मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्लाप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना ताब्यात घेतले आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्र फिरवली होती. तपासासाठी विशेष पथकाची देखील नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर अखेर आज (४ मार्च) सकाळी साडेसहा वाजता गुन्हे शाखेने दोन जणांना ताब्यात घेतले. त्या दोन जणांपैकी अशोक खरात हा शिवसेना महाराष्ट्र माथाडी जनरल कामगार सेनेचा उपाध्यक्ष आहे. तर दुसरा सोलंकी नामक व्यक्ती हा त्याचाच सहकारी आहे. ते भांडुपच्या कोकण नगर विभागाचे रहिवासी आहेत. यानंतर सायंकाळी आणखी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणाचा पुढील तपास आता क्राईम ब्रांच करणार आहे.
हल्ला केल्याची आरोपींची कबुली
मॉर्निंग वॉक करताना संदीप देशपांडे यांच्यावर मास्क लावून आलेल्या चौघांनी स्टम्प व बॅटने हल्ला केला होता. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर होत असलेल्या टिकेमुळेच हल्ला केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. ताब्यात घेण्यात आलेले आरोपी शिवसेना ठाकरे गटाचे आहेत. यापैकी खरात विरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांत तो शांत होता. खरातचे शिवसेना नेत्यांसोबतचे फोटोही सोशल मीडियातून समोर आले आहेत.