मुंबई : भारतातून निर्यात झालेल्या सदोष कफ सिरफमुळे झालेल्या गांबिया देशामधील बाल मृत्यूकांडानंतर महाराष्ट्रातील १७ दोषी कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस तर ४ कंपन्यांचे उत्पादन बंद आणि ६ कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी दिली. जागतिक आरोग्य संघटनेने निदर्शनास आणून दिल्यानंतर एकूण ८४ कंपन्यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर ही कारवाई केली, असल्याचे राठोड यांनी नमुद केले आहे. तसेच २ हजार औषध परवाना धारकांना कारणे दाखवा तर ४२४ परवाने रद्द तर ५६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही संजय राठोड यांनी सांगितले.
यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात राज्यातील २०० औषध उत्पादकांकडून तयार करण्यात येणारी २००० पेक्षा अधिक औषधे कोणत्याही प्रकारच्या स्थिरता चाचणी प्रमाणपत्र न घेताच निर्यात होत असल्याचे आढळून आले होते.
त्यामुळे राज्यातील या औषध उत्पादकांची सखोल चौकशी करून त्यांचे परवाने रद्द करून कारवाई करण्याची मागणी करीत भाजपा आमदार अॅड आशिष शेलार यांनी लक्षवेधी सूचना उपस्थितीत केली. ही घटना गंभीर असून या प्रकरणी सदर कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी आमदार अॅड आशिष शेलार यांनी केली.
यावर उत्तर देताना संजय राठोड यांनी सांगितले, जागतिक आरोग्य संघटनेने गांबियामधील ६६ मुलांच्या मृत्युवरून ऑक्टोबर २०२२ मध्ये अलर्ट जारी केला होता. त्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाच्या ७ ऑक्टोबर २२ च्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र राज्यातील लिक्वीड ओरल उत्पादन करणाऱ्या उत्पादकांची अन्न व औषध प्रशासनाने तपासणी मोहीम हाती घेतली होती.