देशासह राज्यातही सध्या परीक्षांचा माहोल सुरू झाला असून या परीक्षा जर चांगल्या पद्धतीने घेण्यात आल्या, तर परीक्षांचे निकाल निकोप पद्धतीने लागतील. कोणावरही अन्याय होणार नाही. परीक्षेत योग्य मार्गाने यश प्राप्त झाल्यावर चांगले नागरिक उदयास येतील. हेच नागरिक राज्य आणि देशाचे उज्ज्वल भवितव्य आहेत. ही बाब ध्यानी घेऊन परीक्षा पद्धतीत सुधारणा घडवून आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी कंबर कसली. त्यातूनच पेपरफुटीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचा आणि ‘कॉपीमुक्त’ अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षेत पेपर फोडण्यास आणि कॉपी करणाऱ्यास आता सुट मिळणार नाही, हे सरकारकडून निश्चित करण्यात आले आहे.
राज्य सरकारने १०वी आणि १२वीच्या परीक्षांबाबत महत्त्वाची अधिसूचना जारी केली आणि परीक्षांचे नियम कडक करण्यात आले. उमेदवाराने परीक्षेचा पेपर फोडण्याच्या उद्देशाने तो चोरल्यास, मोबाइल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमातून परीक्षेचा पेपर मिळविला अन्यथा विकत घेतला किंवा इतरत्र पाठवला, तर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पुढील पाच परीक्षांसाठी विद्यार्थ्याचे निलंबन करण्यात येणार आहे. त्यासोबतच उमेदवारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबतची पूर्ण तयारी केली असली तरी गेल्या दोन वर्षांत झालेल्या परीक्षांचे अनेक नियम यंदा बदलण्यात आले आहेत. त्यासोबतच फसवणूकमुक्त परीक्षा आयोजित करण्यासाठी काही कठोर नियमही जाहीर करण्यात आले आहेत. गेल्या दोन वर्षातील कोरोनाची परिस्थिती पाहता माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने काही बदलांसह विद्यार्थ्यांना काही प्रमाणात सूट दिली होती. मात्र आता हा नियम बदलून पूर्वीप्रमाणेच परीक्षा घेण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. त्यानुसार यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा बंद करण्यात आल्या आहेत. शाळांनी होम सेंटर यंत्रणा बंद केली आहे. २५ टक्के कमी अभ्यासक्रम रद्द करून १०० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्यात येणार आहेत. उत्तरपत्रिका लिहिण्यासाठीचा अर्ध्या तासाचा अतिरिक्त वेळही रद्द करण्यात आला आहे. यंदाच्या परीक्षेत बसलेले सर्व विद्यार्थी पूर्णवेळ त्याच शाळेत उपस्थित राहणार आहेत. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात घालून दिलेल्या नियमांचे विद्यार्थ्यांनी पालन न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
एवढे सर्व करून पेपरफुटी आणि ‘कॉपीमुक्त’ अभियानाच्या सर्व उपाययोजना सध्या सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेतही फोल ठरल्याचे चित्र दिसले. जळगावात तर पहिल्याच दिवशी मराठीच्या पेपरला बहुतांश परीक्षा केंद्राबाहेर कॉप्यांचा पाऊस पडलेला दिसला. पेपर फुटल्यामुळेच काफीच्या प्रकारांना ऊत येतो हे नक्की. बारावी परीक्षेप्रमाणे दहावीच्या ‘माय मराठी’च्या पेपरलाही सर्रास कॉपी सुरू असल्याचे चित्र होते. दहा ते पंधरा फुटांच्या भिंतींवर चढून तरुणांकडून कॉपी पुरविण्यासाठी धडपड सुरू होती़ नूतन मराठा विद्यालयाच्या मागील बाजूने खिडक्यांमधून अक्षरश: कॉप्या बाहेर फेकल्या जात होत्या, तर विद्यार्थ्यांची अंगझडती घेतल्यानंतर केंद्रात प्रवेश देण्यात आला़ तासभर परीक्षा केंद्रांवर मराठी विषयाचा पेपर सुरळीत चालला़ मात्र, दुपारी १२ नंतर बहुतांश केंद्रांवर अक्षरश: कॉप्यांचा पाऊस पडला़ केंद्राच्या आवारात जरी शांतता असली, तर वर्गांमध्ये सर्रास कॉपी सुरू होती़ नूतन मराठा विद्यालयाच्या मागील बाजूला कॉपी पुरविण्यासाठी तरुणांची दुपारी १ वाजता चांगलीच गर्दी झाली होती़ त्यावेळी काही तरुण चक्क दहा ते पंधरा फूट उंचीच्या पत्र्यांवर चढून कॉपी पुरवित होते़ दुसरीकडे काही तरुण दगडात कॉपी अडकवून खिडक्यांच्या दिशेने फेकत होते. हा प्रकार कळताच केंद्र संचालकांनी पोलिसांना माहिती दिली व पोलिसांचे पथक विद्यालयात धडकले. त्यानंतर खिडक्यांमधूनही कॉपी केल्यानंतर त्या कागदांचा पाऊस वर्गाबाहेर पडतानाचे दृश्य दिसले. काही ठिकाणी पोलिसांनी परीक्षा केंद्र परिसरात गस्त लावत तरुणांना पिटाळून लावले़, तर एका ठिकाणी पोलीस पथकाने तब्बल तीनशे ते चारशे मीटरपर्यंत तरुणांचा पाठलाग करून त्यांना पिटाळून लावले. नाशिक विभागात कॉपीमुक्त परीक्षा अभियानांतर्गत घेण्यात येत असलेल्या परीक्षेच्या वेळी एकही गैरप्रकार आढळून आला नाही. ही व अशी अनेक ठिकाणांहून आलेल्या बातम्या दिलासादायक म्हणायला हव्यात.
नाशिक, नंदूरबार आणि जळगाव जिल्ह्यात गैरप्रकाराचा एकही प्रकार उघडकीस आला नसला तरी धुळे जिल्ह्यात मात्र कॉपीमुक्त अभियानाला गैरप्रकाराचे गालबोट लागलेच, तर औरंगाबाद बोर्डाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरला पहिल्याच दिवशी एका शाळेत विद्यार्थ्यांना पेपरच्या कॉप्या पुरविण्याच्या उद्देशाने पेपरचे फोटो काढून काही शिक्षकच त्याच्या कॉप्या बनवत असताना आढळले. त्या सहा शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातच शुक्रवारीही बुलढाण्यात बारावीचा पेपर फुटला. गणिताचा पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला. याप्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेतही नाराजी व्यक्त केली. बोर्डाकडून याबाबत तत्काळ दखल घेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बोर्डाकडून कॉपीमुक्त अभियान राबवले जात आहे. मात्र दुसराच पेपर फुटल्यामुळे राज्यभर याची चर्चा होत आहे. हा प्रकार म्हणजे कुंपणानेच शेत खाण्याचा किळसवाणा प्रकार असून असे जर होणार असेल, तर चांगल्या हेतूने तयार करण्यात आलेल्या नियमावलींना चक्क हरताळ फासला जाईल. हे प्रकार रोखण्यासाठी कठोरात कठोर शासन करून कायद्याचा धाक निर्माण केला गेला पाहिजे. त्यामुळेच पंतप्रधान मोदी व राज्यातील सरकारने हाती घेतलेल्या एक स्तुत्य उपक्रमाला गालबोट लागू नये याची काळजी घेणे हे सर्वांचेच आद्य कर्तव्य ठरते.
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…
निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन - वन मंत्री गणेश नाईक मुंबई : कोकणातील फळबागा आणि…
गागोदे खुर्द अनुसूचित जातीसाठी, १४ ग्रामपंचायतीत आदिवासी सरपंच पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत…
राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…