वधू आयसीयुमध्ये; लग्नही मोडले!
बंगळुरू : लग्नाच्या दिवशी सुंदर दिसणे हे प्रत्येक वधूचे स्वप्न असते आणि या मेकअपसाठी मुली कितीही खर्च करायला तयार असतात. मुलींचा मेकओव्हर अनेक दिवस अगोदर सुरू होतो, ज्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतात. पण हा मेकअप एका मुलीला चांगलाच महागात पडला आहे आणि त्यामुळे ती रुग्णालयात पोहोचली. इतकेच नाही तर चेहरा बिघडल्यामुळे वर आणि त्याच्या नातेवाईकांनी लग्नालाही नकार दिला.
ब्युटी पार्लरमध्ये मेकओव्हर केल्यावर मुलीचा चेहरा काळा पडला आणि संपूर्ण तोंड सुजले. मुलीची अवस्था पाहून कुटुंबीयांना रडू कोसळले. मेकअप बिघडल्यामुळे मुलीची परिस्थिती इतकी भयंकर बिघडली की, सध्या या मुलीला आयसीयुमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. वरपक्षाला याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हे लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर मुलीच्या नातेवाईकांनी पार्लरविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
याआधी लग्नकार्यात वधूला मेकअपसाठी बराच विलंब झाल्याने वराकडील लोकांनी केलेले भांडण किंवा वधूच्या खराब मेकअपमुळे वाद निर्माण झाल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील. पण आता कर्नाटकातील हसनमध्ये मेकअपसंदर्भात घडलेल्या या धक्कादायक प्रकरणाने सगळेच हादरून गेले आहेत. इथे मेकअप केल्यानंतर होणाऱ्या वधूचा चेहरा इतका बिघडला की, तिला अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले. यामुळे हे लग्न पुढे ढकलले गेले.
हसनच्या अरसीकेरे शहरात घडलेली ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी जाजूर गावची रहिवासी आहे. पीडितेने १० दिवसांपूर्वी शहरातील गंगाश्री हर्बल ब्युटी पार्लर अॅण्ड स्पामध्ये मेकअप करून घेतला होता. मेकअप केल्यानंतर पीडितेचा चेहरा चक्क काळा पडला आणि मोठ्या प्रमाणात सुजला.
ब्युटीशियन गंगा हिने पीडितेला सांगितले होते की, तिने तिच्या चेहऱ्यावर नवीन प्रकारचे मेकअप प्रोडक्ट लावले होते. परंतु मेकअप केल्यानंतर पीडितेला त्या प्रोडक्टची अॅलर्जी झाली.
मुलीची परिस्थिती इतकी बिघडली की, तिला आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले. वरपक्षाला याची माहिती मिळाल्यानंतर हे लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र यानंतर तिची अवस्था पाहून नवरदेवाने लग्न करण्यास चक्क नकार दिला आहे.