मुंबई (प्रतिनिधी ): सतत कानावर पडणाऱ्या मोठ्या आवाजामुळे तरुणांमध्ये बहिरेपणाची समस्या वाढली असल्याचे मत जागतिक श्रवण दिनानिमित्त आयोजित चर्चासत्रात डॉक्टरांकडून मांडण्यात आले.
जगभरात कान आणि श्रवणविषयक काळजी कशी वाढवावी यासाठी दरवर्षी ३ मार्च रोजी जागतिक श्रवण दिन आयोजित केला जातो. कानांची काळजी घेणे हे जागतिक श्रवण दिन साजरा करण्यामागील उद्दिष्ट आहे. या दिनानिमित्त बोरिवली येथील हॉस्पिटल्समध्ये एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात ईएनटी आणि व्हॉईस सर्जन – लॅरिन्गोलॉजिस्ट डॉ. बिन्ही देसाई यांनी आजच्या काळात बहिरेपण टाळण्यासाठी मार्गदर्शन केले. याविषयी अधिक माहिती देताना नाक कान घसा रोगतज्ज्ञ ( ईएनटी ) डॉ. बिन्ही देसाई म्हणाल्या, “कर्णकर्कश आवाज, वृद्धत्व, विविध आजार तसेच अनुवांशिकता यामुळे ऐकू न येणे ही एक सामान्य समस्या आहे. सुमारे एक तृतीयांश वृद्धांची श्रवणशक्ती वयोमानानुसार कमी होते. भारतामध्ये कानावर सतत आदळणारा मोठा आवाज हे श्रवण म्हणजे ऐकण्याची क्षमता कमी होण्याचे सर्वात मोठे कारण आहे. मोठ्या आवाजातील कानांच्या आतील भागांचे नुकसान होऊ शकते आणि त्यामुळे कायम स्वरूपी बहिरेपणा येऊ शकतो.जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालामध्ये २०५० पर्यंत सुमारे २.५ अब्ज लोकांची श्रवणशक्ती कमकुवत होणार असल्याचा अंदाज आहे. तसेच ७०० दशलक्ष लोकांना श्रवण पुनर्वसन करवून घेण्याची गरज भासणार आहे असे म्हटले आहे. यावर मात करण्यासाठी कानांची निगा राखणे, कानांशी निगडीत समस्यांची माहिती लोकांपर्यंत पोहचवणे आवश्यक आहे. भविष्यात श्रवण शक्तीमध्ये बिगाड होऊ नये यासाठी आजच उपाय करणे गरजेचे आहे. अनेकजण श्रवणशक्ती कमी झाल्यावर डॉक्टरांचा सल्ला घेत नाहीत व त्यामुळे पुढील ४ ते ५ वर्षात त्यांची श्रवणशक्ती पूर्णपणे निघून जाते.”
श्रवणशक्ती चांगली ठेवण्यासाठी फोन, रेडिओ, टीव्हीचा आवाज कमी ठेवा. फोनवर बोलताना मोबाईल रेडिएशन टाळण्यासाठी वापरात नसेल तर इंटरनेट बंद ठेवा तसेच ब्लू टूथ गरजेपुरते वापरा. आसपासचे नैसर्गिक आवाज ऐका. गोंगाटात जास्त वावरु नका.जर मोठ्या आवाजात काम करावे लागत असेल तर आहारात जीवनसत्व “अ” चे प्रमाण वाढवणे गरजेचे आहे, मोठ्या आवाजात इअर प्लग वापरणे टाळण्याचा सल्ला लॅरिन्गोलॉजिस्ट डॉ. बिन्ही देसाई यांनी दिला.