परीक्षेआधीच पेपर सोशल मीडियावर व्हायरल!
मुंबई : बुलडाण्यामध्ये परीक्षा सुरु होण्याआधीच बारावीचा गणिताचा पेपर फुटला. गणिताचा पेपर परीक्षेआधीच सकाळी साडेदहा वाजता सोशल मीडियावर व्हायरल झाला. सिंदखेडराजा येथील परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला. याचे पडसाद विधीमंडळातही उमटले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेतही याप्रकरणी नाराजी व्यक्त केली. बोर्डाकडून कॉपीमुक्त अभियान राबवले जात आहे, मात्र दुस-यांदा पेपर फुटल्यामुळे राज्यभर याची चर्चा होत आहे.
या संदर्भात सिंदखेडराजा तालुक्यातील साखर खेर्डा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुण्यातही बोर्डाकडून याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बुलढाण्यात गट शिक्षणाधिकारी गावडे यांनी गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. पेपर कुठल्या केंद्रावर लीक झाता हे अद्याप स्थळ समजले नाही. पण याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे आज गणिताचा पेपर फुटला याची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल अशी माहिती अमरावती बोर्डाचे सचिव उल्हास नरड यांनी दिली. विद्यार्थी ११ वाजताच वर्गात बसलेले होते, त्यामुळे याची चौकशी झाल्याशिवाय अधिक बोलता येणार नाही. पण जे कोणी यात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस योग्य ते कारवाई करतील, असे उल्हास नरड यांनी सांगितले.