Wednesday, July 24, 2024
Homeमहत्वाची बातमीहोळी रे होळी पुरणाची पोळी, सायबाच्या...!

होळी रे होळी पुरणाची पोळी, सायबाच्या…!

पेण तालुक्यातील उंच उंच होळ्या ठरतात जिल्हयाचे आकर्षण

  • देवा पेरवी

पेण : कोकणासह पेण तालुक्यात होलिकोत्सवाची एक आगळीवेगळी ओळख आहे. तालुक्यात मोठमोठ्या गगनचुंबी होळ्या उभारून उत्सव साजरा केला जातो. आणि या उत्सवाची जय्यत तयारी आत्तापासूनच सुरू झाल्याचे चिञ सध्या पहायला मिळत आहे. होलिकोत्सवाच्या या उत्सवाला शिमगोत्सव असे देखील म्हटले जाते. “होळी रे होळी पुरणाची पोळी” अशा हाका मारण्याची आणि शिव्या घालत शिमगा करण्याची प्रथा कोकणात आजही कायम सुरु आहे.

पेण तालुक्यात ८ ते १० दिवस अगोदरच या उत्सवाची उत्कंठा शिगेला लागलेली असते. होलिकोत्सवाची तयारी करणे, गावातील घराघरांत वर्गणी मागणे, ज्या ठिकाणी उत्सव साजरा होणार आहे तेथील स्वच्छता – सुशोभिकरण करणे, होळी पेटविण्यासाठी लागणारी लाकडे – ओंडके गोळा करणे, होळी उत्सव पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये विविध प्रकारची जनजागृती करण्यासाठीच्या योजना आखणे आदी प्रकारची जय्यत तयारी आत्तापासूनच पेण शहरा व ग्रामीण भागामधील विविध नागरिक, विविध मंडळे करत आहेत.

पेण शहरासह तालुक्याचा विचार करता पेणमध्ये मोठमोठ्या गगनचुंबी होळ्या उभारल्या जातात. जवळपास ५० ते ८० फूट उंच अशा या गगनचुंबी होळ्या पाहण्यासाठी तालुक्यातीलच नव्हे तर पेण बाहेरील नागरिक देखील येथे मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात. या होळ्या उभारण्यासाठी बाजूच्या जंगलातून सावरीच्या झाडाचा ओंडका आणला जातो. हा ओंडका आणताना जोरजोरात बोंबा मारणे, नाचगाणे करणे अशा प्रकारे ढोल ताशांच्या गजरात ही होळी आणली जाते. या आणलेल्या होळीला माखराची सजावट केली जाते. मखर जोडल्यानंतर ही होळी उभी करण्याची खरी मोठी कसरत असते. जवळपास शंभर ते दोनशे लोकं एकत्र येऊन मोठ्या गाजतवाजत आणि अतिशय शिताफीने ही होळी उभी केली जाते. त्यावेळी देखील असंख्य नागरिक हा चित्तथरारक क्षण पाहण्यासाठी उपस्थित असतात.

पेण कोळीवाड्याची होळी जिल्ह्याचे आकर्षण

पेण शहरांतील कोळीवाड्यातील गगनचुंबी होळी ही पाहण्यासारखी असते. या उत्सवाचे स्वरुप फार वेगळेच असते. येथील होळी पाहण्यासाठी तालुक्यातून नागरिक, महिला व अबालवृद्ध मोठ्या संख्येने येतात. संपूर्ण कोळीवाड्यातील पुरुष महिला वर्ग सध्या या सणाच्या तयारीत गुंतलेले दिसून येत आहेत.

होळी सणाच्या पाच दिवस आधी कोळीवाड्यातील होळी उभी केली जाते. होळी उभी करतानाचे दृश्य पाहण्यासारखे असते. अनेक जण आपले बोललेले नवस फेडण्यासाठी दरवर्षी पेण कोळीवाड्यात येत असतात.

विशेष म्हणजे होलिकामाते जवळील कोळी गीते आणि त्यावरील सुरू असणारे कोळी डान्स तसेच विविध स्पर्धा हे एक वेगळेच आकर्षण असते.

चार दिवस आधीच जय्यत तयारी करून उभारण्यात आलेल्या या होळीचे होळीपौर्णिमेच्या दिवशी पूजन करून आणि विशेष महत्त्व असणाऱ्या पुरणपोळीचे नैवेद्य दाखवून मध्यरात्री बारा वाजता या होळीला आरती करून झाल्यावर अग्नी देण्यात येते.

होळी पौर्णिमेनंतर सलग पाच दिवस म्हणजेच रंगपंचमी पर्यंत या होळीची अग्नी सतत तेवत ठेऊन या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करून आणि या अग्नीवर विविध प्रकारचे पदार्थ तयार करून या होळीच्या माळावर होळी उत्सव साजरा केला जातो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -