
हळदीच्या शेतीतून त्यांनी एका एकरात कमवले ८ लाख
बाळासाहेब भालेराव
मुरबाड : अलीकडे राज्यातील शेतकऱ्यांनी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग सुरू केले आहेत. या प्रयोगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपले नाव देशपातळीवर झळकवले आहे. विशेषतः सेंद्रिय शेतीमध्ये राज्याने चांगली प्रगती साधली आहे. अलीकडे प्रयोगशील शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचे दुष्परिणाम पाहता सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली आहे. सेंद्रिय पद्धतीने शेती करताना सुरुवातीला काही अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु शेतकरी बांधवांनी या अडचणीवरही मात करत सेंद्रिय पद्धतीने वेगवेगळ्या पिकांची यशस्वी लागवड करत लाखो रुपयांची कमाई करण्याची किमया साधली आहे. असाच एक प्रयोग मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातून समोर येत आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील प्रकाश कोर व रामनाथ उंबरगोंडे या शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीला छेद देत सेंद्रिय पद्धतीने हळद लागवड करून शेतीतून लाखोंचे उत्पादन मिळवले आहे. त्यांच्या भात पिकाला जोड धंदा म्हणून वायगाव व प्रगती जातीच्या हळदीची शेती करुन या पिकातुन एकरी सहा-सात लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. शहापूर तालुक्यातील तरुण शेतकऱ्यांना ती प्रेरक असून तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी त्यांच्या शेतात भेट देऊन माहिती घेत आहेत.
पूर्वी किचकट मानले जाणारे हळद उत्पादन आता शेतकऱ्यांना लाखोंचे उत्पन्न देत आहेत. हळद ही शेतावर आंतरपीक म्हणून ही घेता येते. हळदीच्या काढणीसाठी लागणारे मनुष्यबळ, तसेच काढणी झाल्यावर शिजविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लागणार लाकूडफाटा, तसेच सदर हळद सुकवून पुन्हा मशीन मध्ये तिची पावडर बनवून ती पॅकिंग करून विक्री साठी बाजारात आणली जाते. सदर हळद ही पूर्णपणे सेंद्रिय असल्यामुळे तिला बाजारात एका किलो मागे ३०० ते ४०९ रुपये भाव मिळते.
शेतकरी रामनाथ उंबरगोडे सांगतात की त्यांनी आपल्या २५ गुंठे शेतात जमिनीत सेंद्रिय पद्धतीने हळदीची लागवड केली. विशेष म्हणजे या २५ गुंठ्यातून त्यांनी दोन ते तीन लाखांची कमाई करण्याची किमया साधली आहे. निश्चितच या प्रयोगशील शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक असे काम केले आहे.
या ठिकाणी विशेष बाब अशी की, या शेतकऱ्यांनी हळदीवर प्रक्रिया करून हळदीची पावडर तयार करत बाजारपेठेत विक्री करण्याची कसब त्यांना गवसली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना हळद पिकातून चांगले उत्पादन मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
त्यामुळे शेतकऱ्यांनी आता केवळ उत्पादन काढणेच महत्त्वाचे राहणार नाही तर शेतमाल विकण्यासाठी देखील मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्यावर अधिक भर देऊन बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.
‘हळद’ या पिकाची लागवड कशी करावी?
हळदीची योग्य वेळी लागवड, सुधारित वाणाचा (जातींचा) वापर, सेंद्रिय खतांचा भरपूर वापर, योग्य वेळी पाणी व्यवस्थापन आणि पीक संरक्षण इत्यादी गोष्टींचा अवलंब केल्यास निश्चितच शेतकर्यांना हळदीचे भरघोस उत्पन्न मिळण्यास साहाय्य होईल. ळद हे उष्ण कटिबंधीय वातावरणात घेतले जाणारे महत्त्वाचे मसाल्याचे पीक आहे. हळद हे वाळवलेले कंद, तसेच मृदकाष्ठीय झाड आहे. हळदीचे उगमस्थान आग्नेय आशिया हे आहे. हळदीचा वापर मसाला, तसेच औषधे आणि सौंदर्यप्रसाधने यांमध्ये होतो.
उत्तम निचर्याची, मध्यम काळी, नदीकाठची पोयटा माती हळदीसाठी अतीउत्तम आहे. चुनखडीयुक्त आणि चोपण भूमी टाळावी. हळद हे भूमीत वाढणारे खोड आहे. त्यामुळे भूमी जितकी भुसभुशीत, तितके हळदीचे उत्पादन चांगले मिळते. त्यासाठी भूमी उभी-आडवी २ ते ३ वेळा १८ ते २२ सें.मी. खोल नांगरून घ्यावी. पहिली नांगरणी मार्चमध्ये करावी. भूमी १५ ते २० दिवस उन्हात तापू द्यावी. त्यानंतर दुसरी नांगरणी करून आणि ढेकळे फोडून २५ ते ४० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत मातीत मिसळून घ्यावे.
हळदीची लागवड अक्षय्य तृतीयेपासून म्हणजे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून ते मे मासाच्या शेवटपर्यंत करणे आवश्यक आहे. उशिरात उशिरा हळदीची लागवड जून मासाच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. हळदीच्या लागणीस विलंब झाल्यास त्याचा उत्पादनावर अनिष्ट परिणाम झाल्याचे दिसून येतो.
हळदीचे पीक ८.५ ते ९ मासांत सिद्ध होते. गड्डे पक्व झाल्यावर हळदीची पाने पिवळी पडून सुकू लागतात आणि भूमीवर लोळतात. काढणीच्या अगोदर १५ दिवस पिकास पाणी देणे बंद करावे. वाळलेला पाला भूमीलगत विळ्याने कापून घ्यावा. भूमीत योग्य ओल असतांनाच हळदीचे कंद कुदळीने खणून काढावेत. काढणीच्या वेळी गड्ड्यांना इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी. हळदीचे जेठे गड्डे आणि हळकुंडे वेगळी करावीत. जेठे गड्डे पुढील वर्षी बियाणासाठी सावलीत ढिग करून साठवावेत.

हळद शिजवणे
हळद लोखंडी कढई किंवा काईल यांमध्ये शिजवली जाते. सर्वसाधारणपणे दोन क्विंटल ओली हळद बसेल, या क्षमतेपासून ८ ते १० क्विंटल हळद मावणार्या कढया किंवा लोखंडी काईल उपलब्ध असतात. या कढईत हळद भरून त्यावर ५ ते ८ सें.मी. पाणी राहील इतके पाणी आणि हळदीचा पाला घालून गोणपाटाने झाकून घ्यावे. यामुळे अल्प वेळ आणि इंधन यांत हळद शिजवता येते. हळद शिजण्यास दीड ते २ घंटे लागतात. हळद शिजली आहे का ? हे ओळखण्यासाठी तुरीची काडी हळकुंडात घुसवल्यास ती लगेच आरपार जाते.
हळद शिजवण्याची आणखी एक नवीन पद्धत आहे. तेलाच्या बॅरलचे सच्छिद्र ड्रम सिद्ध करून त्यामध्ये हळद भरून मूळच्या कढईत पाणी टाकावे. उकळत्या पाण्यात हे ड्रम ठेवून हळद शिजवली असता ती योग्य प्रकारे शिजते. यात अल्प वेळ, मनुष्यबळ आणि इंधन लागते. अशा मालास चकाकी येते. परिणामी बाजारभावही चांगला मिळतो. अशा पद्धतीचा वापर केल्यास अल्प वेळेत हळद व्यवस्थित शिजवली जाते आणि कामगार, श्रम अन् इंधन यांचा अपव्यय टाळता येतो.

हळद वाळवणे
शिजवलेली हळद ही चांगल्या कठीण फरशीच्या किंवा सिमेंट-काँक्रिटच्या खळ्यावर वाळवावी लागते. (हळद वाळवण्यासाठी ताडपत्री किंवा प्लास्टिकचा कागदसुद्धा वापरता येतो.) हळद चांगली वाळण्यास १० ते १५ दिवसांचा कालावधी आवश्यक असतो. हळद वाळवतांना ती पावसात भिजणार नाही किंवा दव आणि धुके यांमुळे ओली होणार नाही, याची काळजी घ्यावी.
हळद पॉलिश करणे आणि त्याविषयीची प्रक्रिया
शिजवून आणि वाळवून सिद्ध झालेली हळद आपण विक्रीसाठी पाठवू शकत नाही; कारण ती आकर्षक दिसत नाही. हळकुंडावरील साल आणि माती यांचा थर काही अंशी हळकुंडावर बसलेला असतो. त्यामुळे हळद कठीण पृष्ठभागावर घासावी लागते. त्यानंतर हळकुंडावरील साल आणि मातीचे काही कण निघून जाऊन हळकुंड गुळगुळीत होते. त्याला चकाकी आणि पिवळेपणा येतो. त्यामुळे हळद आकर्षक दिसते. अशा मालास चांगला बाजारभाव मिळतो. यासाठी हळदीला पॉलिश करणे आवश्यक असते. हळद अल्प असल्यास हातात गोणपाट घेऊन पॉलिश केले जाते. जास्त हळद असल्यास पाण्याच्या बॅरलचा ड्रम सिद्ध करून, त्याला सर्वत्र छिद्रे पाडून, स्टँड आणि कणा बसवून त्याचा उपयोग पॉलिशसाठी करता येतो. याच तत्त्वावर मोठे डबे सिद्ध करून ते इलेक्ट्रिक मोटरवर फिरवून हळदीचे पॉलिश व्यापारी तत्त्वावर करून मिळते. हळद पॉलिश केल्यानंतर ती विक्रीसाठी सिद्ध होते किंवा तिची पावडर करून अर्धा ते एक किलोग्रॅमच्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून विक्रीही करता येते.
कंद स्वच्छ करणे
काढलेल्या कंदांना पुष्कळ माती चिकटलेली असते. त्यामुळे एका टबमध्ये पाणी घेऊन त्यात हे कंद बुडवून हाताने चोळून स्वच्छ करावेत. ही कृती २ – ३ वेळा करून कंद पूर्णपणे स्वच्छ करावेत. कंदाचा गड्डा मोठा असतो. मध्यभागी अंगठ्याहून जाड असा मातृकंद आणि त्याला दोन्ही बाजूंनी बोटांप्रमाणे आलेले लहान कंद अशी रचना असते. हे लहान कंद मातृकंदापासून तोडून वेगळे करावेत आणि आवश्यक असल्यास पुन्हा एकदा धुऊन घ्यावेत.
कंद उन्हात वाळवणे
हे स्वच्छ झालेले कंद २ दिवस उन्हात वाळवून घ्यावे. पुढील लागवडीसाठी जितके आवश्यक असतील, तितके यांतील मातृकंद आणि अन्य मोठे कंद निवडून वेगळे काढावेत. हे कंद लाकडाची किंवा गोवर्यांची राख लावून मातीच्या लहान मडक्यात भरून ठेवावेत. असे केल्याने कंदांना बुरशी लागत नाही.

हळदीची पूड करणे
उर्वरित कंद चिरून त्याच्या पातळ चकत्या कराव्यात आणि या चकत्या कुरकुरीत होईपर्यंत उन्हात वाळवून घ्याव्यात. हळदीच्या चकत्या उन्हात पूर्ण वाळून त्यांतील ओलावा निघून गेल्यावर त्या मिक्सरमध्ये दळून घ्याव्यात आणि बारीक चाळणीने पूड चाळून घ्यावी. ही पूड पातेल्यात काढून ते सुती कापडाने झाकावे आणि पुन्हा १ – २ दिवस उन्हात ठेवावे. असे केल्याने ओलावा पूर्णपणे निघून जातो आणि हळद खराब होत नाही. त्यानंतर स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बाटलीत ‘हळद पूड’ भरून ठेवावी. अशा प्रकारे अत्यंत सोप्या पद्धतीने घरच्या घरी हळदीची पूड करता येते. यामध्ये कुठलीही भेसळ नसल्याने औषधोपचारांतही या हळदीचा उपयोग करता येतो.
सुधारित तंत्रानुसार लागवड केल्यास ओल्या हळदीचे हेक्टरी २५० ते ३५० क्विंटल आणि वाळलेल्या हळदीचे ६० ते ७५ क्विंटल प्रती हेक्टरी उत्पादन मिळते.