
- कर्टन प्लीज: नंदकुमार पाटील
डेव्हिड लेब्रन हे अमेरिकेतील प्रसिद्ध छायाचित्रकार. विविध देशांना भेटी देणे आणि तिथल्या पुरातन, इतिहास, नोंदणी घेणाऱ्या वास्तूंचे, शिल्पांचे फोटो काढणे हा त्यांचा छंद. महत्त्वाचे म्हणजे संग्रही छायाचित्रांचे प्रदर्शन आणि व्हीडिओच्या माध्यमातून दर्शन घडवणे ही कामगिरी गेली अनेक वर्षे ते अमेरिकेत करत असतात. यंदा त्यांनी भारतातल्या दक्षिणेकडच्या काही शहरांना भेटी दिल्या. या निरीक्षणात त्यांना नटराजची मूर्ती अधिक भावली. शहरे वेगळी, पण नटराजच्या मूर्तीची रचना एकसारखी होती. याचे त्यांना जास्त अप्रूप वाटत होते. त्याचे छायाचित्र त्यांनी अमेरिकेतल्या वस्तुसंग्रहालयात काम करणाऱ्या सहकारी मित्रांना दाखवले. त्यांच्यात नटराज कोण? प्रत्येक प्रतिमेत नृत्य दिसण्याचे कारण काय? वाद्य ठेवून त्यामागचे शास्त्रीय कारण काय, याची उत्सुकता प्रत्येकामध्ये निर्माण झाली. जुई म्हात्रे ही प्रसिद्ध अभिनेत्री विमल म्हात्रे यांची कन्या. कट्टर परळकर, पण ती विवाहबद्ध होऊन अमेरिकत स्थिर झाली. ती स्वतः उत्तम भरतनाट्यम नृत्यांगना असल्यामुळे. या अमेरिकेतील सुजाण प्रेक्षकांना, वाचकांना नटराज नृत्याच्या माध्यमातून सहज समजावून सांगता येऊ शकतो, याची तिला जाणीव झाली. ती पुढे सरसावली. डेव्हिड लेब्रन यांच्या सहकार्याने खास भारतीय शास्त्रीय नृत्याच्या वेशभूषेत तिने अदा पेश केली. प्रत्येक रचनेमागचा अर्थ व्हीडिओच्या माध्यमातून समजावून सांगितला. तेव्हा कुठे नटराज नावाची कुजबूज थांबली.