Tuesday, July 16, 2024
Homeमहत्वाची बातमीप्रदूषणग्रस्त मुंबईवर चढला गुलाबी रंग

प्रदूषणग्रस्त मुंबईवर चढला गुलाबी रंग

  • डॉ. श्वेता चिटणीस

सतत प्रदूषणग्रस्त मुंबईवर सध्या गुलाबी रंग चढला आहे. दर हिवाळ्यात मुंबईला येणारे फ्लेमिंगो पक्षी या वर्षी सुद्धा हजारोंच्या संख्येने मुंबईच्या वाशी, ठाणे खाडी इथल्या फ्लेमिंगो अभयारण्य, ऐरोली, माहूल, शिवडी इथे असणाऱ्या पाणथळ जागी, नवी मुंबई इथल्या नेरूळ व सी वूड्स इथे असलेल्या पांथळीत आले आहेत. या पक्ष्यांना पाहणं म्हणजे एक अद्भुत नयनरम्य अनुभव आहे. त्यांचे उंच, बारीक, नाजूक गुलाबी पाय शुभ्र डौलदार मान, शुभ्र पंखांवर लालसर गुलाबी रंग शिंपडलेला! असे हजारो फ्लेमिंगो पक्षी पंखांची उघडझाप करतात आणि भरारी घेऊ पाहतात तेव्हा एक अग्नीची ज्वाला जणू आकाशात झेप घेते आहे, असा भास होतो. हे पक्षी पाण्यात विहरताना, उडताना खूप नयनरम्य, सुंदर दिसतात.

फ्लेमिंगो म्हणजेच मराठीत रोहित पक्षी. पक्षी निरीक्षणासाठी आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला छोटा रोहित म्हणजेच लेसर फ्लेमिंगो आणि मोठा रोहित म्हणजेच ग्रेटर फ्लेमिंगो दिसतात. छोटे रोहित पक्षी हजारोंच्या संख्येने दिसतात आणि त्यांच्याच मध्ये एखाद दुसरे मोठे रोहित पक्षी दिसतात. ग्रेटर फ्लेमिंगो पक्षी लेसर फ्लेमिंगो किंवा छोट्या रोहित पक्षांपेक्षा उंच असतात त्यामुळे ते चटकन नजरेस पडतात. पाणथळ जागा, खाडी किंवा खारट पाण्याचे तलाव, समुद्रकिनाऱ्याजवळ असलेले आंतरभारती क्षेत्र हे रोहित पक्ष्यांचे आवडीचे अधिवास आहेत. या खारट पाण्यात त्यांना निलहरीत शैवाल, छोटे खेकडे, बारीक मासे, कोलंबी, गोगलगायी इत्यादी आवडीचे खाद्य मिळते. नील-हरित शैवाल खाल्ल्यामुळे त्यांना सुंदर गुलाबी रंग प्राप्त होतो. रोहित पक्षी मुंबईतील खाड्यांचा नैसर्गिक समतोल सांभाळत असतात. त्यामुळे त्यांच्या येण्याने आपल्यावर उपकारच होतात. त्यांनी जर खाड्यांमधलं शैवाल आणि इतर प्राणी खाल्ले नाहीत तर खाड्यांमध्ये प्रदूषण वाढवून दुर्गंधी वाढेल आणि इतर छोट्या प्राण्यांचा सुळसुळाट होईल.

मुंबईत येणारे रोहित पक्षी गुजरात इथल्या कच्छ इथून स्थलांतर करून येतात. यातले काही पक्षी पार आफ्रिका किंवा इराण या देशातूनही आलेले असतात. रोहित पक्षी हे भारतात वास्तव्य करणारे अतिशय पुरातन पक्षी आहेत कारण अनेक संस्कृत श्लोक त्यांच्यावर रचले गेलेत व काही श्लोकांत त्यांचा उल्लेख आढळतो. गुजरातमधील कच्छ या शहराला फ्लेमिंगो सिटी असे म्हणतात. कारण इथे लाखो रोहित पक्षी प्रजननाचा काळ घालवतात. पाऊस पडून गेल्यावर त्यांना पार्थळीत भरपूर खाद्य उपलब्ध होतं, जेणेकरून त्यांचा प्रजननाचा काळ सुखद होतो आणि ते सुखरूप पिल्ले जन्माला घालू शकतात. पिलांचा रंग सुरुवातीला पांढरट किंवा करडा असतो; परंतु जसे खाद्य त्यांच्या पोटात जाऊ लागते तसा त्यांना हळूहळू गुलाबी रंग येऊ लागतो; परंतु हिवाळ्यात हवा कोरडी झाल्यावर पाणथळी सुद्धा कोरड्या होऊ लागतात आणि या पक्ष्यांना खाणं मिळणं कठीण होतं तेव्हा ते मुंबईकडे स्थलांतर करतात. मुंबईत त्यांना पाणथळ जागा आणि त्यात असलेलं मुबलक अन्न मिळतं. एप्रिल ते मे महिन्यापर्यंत ते मुंबईत राहतात. कडक उन्हामुळे पाणथळ जागा कोरड्या होऊ लागल्या आणि अन्न मिळणे अशक्य होते तेव्हा ते पुन्हा कच्छच्या दिशेने स्थलांतर करतात. काही एकटे, कृष झालेले किंवा वयाने लहान असणारे रोहित पक्षी पाठी राहतात. रोहित पक्षी रात्री स्थलांतर करणे पसंत करतात.

हवामान बदलामुळे हल्ली कच्छमध्ये पावसाळा उशिरा सुरू होतो आणि उशिरा संपतो किंवा कधी तरी खूप पाऊस पडतो. त्यामुळे या पक्ष्यांना मुबलक अन्न उपलब्ध होते व त्यांना स्थलांतर करायची गरज भासत नाही. त्यामुळे पूर्वी नोव्हेंबर अखेरीस येणारे रोहित पक्षी हल्ली डिसेंबर महिना अर्धा संपल्यावर येऊ लागले आहेत. ऋतुचक्र बिघडल्यामुळे त्यांच्या प्रजननावर सुद्धा परिणाम होतो आहे. लेसर फ्लेमिंगो किंवा छोट्या रोहित पक्ष्यांची संख्या रोडावत चालली आहे. या पक्ष्यांची संख्या रोडावण्यामागचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे अधिवास धोक्यात आहेत. पाणथळ जागा बिनकामाच्या आहेत, असा सोयीस्कररीत्या समाज करून, ह्या जागांवर अतिक्रमण करून त्यांचे शहरीकरण करण्यात येते. या जागेवर राहण्यासाठी इमारती व कचेऱ्या बांधण्यात येतात. पाणथळ जागांच्या आजूबाजूला तीवरांची जंगलं सुद्धा आहेत. दाट झाडांमुळे ह्या पक्ष्यांना सुरक्षित वाटतं. तसेच या पक्ष्यांच्या अधिवासाच्या आजूबाजूला असणारे तीवर आणि इतर वृक्ष जर कापले गेले तर या पक्ष्यांना असुरक्षित वाटते आणि तेथे जाणे टाळतात. पाणथळी आणि तीवरांची जंगलं पावसाळ्यात अतिरिक्त पाणी शोषून घेण्याचं काम अगदी एखाद्या स्पंजप्रमाणे करतात. त्यामुळे पूर परिस्थिती उद्भवत नाही; परंतु जर हे अधिवास रोडावत राहिले तर रोहित पक्ष्यांची संख्या सुद्धा रोडावेल. इंटरनॅशनल युनियन फॉर कंजर्वेशन ऑफ नेचर (आयूसीएन) ही नैसर्गिक स्त्रोतांच्या संरक्षणासाठी कार्यरत असणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. या संघटनेतर्फे दर चार वर्षांनी आययूसीएन रेड लिस्ट किंवा लाल यादी प्रकाशित करण्यात येते. या रेडलिस्टमध्ये अतिशय चिंताजनक किंवा असुरक्षित असणाऱ्या अनेक प्रजातींची नोंद करण्यात येते. या यादीमध्ये नोंद असणाऱ्या प्रजातींचे कडेकोट बंदोबस्त करून संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे. या यादीप्रमाणे छोट्या रोहित पक्ष्यांची असुरक्षित असणाऱ्या पक्ष्यांच्या यादीमध्ये नोंद आहे. हे पक्षी नामशेष होणार नाहीत त्यासाठी त्यांचे अधिवास अर्थात पाणथळ जागा जपायला हव्यात.

पाणथळ जागा म्हणजेच जैवविविधता असणारी ठिकाणं आहेत व ही एक अत्यंत उपयुक्त अशी उत्पादक परिसंस्था आहे. त्यातील जैवविविधतेमुळे नैसर्गिक समतोल राखला जातो. १९७१ साली इराणच्या रामसर शहरात जगभरातल्या पाणथळ जागांची जपणूक व्हावी व त्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करून रमसर ठराव करण्यात आला. ह्या ठरावाची स्वीकृती भारताने केली आहे.
रोहित पक्ष्यांच्या अधिवासात कोणत्याही प्रकारचे बांधकाम, ध्वनी प्रदूषण किंवा पाणथळीच्या आजूबाजूच्या कारखान्यांच्या रासायनिक कचऱ्याचा निचरा थांबवणे गरजेचे आहे. तसेच पक्षी निरीक्षणासाठी जाणाऱ्या लोकांनी सुद्धा काही नियम पाळणे गरजेचे आहे. या पक्ष्यांच्या अधिवासाजवळ गेल्यावर पक्षी निरीक्षकांनी हलक्या आवाजात कुजबूजल्यासारखे बोलावे, मळकट रंगाचे सुती कपडे घालावे, वाहनांचे आवाज टाळावे, फोटो काढताना फ्लॅश बल्ब टाळावे, पक्ष्यांचे आवाज काढणे टाळावे व या पक्ष्यांना असुरक्षित वाटेल असे आक्रमकपणे वागू नये. रोहित पक्ष्यांचे अधिवास सुरक्षित राहिले, तर शहरात पावसाळ्यात पाणी साचणार नाही आणि पाणी साचल्यामुळे शहरात वाहतूक कोंडी
होणार नाही.

schitnis69@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -