या  प्रकाराला अनुकूल अशी प्रसाधनं इत्यादी गोष्टी केसांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करतात. केसांची योग्य खबरदारी न घेतल्यास केस रूक्ष होणे, टोकाशी दुभंगणे, निस्तेज दिसणे इत्यादी त्रास उद्भवतात. शरीरातले रक्ताभिसरण योग्य पद्धतीने होण्यावरही केसांचे आरोग्य  अवलंबून असते.
 • शिरोधारा ही एक उत्तम चिकित्साप्रणाली आहे. ज्याचा उपयोग केसांचेच नव्हे, तर डोक्यातील एकूणच रक्ताभिसरण सुधाण्यासाठी होतो. फक्त ती वैद्यांच्या सल्ल्याने करावी. जसा शंकराच्या पिंडीवर सतत अभिषेक केला जातो, तसाच औषधीसिद्ध दूध किंवा तेलाची धारा यात केली जाते. मानसिक ताण कमी होण्यासाठी, शांत झोप लागण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो. त्याने डोक्यातील रक्ताभिसरण सुधारून केसांचे आरोग्य सुधारायला मदत होऊ शकते.
 • मेंदूचा रक्तपुरवठा सुधारण्यासाठी सर्वांगासन, सूर्यनमस्कार, दीर्घ श्वसन, याचाही नियमित सराव केल्यास केसांचे आरोग्य सुधारते.

थोडक्यात, काळजीपूर्वक दक्षता घेतल्यास सुंदर रेशमी चमकदार केस आरोग्यपूर्ण सौंदर्यात नक्कीच भर घालतील.

leena_rajwade@yahoo.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -