लातूर: काँग्रेसचे नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भावाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. विशेष म्हणजे ही आत्महत्या त्यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या घरीच केली आहे. चंद्रशेखर पाटील चाकूरकर (वय ८१ वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या चाकूरकरांच्या भावाचे नाव आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पोलिसांकडून पंचनामा करण्यात येत आहे. तर चंद्रशेखर चाकूरकर यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे.
चंद्रशेखर चाकूरकर हे शिवराज पाटील चाकूरकर यांचे चुलत भाऊ आहेत. हे लातूर शहरातील आदर्श कॉलनी भागात राहत होते. दररोज सकाळी ते फिरायला घराबाहेर पडायचे. त्यानंतर ते स्वत:च्या घरी जाण्याऐवजी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या घरी जात होते. तिथे चहा पाणी झाल्यावर तेथील पेपर वाचत बसणे ही त्याची खूप वर्षांपासूनची सवय होती. त्यानंतरच ते बाजूलाच असलेल्या स्वतःच्या घरी जात होते. तर शिवराज पाटील चाकूरकर यांच्या कुटुंबातील व्यक्ती हे लातूर येथील निवासस्थानी कधीतरीच हजर असतात. मात्र, आज शिवराज पाटील चाकूरकर यांचे चिरंजीव शैलेश पाटील हे सकाळी घरातच होते.
दरम्यान सकाळी फिरून आल्यावर नित्याप्रमाने चंद्रशेखर चाकूरकर हे शिवराज चाकूरकर यांच्या घरी आले. घरात आल्यावर शैलेश पाटील यांनी त्यांना चहा घ्या मी आवरून येतो, असे सांगून निघून गेले. मात्र काहीवेळाने गोळीचा आवाज झाला. त्यामुळे घरातील नोकर आणि शैलेश पाटील हे धावत हॉलमध्ये आले. यावेळी त्यांना तिथे चंद्रशेखर पाटील चाकूरकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले.
केला होता ‘गुड बाय’ चा मेसेज
चंद्रशेखर चाकूरकर आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी परिचित असलेल्या अनेकांना ‘गूड बाय’ असा मॅसेज करत ‘गूड बाय’ असा स्टेटसही व्हाट्स अॅपवर ठेवला होता. त्यामुळे त्यांचे आत्महत्या करण्याचे निश्चित झाले होते असाही संशय व्यक्त केला जात आहे.