Wednesday, March 19, 2025
Homeसाप्ताहिककोलाजअखंड सावधानता...!

अखंड सावधानता…!

  • संवाद: गुरुनाथ तेंडुलकर

इसापनीतीमध्ये एक गोष्ट आहे. एका कोल्ह्याने एका विहिरीच्या काठावर बसलेला एक कोंबडा पाहिला. दबकत दबकत तो त्याच्या जवळ गेला आणि एकदम कोंबड्याच्या अंगावर उडी मारली. पण… पण कोल्ह्याचा अंदाज चुकला आणि तो विहिरीत पडला. कोंबडा तर मिळाला नाहीच, पण पाणी आटून गेलेल्या विहिरीत पडल्यामुळे कोल्ह्याचं अंग सडकून ठेचकाळलं. जरा सावरल्यानंतर त्या कोल्ह्यानं उंच उड्या मारून विहिरीच्या बाहेर पडायचा प्रयत्न केला, पण त्याच्या ध्यानी आलं की, उंच उडी मारून विहिरीतून बाहेर पडणं केवळ कठीण नव्हे, तर अशक्यच आहे. आतून विहिरीच्या भिंती तुरुंगासारख्या उंच उंच दिसत होत्या. कोल्ह्यानं उड्या मारणं थांबवलं आणि गाणं म्हणायला सुरुवात केली.

विहिरीतून येणारं गाणं ऐकून तिथून जाणाऱ्या एका उंटानं विहिरीत डोकावून पाहिलं. उंटाला पाहून कोल्हा म्हणाला, “उंट भाऊ, या या. आत या. इथलं पाणी प्या. काय मधुर पाणी आहे म्हणून सांगू. थंडगार अन् निर्मळ. मला तर इथून जाऊच नये असं वाटतं. या नं आत…”

कोल्हाचं बोलणं ऐकून उंटाने मागचा- पुढचा विचार न करता विहिरीत उडी टाकली. पाणी प्यायला आणि नंतर त्याच्याही लक्षात आलं की, इथून बाहेर पडणं अवघड आहे. त्याने कोल्ह्याला विचारलं,
“अरे कोल्ह्या मी आत तर आलो. पण इथून बाहेर कसा पडू? माझं डोकं जेमतेम या विहिरीच्या कठड्यापर्यंत लागतंय. मी बाहेर कसा जाऊ?”

कोल्ह्याने डोकं खाजवलं नि म्हणाला, “सोप्पं आहे. तुम्ही खाली बसा. मी तुमच्या पाठीवर बसतो. नंतर तुम्ही या दगडावर उभे राहा आणि मान विहिरीच्या काठाशी टेकवा. मी तुमच्या मानेवर चढून बाहेर पडतो आणि बाहेरून तुम्हाला ओढून वर घेतो.” उंटाने तसं केलं. उंटाच्या मानेवर चढून कोल्हा विहिरीबाहेर पडला आणि एकदाही मागे वळून न बघता धूम ठोकून पळून गेला. आता याच गोष्टीचं बघा ना, बिच्चारा उंट बिच्चारा कसला, मूर्ख उंट फसला. कोल्ह्यानं त्याला फसवलं.

फसणारा आणि फसवणारा यांच्यातील संबंधाचा नीट विचार केला, तर एक गोष्ट ध्यानात येते की, फसणारा फसतो, म्हणूनच फसवणारा फसवू शकतो. फसवणारा माणूस हा फसणाऱ्या माणसापेक्षा अधिक हुशार, अधिक चतुर असतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचं म्हणजे फसणारा निर्बुद्ध असतो, अकलेनं कमी असतो म्हणून फसवला जातो. फसवणारा माणूस अनेकदा आपल्या देखण्या रूपानं, गोड बोलण्यानं आणि नकली अभिनयानं समोरच्या माणसावर छाप पाडतो. त्याला प्रभावित करतो. आपलं इप्सित साध्य करण्यासाठी अगदी खरं वाटावं असं बेमालूम खोटं बोलतो. खोटी सहानुभूती दाखवतो. मदतीचं आश्वासन देतो. विश्वास संपादन करण्यासाठी काही काळ मदतही करतो. फसणाऱ्याला वाटतं की, याच्यासारखा दुसरा माणूस नाही. केवढं करतोय हा माझ्यासाठी. मी काहीही न देता यानं मला आवळा दिला. पण त्या आवळ्याच्या बदल्यात त्यानं आपल्याजवळचा कोहोळा त्याने कधी काढून घेतला ते कळतही नाही. ज्यावेळी कळतं त्यावेळी खूप उशीर झालेला असतो.

फसणारा आणि फसवणारा या दोघांतलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे फसणारा माणूस हा निर्बुद्ध तर असतोच, पण आपण फार बुद्धिमान आहोत, असा त्याने स्वतःबद्दल ग्रह करून घेतलेला असतो. स्वतःला हुशार समजणाऱ्या माणसांना मूर्ख बनवणं अधिक सोप्पं असतं. फसवणारा बोलताना सांगतो, “तुमच्यासारखी सुशिक्षित आणि बुद्धिमान माणसं मला आवडतात.” किंवा हे सर्वसामान्य माणसाला समजणारच नाही. त्यासाठी जाणकार माणूसच हवा. त्याच्या या असल्या बोलण्यानं आपला अहंकार सुखावतो. आपण बुद्धिमान आहोत, जाणकार आहोत हे सिद्ध करण्याच्या नादात आपण बुद्ध कधी बनलो, हे आपल्याला कळतही नाही.

सहा महिन्यांत पैसे डबल करून देतो, असं सांगून लाखो नव्हे, तर कोट्यवधी रुपयांना गंडा घालणाऱ्या शेरेगर प्रकरणासारख्या बातम्या आपण वर्षानुवर्षं पेपरात वाचतो. पण तरीही माणसं अशा योजनांना अजूनही भुलतात. बळी पडतात. अशा फसलेल्या माणसांना मी स्वतः भेटलोय. त्यांनी सांगितलं की, सुरुवातीला आम्ही हजार रुपये दिले. सहा महिन्यांनंतर त्याचे दोन हजार परत मिळाले. नंतर आम्ही पाच हजार दिले. त्यानंतर सहा महिन्यांनंतर दहा हजार मिळाले आणि नंतर कर्ज काढून पाच लाख दिले ते मात्र सगळे बुडाले…! सुरुवातीला विश्वास संपादन करून नंतर फसवणूक झाल्याचे असे अनेक
प्रकार होतात.

शेअरबाजारात टीप देऊन गुंतवणूक करायला लावणारे तथाकथित तज्ज्ञसुद्धा याच प्रकारातले. अलीकडच्या काळात अनेक बुबा-बापू आपण प्रत्यक्ष परमेश्वराचे अवतार असल्याच्या थाटात वावरतात. काही भाडोत्री पत्रकारांना हाताशी धरून आपल्या दैवी चमत्काराच्या कथा प्रस्तुत करतात. रसाळ शब्दात प्रवचनं करतात. स्वतःचे दर्शनसोहळे घडवून आणतात… रंजले गांजलेले भोळेभाबडे लोक त्या बुवा-बापूच्या सोंगाला फसतात. त्याच्या भोवतीच्या वातावरणाला भुलतात. इतर अनेकजणांनी सांगितलेल्या चमत्कारिक कथांवर विश्वास ठेवतात, एवढंच नव्हे, तर त्या बुवा-बाबा-बापूला चक्क देव मानतात. त्याची अंधभक्ती करण्यात आपला वेळेचा आणि पैशांचा अपव्यय करतात. अशा प्रकारची बुवाबाजी हीदेखील एक प्रकारची फसवणूकच असते.

फसवणुकीचे हे वेगवेगळे प्रकार अगदी प्राचीन काळापासून चालत आले आहेत. अगदी रामायण-महाभारताच्या काळापासून. कांचनमृगाच्या मोहानं सीतेनं रामाला हरणामागे जायला सांगितलं. त्यानंतर गोसाव्याचं सोंग घेऊन आलेल्या रावणाला ती ओळखू शकली नाही. लक्ष्मणानं आखून दिलेली मर्यादारेषा तिनं नकळत ओलांडली आणि पुढे रामायण घडलं. रावणाने सीतेची केलेली फसवणूक होण्यामागे सीतेचा कांचनमृगाचा मोह कारणीभूत होता. तसंच रामालाही ‘अशा प्रकारचे सोन्याचे
हरिण नसते.’ याचा पडलेला विसरही कारणीभूत होता.

महाभारतात द्यूत खेळताना शकुनीचं कपट न कळल्यामुळे युधिष्ठिर फसला. जुगारात सर्वस्व हरला. स्वतःसकट सर्व भाऊ, बायको आणि संपूर्ण राज्य पणाला लावून गमावून बसला. युधिष्ठिरावर ओढावलेल्या आपत्तीमागे त्याची स्वतःची खोटी जिद्द आणि अहंकार कारणीभूत होता.

फसवणूक झाली की, आपण नेहमी फसवणाऱ्याला दोष देतो. पण फसणाराही तेवढाच दोषी असतोच. फसणाऱ्याने नीट पारखून न घेता नको त्या माणसावर नको तेवढा विश्वास टाकलेला असतो. नको त्या गोष्टीचा नको तेवढा मोह धरलेला असतो. नको त्या ठिकाणी बुद्धी गहाण टाकलेली असते. पण जी माणसं सतर्क असतात, त्यांना मात्र कुणीही फसवू शकत नाही. शिवाजी महाराजांच्या चरित्रातले एकूण एक प्रसंग आठवून पाहा. शिवाजी महाराजांना फसवून मारण्याचे अनेकदा प्रयत्न झाले. पण प्रत्येक वेळी शिवाजी महाराज त्यांच्यासाठी लावलेल्या सापळ्यातून सहीसलामत बाहेर निसटले. अनेकदा तर त्यांनी त्यांना फसवणाऱ्यांनाच फसवल्याची उदाहरणं आहेत. आग्र्याहून सुटका करून घेताना त्यांनी मिठाईच्या पेटीतून पलायन केलं होतं, तर कात्रजच्या घाटात बैलांच्या शिंगाना मशाली बांधून शत्रूची दिशाभूल केली होती. मारायला आलेल्या अफजल खानाच्या पोटात वाघनखं खुपसून कोथळा बाहेर काढला होता, तर लालमहालावर अचानक छापा मारून शाहिस्तेखानाची बोटं छाटून त्याला पळवून लावला होता.

थोडक्यात काय, तर जगात फसणारे आहेत म्हणून फसवणारे फसवतात. म्हणूनच आपण फसवले गेल्यानंतर पश्चात्ताप करीत बसण्यापेक्षा आपण फसवले जाणार नाही, याची खबरदारी घेऊन त्यानुसार आचरण करणं महत्त्वाचं. आपली फसवणूक होऊ नये यासाठी कसं वागावं, हे विशद करताना संस्कृत सुभाषितकार म्हणतात.

सौहार्द व्यवहाराश्च प्रवृत्तिं प्रकृतिं नृणाम्।
सहवासेन तर्कैश्च विदित्वा विश्वसेत्तति ॥

अर्थ : सहवास आणि विशेष निरीक्षण यांद्वारा लोकांचा स्नेह, प्रवृत्ती, प्रकृती, वागणूक सर्व काही जाणून नंतरच त्यांच्यावर विश्वास ठेवावा. उतावीळपणे भेटेल त्याच्याबरोबर सख्य करू नये, भेटेल त्या प्रत्येकाशी मित्रत्वाचे नाते जोडू नये. मैत्री करण्यापूर्वी त्या माणसाची पूर्ण माहिती जाणून, छाननी करून, पारखून नंतरच त्या माणसाबरोबर मैत्री करावी, की नाही हे ठरवावं. या व्यवहारी जगात वावरताना कुणी आपल्याला फसवू नये म्हणून काय करायला हवं, हे समर्थ रामदास स्वामी दोनच शब्दांत सांगतात.

अखंड सावधानता…!

शिवाजी महाराजांचं सैन्य संख्येनं कमी असूनदेखील महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. कारण ते कधीच फसले नाहीत. याचं प्रमुख कारण म्हणजे…

अखंड सावधानता…!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -