Monday, February 10, 2025
Homeताज्या घडामोडीमाझ्यावर हल्ला कुणी केला? सुत्रधार कोण?, हे मला माहिती आहे

माझ्यावर हल्ला कुणी केला? सुत्रधार कोण?, हे मला माहिती आहे

महापालिकेतील कोविड घोटाळा बाहेर काढल्यामुळे हल्ला

मनसे नेते संदीप देशपांडे यांचा गौप्यस्फोट

मुंबई : मुंबई महापालिकेतील कोविड घोटाळा बाहेर काढल्यामुळे माझ्यावर हल्ला झाला. या हल्ल्यामागील सुत्रधार मला माहिती आहे. मात्र, आता हल्ल्याबाबत पोलीस तपास सुरू असल्यामुळे यावर अधिक भाष्य करणार नाही, असा गौप्यस्फोट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपाडे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

संदीप देशपांडे म्हणाले, माझ्यावर हल्ला कुणी केला?, हे मला माहिती आहे. पोलिसांनी दोन हल्लेखोरांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून सगळे बाहेर येईलच. माझा मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. शिवाजी पार्कवर क्रिकेट खेळण्याच्या नावाखाली जे येतात, त्यांचे कोच कोण आहेत, याचा शोध पोलीस नक्कीच घेतील. मात्र, हल्ल्यामागचा सुत्रधार कोण?, हे मला माहिती असले तरी आताच यावर बोलणे उचित ठरणार नाही.

संदीप देशपांडे म्हणाले, हल्ला झाल्यानंतर मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक चौकशी केली. तसेच, सुरक्षेसाठी दोन पोलिस कर्मचारीही पाठवले. मात्र, माझी सरकारला नम्र विनंती आहे की, आम्ही अशा हल्ल्यांना भीक घालत नाही. त्यामुळे आम्हाला सुरक्षेची गरज नाही. सुरक्षा द्यायचीच असेल तर ज्यांनी माझ्यावर हल्ला केला, त्यांना सरकारने आता सुरक्षा पुरवावी, असा धमकी वजा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला आहे.

संदीप देशपांडे म्हणाले, मुंबई महापालिकेत कोविड काळात झालेला भ्रष्टाचार मी उघड करणार असल्याची कुणकुण कदाचित लागली असेल. ही विरप्पन गँग कोण आहे, हे सर्वांना माहिती आहे. कोविड सेंटर्सना गाद्या पुरवण्याचे काम दोन फर्म्सना देण्यात आले होते. कोविडपुर्वी यांचा टर्न ओव्हर केवळ १० लाख रुपये होता. नंतर त्यांचा टर्न ओव्हर कोटींपर्यंत गेला. या फर्म्स ‘देडिया’ या माणसाच्या आहेत. त्याचे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची भेट घेत त्यांना या घोटाळ्याची कागदपत्रे मी सोपवली होती. त्यानंतरच माझ्यावर हल्ला झाला. हा घटनाक्रम तुम्ही समजून घ्या, असे सूचक वक्तव्य संदीप देशपांडे यांनी केले.

तसेच, माझ्यावर कितीही हल्ले केले तरी कोविड काळातील मुंबई पालिकेतील भ्रष्टाचार मी समोर आणतच राहील. कोविड काळातील संपूर्ण भ्रष्टाचार मी समोर आणणार, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -