मुरबाड (प्रतिनिधी) : मुरबाड तालुक्यात भिमाशंकर, कळसूबाई व हरिश्चंद्रगड असे तीन अभयारण्य मोडत असून मुरबाड (पूर्व ) व (पश्चिम), टोकावडे (दक्षिण) व (उत्तर) या चारही वनपरीक्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणात वणवे लागण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या वणव्यांकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने पर्यावरणाचे खूप मोठे नुकसान होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून चारही वनपरीक्षेत्रातील राखीव जंगलात वारंवार वणवे लागत आहेत. त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असून या वणव्यांमुळे वनसंपदा नष्ट होण्याबरोबरच वन्यप्राण्यांनाही याची झळ सोसावी लागत आहे. हे वणवे लावले जातात की, आपोआप लागतात याचा शोध घेणे गरजेचे असून येथील परीक्षेत्रातील वन अधिकारी याबात कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्यामुळे वणवे लागण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
गेल्या काही वर्षांपासून वन विभागाच्या दुर्लक्षामुळे वणवा लागत असल्याने पर्यावरणास वेठीस धरण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. त्यावर संबंधित वन विभागाने गावोगावी सखोल प्रबोधन व मार्गदर्शन करण्याची नितांत गरज असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. वन क्षेत्रातील वणवा लावणाऱ्यावर कारवाई कडक करावी. दरवर्षी वणवा लागण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे, ही अतिशय दुर्दैवी बाब असून, यावर उपाय शोधून पर्याय निवडावा व पर्यावरणाचे होणारे नुकसान टाळावे, अशी अपेक्षा पर्यावरण प्रेमी व स्थानिक नागरिकांमधूनही होत आहे.
तसेच एखाद्या ठिकाणी वणवा लागला असल्यास हे कळवण्यासाठी फोन केला तर एकही वनकर्मचारी अधिकारी प्रतिसाद देत नाहीत. फोनही उचलत नाहीत त्यामुळे वनसंरक्षणात जनजागृतीच्या अभावाने व अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या विभागात वणवा लागत असल्याचा ठपका वनअधिकाऱ्यांवर ठेवण्यात येत आहे. तसेच सुस्त पडलेल्या वनविभागाने वणव्यांचा विषय गांभिर्याने घ्यावा व दोषी आधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
दरम्यान याबाबत पर्यावरण प्रेमी प्रा. शिक्षक भालचंद्र गोडांबे, यांनी सांगितले की जागतिक वन्यजीव दिनानिमित्ताने सर्वजण शपथ घेऊ की, वनसंपदा, वन्यजीव ही राष्ट्रीय संपत्ती आहे. तिचे जतन व संवर्धन करणे ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यासाठी जनजागृतीची नितांत गरज आहे.