Wednesday, July 3, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सबनावट इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तरुणीशी संधान

बनावट इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तरुणीशी संधान

  • गोलमाल: महेश पांचाळ

पंचवीस वर्षांची तरुणी. उच्चशिक्षित. एका नामांकित सीएच्या फर्ममध्ये नोकरीला. उच्चभ्रू कुटुंबात लहानाची मोठी झालेली. तिचा मित्र सध्या कॅनेडामध्ये आहे. दोघांचे प्रेमसंबंध होते. अनेक महिने प्रत्यक्ष भेटू शकत नसल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचे चॅटिंग चालायचे. पण, कधी कधी भावनांना घालणे हे सोपे जात नाही, तसंच काहीसे घडलं. तिने दोघांचा बेडरूममधील एक फोटो इन्स्टाग्राममधील मेसेंजरवरून तिने प्रियकराला शेअर केला होता. हीच चूक किती महागात पडू शकते, याचे तिला त्या क्षणाला कल्पना नव्हती. काही दिवसांनंतर हाच प्रियकराबाबतचा फोटो शेख नावाच्या तरुणाने तिला इन्स्टाग्रामवर पाठवला. हा फोटो पाठविण्यामागे त्याचा हेतू काहीतरी साध्य करायचे होता, हे त्याच्या संभाषणावरून या तरुणीच्या लक्षात आले होते. आपला खासगी फोटो या व्यक्तीकडे कसा गेला असा प्रश्न त्या तरुणीला पडला होता.

दुसऱ्या बाजूने तो शेख नावाचा तरुण तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. ‘हा फोटो माझ्याकडे आला आहे, तुझ्या आई-वडिलांना दाखवला तर…,’ अशा स्वरूपाच्या धमक्याही देण्याचा त्याने प्रयत्न केला. यातून मार्ग कसा काढायचा हा प्रश्न त्या तरुणीला पडला होता. आपल्या इभ्रतीवर घाला घालण्याचा प्रकार असल्याने तिने महाराष्ट्र सायबर पोलिसांच्या पोर्टलवर ऑनलाइन निनावी तक्रार दिली होती. या निनावी तक्रारीमध्ये महिलेले तिचे काही खासगी फोटो व व्हीडिओ अश्लील बनावट INSTAGRAM ID तयार करून प्रसारित केले असल्याचे नमूद होते. या सर्व प्रकारामुळे महिलेने लज्जा निर्माण करणारा कसा प्रकार आहे, हेही तक्रारीत नमूद केले होते. संबंधित पोर्टलवर एखादी तक्रार प्राप्त झाली की तक्रारदार ज्या परिसरात राहते, त्या क्षेत्रातील स्थानिक विभागाकडे तक्रार पुढील तपासासाठी वर्ग करण्यात येते. त्यानुसार महाराष्ट्र सायबर शाखेकडून या महिलेची निनावी तक्रार ही मीरा-भाईंदर सायबर गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास मीरा-भाईदर सायबर पोलीस करत होते, त्यावेळी ज्या इन्स्टाग्राम आयडीवरून महिलेशी जवळीक साधणारा कोण आहे, याचा शोध सुरू केला.

पोलीस उपआयुक्त (गुन्हे)अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, स. पो. नि. स्वप्नील वाव्हळ, स. फौ. संतोष चव्हाण, पोलीस अंमलदार गणेश इलग, प्रवीण आव्हाड, महिला पोलीस अंमलदार सुवर्णा माळी यांनी संयुक्त तपास केला. सायबर गुन्हे शाखेच्या या पथकाने तांत्रिक विश्लेषण करून इन्स्टाग्रामवर शेख नावाचे अकाऊंट असलेल्या तरुणाला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केल्यानंतर त्याचे खरे नाव प्रतीश कोठारी असल्याचे समजले. प्रतीशने बनावट INSTAGRAM ID तयार केला असल्याची माहिती पुढे आली. अश्लील व्हीडिओ व फोटो पाठविणाऱ्या प्रतीश हा ठाणे परिसरात राहतो. संशयित प्रतीश कोठारीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने आपण त्या महिलेशी जवळीक साधण्यासाठी बनावट इन्स्टाग्राम आयडी तयार केल्याची कबुली दिली होती.

ना ओळख, ना पाळख. तक्रारदार तरुणीला तो कधीही भेटलेला नव्हता. मेसेंजरवरील फोटो डाऊनलोड करून तिचा विकपाॅइंट दाखवून जवळीक साधण्याचा त्याचा हेतू असल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली. आपल्या प्रियकराबरोबरचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असते तर… समाजात आपल्याला तोंड दाखवायला जागा राहिली नसती… या कल्पनेनेच या तरुणीला घाम फुटला होता; परंतु पोलिसांनी समयसूचकता दाखवून प्रतिशला जाळ्यात पकडल्याने पुढचा अनर्थ टळला. अशा प्रकारे कोणीही खासगी फोटो, अश्लील फोटो प्रसारित करीत असल्यास त्याबाबत www.cybercrime.gov.in अथवा १९३० या हेल्पलाइनवर संपर्क साधून तक्रार द्यावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी नागरिकांना केले आहे. तसेच, आपली खासगी माहिती, फोटो, व्हीडिओ सोशल मीडियावर प्रसारित करू नका. आपले खासगी माहिती, फोटो, व्हीडिओ सोशल मीडियावर प्रसारित करू नये. अनोळखी Request प्राप्त झाल्यास खात्री करूनच Accept करावी. आपले सोशल मीडिया अकाऊंट लॉग इन आयडी पासवर्ड, ओटीपी कोणाशीही शेअर करू नये. आपले सोशल मीडिया अकाऊंट हे नेहमी Private Setting याप्रमाणे ठेवावे. अशा स्वरूपाची महत्त्वपूर्ण माहिती मुंबई सायबर पोलिसांकडून नागरिकांना कळविण्यात आली आहे.

तात्पर्य : आजकालच्या युवापिढीला स्वतच प्रदर्शन करण्याचा मोह आवरता येत नाही, अशी अनेक उदाहरणे दिसतात; परंतु आपल्या आयुष्यातील कोणती गोष्ट समाजमाध्यमांवर पोस्ट करावी, याचे तारतम्य बाळगले नाही तर असा प्रकार कोणाच्या बाबतीतही घडू शकतो. टेक्नोलॉजीच्या युगातही दु:शासनाचे वंशज प्रतीशच्या रूपाने समाजात वावरत आहेत, हे विसरून चालणार नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -