Monday, July 15, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणमाथेरानची ई-रिक्षा आजपासून बंद

माथेरानची ई-रिक्षा आजपासून बंद

पर्यटक, विद्यार्थी, नागरिक, दुकानदार हिरमुसले

माथेरान (वार्ताहर) : सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार गेल्या तीन महिन्यांपासून माथेरानमध्ये धावणारी ई-रिक्षा मुदत संपल्यामुळे उद्यापासून काही दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे पूर्वीच्याच हालअपेष्टा, गैरसोय आणि धावपळीला पुन्हा तोंड द्यावे लागणार असल्याने पर्यटक, विद्यार्थी, नागरिक आणि दुकानदार हिरमुसले आहेत. या तीन महिन्यांच्या कार्यकाळात अनेक कटू प्रसंगांना सामोरे जात, खडतर आव्हाने पेलत आणि कधी कधी समाजकंटकांचे दगड गोटे अंगावर झेलत ई-रिक्षाने माथेरानमध्ये पर्यटक, स्थानिक नागरिक, शालेय विद्यार्थी यांना चांगली आणि स्वस्त सेवा दिली. मात्र आता न्यायालयाने दिलेली तीन महिन्यांची प्रायोगिक तत्वावरील ई-रिक्षाची मुदत आज संपल्याने ती उद्या ५ मार्चपासून काही दिवस बंद राहणार आहे.

५ डिसेंबर २०२२ रोजी ई-रिक्षाचे माथेरान नगरीत आगमन झाले. त्यावेळी सर्वांमध्ये प्रचंड उत्साह आणि आनंद संचारला होता. विद्यार्थ्यांना केवळ ५ रुपयांत प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली होती. त्याचप्रमाणे अन्य नागरिक, पर्यटक यांना दस्तुरी ते माथेरान रेल्वे स्टेशनपर्यंत माफक दरात म्हणजे फक्त ३५ रुपयांत स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळाली. विशेष म्हणजे या ई-रिक्षाला ज्यांनी प्रचंड विरोध केला होता. ई-रिक्षाच्या समर्थनार्थ असणाऱ्या लोकांबद्दल अपशब्द वापरले होते. त्यांनीही या रिक्षाच्या सेवेचा लाभ घेतला होता. विरोध करणाऱ्यांनी आपल्या घरातील लग्नाची वऱ्हाडे याच ई-रिक्षामधून दस्तुरीपर्यंत नेण्यासाठी पुढाकार घेतला होता. एकीकडे विरोध करायचा आणि दुसरीकडे सेवेचा पुरेपूर फायदा घ्यायचा, अशी दुहेरी भूमिका या रिक्षाला विरोध करणाऱ्यांनी घेतल्याचे दिसत होते.अनेक वर्षांपासून येथील श्रमिक हातरिक्षा चालकांना व्यवसायात बदल हवा होता. त्यामुळे त्यांनी तो घडवून आणला होता. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार तीन महिने कोणत्या कंपनीची रिक्षा उत्तम प्रकारे सुविधा देऊ शकेल यासाठी प्रायोगिक तत्त्वावर माथेरानमध्ये ई-रिक्षा सुरू केली होती. ५ मार्चला हा तीन महिन्यांचा कार्यकाळ संपला आहे. सनियंत्रण समितीच्या अहवालानंतर ही ई-रिक्षा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. परंतु विद्यार्थ्यांना या रिक्षाची आता सवय झाल्यामुळे ती बंद करू नये, अशी मागणी पालकांकडून होत आहे. इथे सर्व सामान वाढीव दराने खरेदी करावे लागते. त्यासाठी येथे ई-टेम्पोही लवकरच सुरू करण्यात यावा, अशी मागणी व्यापारी करत आहेत. त्यामुळे सनियंत्रण समितीच्या पुढील निर्णयाची पर्यटक, विद्यार्थी, नागरिक आतुरतेने वाट पाहत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -