Wednesday, July 24, 2024
Homeमहत्वाची बातमीशिमगो इलो रे...चला गावाकं जावया...

शिमगो इलो रे…चला गावाकं जावया…

होळी निमित्त मध्य रेल्वेकडून कोकणवासियांसाठी विशेष गाड्या

मुंबई (प्रतिनिधी) : वर्षातील पहिल्या मोठ्या होळीच्या सणासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने होळी स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. होळीनिमित्ताने गावी जाणाऱ्या कोकणवासियांसाठी मध्ये रेल्वेकडून १२ अतिरिक्त ‘होळी स्पेशल ट्रेन’ चालवण्यात येणार आहेत. होळी हा सण कोकणात अनेक दिवस सुरू असतो. या सणासाठी प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पनवेलहून सावंतवाडी रोड व रत्नागिरी या दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. खरं म्हणजे मध्य रेल्वेने या गाड्यांबाबतचा निर्णय काही दिवस आधी घेतला असता तर अनेकांना त्याचा लाभ उठवता आला असता, अशी प्रतिक्रीया चाकरमान्यांमधून व्यक्त होत आहे.

त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते रत्नागिरी दरम्यान विशेष ३ सेवा असणार आहेत. त्यात ०११५१ विशेष गाडी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ७फेब्रुवारी रोजी रात्री ००.३० वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी सकाळी ९ वाजता पोहोचणार आहे. तर ०११५२ विशेष गाडी रत्नागिरी येथून ६ मार्च रोजी ६.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याच दिवशी दुपारी १३.५० वाजता पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड या स्थानकांवर थांबणार आहे.

त्याचप्रमाणे पनवेल – रत्नागिरी ४ विशेष सेवा असून त्यात ०११५३ ही विशेष गाडी ५ मार्च आणि ८ मार्च रोजी पनवेल येथून सायं.१८.२० वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे दुसऱ्या दिवशी ९मार्चला मध्यरात्री ००.२० वाजता पोहोचेल. तर ०११५४ ही विशेष गाडी रत्नागिरी येथून ४ मार्च आणि ७ मार्च रोजी सकाळी १० वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी सायं.१६.२० वाजता पोहोचेल. ही गाडी रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड आणि संगमेश्वर रोड या स्थानकांवर थांबणार आहे.

विशेष म्हणजे पनवेल – सावंतवाडी रोड या दरम्यान ४ विशेष गाड्या धावणार असून त्यात ०११५५ ही विशेष गाडी पनवेल येथून ४ मार्च आणि ७ मार्च रोजी सायं. १८.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.१० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. ०११५६ ही विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून ५ मार्च आणि ८ मार्च रोजी सकाळी ७.४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सायं. १७.२० वाजता पनवेल येथे पोहोचेल. ही विशेष ट्रेन रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबणार आहे.

तर रत्नागिरी – लोकमान्य टिळक टर्मिनस वन वे विशेष गाडी ०११५८ ही रत्नागिरी येथून ९ मार्च रोजी सकाळी ६.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १३.३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. ही एक्स्प्रेस संगमेश्वर रोड, अरावली रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा, पनवेल आणि ठाणे या स्थानकांवर थांबणार आहे. या सर्व विशेष एक्स्प्रेसमध्ये १८ शयनयान, २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड, ब्रेक व्हॅन असणार आहेत. या विशेष गाड्यांचे आरक्षण सुरू झाले आहे. सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर या विशेष गाड्यांचे बुकिंग सुरू आहे. अधिक माहितीसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करावे असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -