मुंबई: बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये काही प्रश्नांमध्ये चुका झाल्या होत्या, त्या प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांना आता सहा गुण मिळणार आहेत. इंग्रजी पेपरमध्ये चुका झाल्याचं निदर्शनास येताच बोर्डाने त्यांची चूक मान्य करत हा निर्णय घेतला. बोर्डाने परिपत्रक काढून हे जाहीर केलं आहे.
२१ फेब्रुवारीला बारावीचा इंग्रजीचा पहिला पेपर होता. या इंग्रजीच्या पेपरमध्ये कविता विभागातील तीन प्रश्नांमध्ये चुका झाल्या होत्या. या तीन प्रश्नांसाठी एकुण सहा गुण होते.
इंग्रजी पेपरमध्ये चुका आढळल्यानंतर त्याबाबतीत बोर्डाने अहवाल जारी करण्यास सांगितलं होतं. यामध्ये काही तज्ज्ञांची बैठक झाली. बोर्डाने दिलेल्या अहवालामध्ये इंग्रजी पेपरमध्ये चुका झाल्याचं बोर्डाने मान्य केलं आहे.
मात्र, हे गुण चुकीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच मिळणार आहेत. त्यासाठी उत्तरपत्रिकेमध्ये Poetry Section-2/ Poetry / Section-2 असा उल्लेख केला असावा, अथवा विद्यार्थ्यांनी Poetry Section-2 मधील अन्य कोणतेही प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला असेल तर किंवा त्रुटी असलेला प्रश्न क्रमांक (A-3, A-4, 4-5) उत्तरपत्रिकेमध्ये लिहिला असेल तरच हे गुण विद्यार्थ्यांना मिळतील.