Sunday, May 11, 2025

महामुंबईविदेशमहत्वाची बातमी

'मुंबईचा वडापाव' जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत तेराव्या स्थानी

'मुंबईचा वडापाव' जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत तेराव्या स्थानी

मुंबईच्या 'वडापाव'ला जागतिक मान्यता


नवी दिल्ली : मुंबईच्या प्रसिद्ध स्ट्रीट फूड वडापावला (Vada Pav) आता जागतिक मान्यता मिळाली आहे. जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत वडापाव तेराव्या क्रमांकावर आहे. टेस्ट ॲटलसच्या जगातील ५० सर्वोत्तम सँडविचच्या यादीत मुंबईच्या वडापावला तेरावे स्थान मिळाले आहे. या यादीत तुर्कीचे टॉम्बिक सँडविच पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर पेरुचे बुटीफारा सँडविच आणि अर्जेंटिनाचा डी लोमो सँडविचचा तिसरा क्रमांक आहे.


टेस्ट ॲटलस (Taste Atlas) ही फूड ट्रॅव्हल गाईड वेबसाईट आहे. यामध्ये जगभरातील पारंपारिक खाद्यपदार्थांसाठी मार्गदर्शक माहिती प्रसिद्ध केली जाते. यावर जगभरातील विविध पाककृती आणि लोकप्रिय पदार्थ याबाबत माहिती दिली आहे.


एक पाव त्यामध्ये गरमागरम तेलातून काढलेला, कुर्रकुरीत, थोडा लुसलुशीत आणि चविष्ट असलेला वडा त्यावर हलकीशी लसणाची चटणी तसेच तिखट चटणी आणि मिरचीबरोबर हा वडापाव जेव्हा तोंडात जातो, तेव्हा अर्थातच त्याची चव जीभेवर रेंगाळल्याशिवाय राहात नाही. हे वडापावचे वर्णन फक्त वाचूनच तुमच्याही जीभेला पाणी सुटले असेल. अस्सल मुंबईकर रस्त्याने जाताना केवळ वासावरुन त्या वडापावची चव ओळखतात.


मुंबईमध्ये सर्वात प्रसिद्ध स्ट्रीट फूड म्हणजे वडापाव. मुंबईकरांचे आणि वडापावचे नाते अगदी वेगळेच आहे. आनंदाच्या क्षणी असो वा दुखाच्या क्षणी, पोटाची भूक भागवण्याचा उत्तम आधार म्हणजे वडापाव. अगदी मुंबईत राहणारा व्यक्ती असो किंवा मुंबईमध्ये फक्त काही वेळ घालवणारा परदेशी व्यक्ती, पण तुम्हाला वडापावबाबत नक्की माहिती असते. तुम्ही कोणत्याही वेळी वडापावचा आस्वाद घेऊ शकता. चहा, नाश्ता असो किंवा जेवण तुम्ही कधीही वडापाव खाऊ शकता. वडापाव हा जणू मुंबईकरांच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक बनला आहे. अगदी रस्त्यावर राहणारा व्यक्ती असो किंवा श्रीमंत व्यक्ती वडापाव सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. अशा या मुंबईच्या वडापावला आता जागतिक मान्यता मिळाली आहे. जगातील ५० सर्वोत्कृष्ट सँडविचच्या यादीत वडापावला स्थान मिळालं आहे.

Comments
Add Comment