ग्वाल्हेर (वृत्तसंस्था) : इराणी चषक स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यात भारताचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने ऐतिहासिक कामगिरी केली. ग्वाल्हेरमध्ये मध्य प्रदेशविरुद्धच्या सामन्यात शेष भारताकडून खेळताना यशस्वीने पहिल्या डावात द्विशतक, तर दुसऱ्या डावात शतकी खेळी खेळली. इराणी चषकात एका सामन्यात द्विशतक आणि एक शतक झळकावणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
यशस्वी जयस्वालने मध्य प्रदेशविरुद्ध पहिल्या डावात २५९ चेंडूंत २१३ धावा केल्या. यादरम्यान त्याने ३० चौकार आणि ३ षटकार लगावले. यशस्वी जयस्वालची झंजावाती फलंदाजी दुसऱ्या डावातही कायम राहिली. तिसऱ्या दिवशी संघाचा कर्णधार मयंक अग्रवाल खाते न उघडताच बाद झाला. अशा स्थितीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या यशस्वी जयस्वालने पुन्हा दमदार फलंदाजी केली. त्याने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ५३ चेंडूंत ५८ धावा केल्या. सामन्याच्या चौथ्या दिवशी धडाकेबाज फलंदाजी करत त्याने दुसऱ्या डावातही आपले शतक पूर्ण केले.