Saturday, July 20, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यबचत आणि गुंतवणूक

बचत आणि गुंतवणूक

 • मुंबई ग्राहक पंचायत: उदय पिंगळे

भारतातील अर्थसाक्षरतेबद्धल एका संस्थेने केलेल्या पाहणीचे निष्कर्ष नुकतेच वाचण्यात आले. त्यातील

ठळक मुद्दे खालीलप्रमाणे :

 • बहुतेक लोक FD आणि Insurance (Money back) यांना गुंतवणूक समजतात.
 • सोन्याचे दागिने व राहते घर यांचे बाजारमूल्य कितीही जास्त असले तरी ते आभासी आहे. त्याचा फारसा काही उपयोग नसून त्याने फक्त मानसिक समाधानच लाभू शकते.
 • महागाईवर मात करणारा परतावा मिळाला पाहिजे हे अनेकांना माहीत नाही.
 • म्युच्यअल फंड हा विमा प्रकार असून SIP ही पॉलिसी आहे असे अनेकांना वाटते.
 • आपल्याकडे किती रकमेची, कोणत्या कंपनीची आणि किती वर्षाची विमा पॉलिसी आहे; तसेच कोणत्या म्युच्यअल फंडामध्ये आपली किती रक्कम आहे हे अनेकांना अंदाजेही सांगता येत नाही.
 • आपल्या विमा रकमेवर मिळत असणारा परतावा 7% पेक्षाही कमी आहे हे अनेकांना माहीत नाही.
  फारच थोड्या लोकांनी योग्य रकमेचा, योग्य मुदतीचा आणि योग्य वर्षांचा मुदत विमा (Term insurance) व आरोग्यविमा (Mediclaim) घेतला आहे. यामध्ये भरत असलेल्या हप्त्यांचा उपयोग न होण्यातच आपला खराखुरा फायदा आहे, हे त्यांच्या लक्षातच येत नाही.
 • अनेक लोक भविष्यकाळातील तरतुदीबद्दल जागरूक नाहीत, तर अनेकजण मुलांवर अवलंबून आहेत.
 • गुंतवणूक साधनांची वेगवेगळ्या प्रकारांत विभागणी करायची असते हे कित्येकांना माहीत नाही.
 • येथील बहुतेक लोकांना व्याज करपात्र, तर दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यावर काही सूट, सवलतदराने करआकारणी होते हे माहीत नाही.
 • सोन्याचे दागिने घेण्याऐवजी शुद्ध स्वरूपातील सोने, गोल्ड ETF, सार्वभौम सुवर्ण रोखेमध्ये गुंतवणूक करणे अधिक फायद्याचे याची लोकांना जाणीव नाही.
 • Tax-free bonds हे ८०/सीची सवलत देतात असे बरेचजण मानतात, तर ५४/ई सी bonds, infrabonds, pms, corporate FD याविषयी फारच थोड्या लोकांना माहिती आहे.
 • पूर्णपणे आर्थिक नियोजन करणारे लोक नगण्य आहेत.

या सर्व गोष्टी विचारात घेऊन एकच निष्कर्ष काढता येईल की, आपल्याकडे गुंतवणूक संस्कृती रुजलेली नाही. असे होण्याचे महत्त्वाचे कारण असे की आपण आपले जे पैसे बचत खाते, मुदत ठेवी, पोस्टाच्या योजना, पीपीएफ आणि मनी बॅक पॉलिसीमध्ये टाकले आहेत; सोन्याचे दागिने केले आहेत त्यालाच गुंतवणूक असे समजत आहोत; परंतु ही गुंतवणूक नसून बचत आहे. बचत आणि गुंतवणूक यांचा एकमेकांशी संबंध असला तरी या दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. ढोबळमानाने असे म्हणता येईल की, उत्पन्नातील असा भाग जो गरजांसाठी खर्च न करता साठवून ठेवला आहे किंवा वेगवेगळे खर्च केल्यावर जी रक्कम शिल्लक राहाते ती म्हणजे बचत; तर गुंतवणूक म्हणजे अशी ठरवून केलेली प्रक्रिया ज्यामध्ये आपण अधिक फायदा मिळवण्यासाठी पैसे गुंतवले आहेत. हे अधिक

चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण बचत व गुंतवणुकीची ठळक वैशिष्ट्ये पाहूयात-

बचतीमध्ये पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवतो त्यामुळे नजीकच्या काळात वापरू शकतो. उदा. बचत खाते, मुदत ठेव, परावर्तीत ठेव, आवर्ती ठेव, तर गुंतवणुकीत आपण पैसे अशा साधनांमध्ये ठेवतो की ज्यापासून भविष्यात आर्थिक लाभ होऊ शकेल. उदा. समभाग, युनिट, फ्यूचर, सोने-चांदी, वस्तू, बाजारपेठ, स्थावर मालमत्ता.

 • बचत ही अल्पकालीन क्रिया असून तिची सुरुवात कधीही करता येते, तर गुंतवणूक ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. त्यामुळे तिची सुरुवात जितक्या लवकरात लवकर करू तेवढे चांगले.
 • बचतीचे पैसे नजीकच्या काळात वापरू शकतो; तर गुंतवणुकीचा भविष्यकाळात उपयोग होतो.
 • बचत ही सवय; तर गुंतवणूक ही प्रक्रिया आहे.
 • बचत ही सुरक्षित असून त्यावर मिळणारा लाभ अल्प आहे; तर गुंतवणुकीत जोखिम जास्त असून जेवढी जोखिम जास्त तेवढा मोठा फायदा किंवा तोटा होण्याची शक्यता असून क्वचित प्रसंगी मुद्दल गमावण्याचा धोकाही आहे.
 • बचतीत सुरक्षितता असल्याने त्याचा आढावा घ्यावा लागत नाही; तर गुंतवणुकीचा वेळोवेळी आढावा घेऊन त्यांतील बदलांबद्दलचा निर्णय त्वरित घ्यावा लागतो.
 • बचतीची साधने आपणास निष्क्रिय बनवतात; तर गुंतवणुकीची साधने स्वातंत्र्याचा अनुभव देतात.
 • बचतीचे पैसे अडी-अडचणीच्या काळात उपयोगी पडतात; तर गुंतवणुकीच्या साधनातून दीर्घ काळासाठी संपत्ती निर्माण करण्यासाठी नियमित प्रयत्न करावे लागतात.
 • बचत ही भीतीपोटी केली जाते तर गुंतवणूक आत्मविश्वासपूर्वक करावी लागते.
 • बचतीचे पैसे त्वरित उपलब्ध होतात तर गुंतवणूकीतील पैसे मिळवण्यासाठी काही कालावधी द्यावा लागतो.
 • बचतीसाठी फारशा ज्ञानाची गरज नसते तर गुंतवणूकीसाठी सखोल ज्ञान व नियोजनाची गरज गरज असते. तज्ञांची मदत घ्यावी लागते अथवा स्वतः तज्ञ व्हावे लागते.
 • बचतीमुळे पैशाचे रक्षण होते तर गुंतवणुकीमुळे योग्य उत्पन्न व चांगला परतावा मिळण्याची शक्यता असल्याने चलनवाढीवर मात करता येते.

या विवेचनावरून अशी समजूत होऊ शकते गुंतवणूक चांगली व बचत वाईट किंवा बचत चांगली आणि गुंतवणूक वाईट परंतु यामधील कोणतीही एक गोष्ट पूर्ण बरोबर व दुसरी गोष्ट पूर्ण चूक असे नसून आपली अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीची ध्येये पूर्ण करण्यासाठी बचत आणि गुंतवणूक या दोघांची आपल्या आयुष्यात फार महत्वाची भूमिका आहे. जर बचत आणि गुंतवणूक यांचा समतोल आपण साधू शकलो तर आणि तरच भविष्यातील वाढत्या गरजा व चलनवाढ यांच्याशी सामना करू शकू.
दुर्दैवाने आपल्या शालेय शिक्षणात बचत आणि गुंतवणूक यांतील फारच थोड्या गोष्टींचा स्पर्श होतो, तरीही इतर अनेक गोष्टी आपण जीवनात करून पाहतो. चुकतो, धडपडतो, पडतो पुन्हा उठून उभे राहतो. आपले ज्ञान आणि अनुभव यांची सांगड घालून पैशांच्या सर्व बाजूंचा विचार करून, व्यवहारिक व व्यवसायिक दृष्टीकोन बाळगू शकलो तर आपल्या स्वकष्टार्जित व वडिलोपार्जित संपत्तीचा सांभाळ करू शकू. तेव्हा पैशाच्या सर्व सर्व पैलूंचा विचार करूया, माहिती घेऊया, जागरूक राहू, नियोजन करू आणि स्वतःबरोबरच इतरांनाही अर्थसाक्षर करू या.
mgpshikshan@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -