पुणे: कसब्यात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा ११ हजार ४० मतांनी पराभव केला आहे. रवींद्र धंगेकर विजयी झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून विजयी जल्लोष साजरा केला जात आहे.
कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी ५०. ६ टक्के मतदान झालं होतं. म्हणजेच, २ लाख ७५ हजार ६७९ मतदारांपैकी १ लाख ३८ हजार ०१८ मतदारांनी मतदान केलं होतं.
भाजपच्या ताब्यात असलेले कसबा आणि चिंचवड मतदारसंघ आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झाले होते. त्यासाठी पोटनिवडणुकीची घोषणा झाली होती. तेव्हापासूनच पुणे पोटनिवडणूक चर्चेत होती. पुणे पोटनिवडणूक चुरशीची होणार हे जवळपास निश्चितच होतं.
कसब्यात प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो झाला होता. त्यानंतर त्यांनी भाजपच जिंकणार असा विश्वास व्यक्त केला. या रोड शोनंतर एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला होता. तर दुसरीकडे धंगेकरांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीनेही सर्व ताकद पणाला लावली होती. महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी प्रचाराला हजेरी लावली होती. आदित्य ठाकरेंचा रोड शोदेखील झाला होता. दरम्यान, दोन्ही पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी रोड शो, पदयात्रा, शक्तीप्रदर्शन आणि घरोघरी जाऊन भेटी घेण्यावर भर दिला होता.