Saturday, March 22, 2025
Homeताज्या घडामोडीबापाने बंदी घातलेल्या कंपनीला मुलाने ठेका दिला

बापाने बंदी घातलेल्या कंपनीला मुलाने ठेका दिला

किरीट सोमय्यांचा ठाकरे पिता-पुत्रावर गंभीर आरोप

मुंबई : बापाने ज्या कंपनीवर बंदी घातली, त्या कंपनीला मुलाने वरळी कोविड सेंटरच्या आयसीयूचा ठेका दिला. याशिवाय दहिसर आयसीयूचा ठेकाही याच कंपनीला दिला, असे म्हणत भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ठाकरे पिता-पुत्रावर सडकून टीका केली.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करताना एका चहावाल्याच्या कंपनीला १०० कोटी रुपयांचा ठेका दिल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. ते बुधवारी (१ मार्च) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

“आता नंबर कुणाचा, सुजित पाटकर की संजय राऊत? १०० कोटी रुपयांचा कोविड घोटाळा बाहेर आला. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केले. कोट्यावधी रुपयांचे गैरव्यवहार सापडले. काही आयकर विभाग, काही ईडीने, तर काही मुंबई पोलिसांनी शोधले. संजय राऊत यांचे भागिदार सुजित पाटकर यांच्या ‘लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिस’ या कंपनीला महापालिकेकडून एकूण ३२ कोटी रुपये मिळाले. त्यापैकी १४ कोटी ३ लाख २९ हजार ८३९ रुपये एका वेगळ्याच बँक खात्यात पाठवण्यात आले. या बँक खात्यातून कोणाकोणाला पैसे गेले हा तपास सुरू आहे. आयकर खाते यावर तपास करत आहे. आयकर विभाग, ईडी आणि मुंबई पोलीस यावर तपास करत आहेत. एका मेव्हुण्याच्या खात्यात लाखो रुपये पाठवले गेले. हा मेव्हुणा काही दिवसांनी कळेल. या प्रकरणी ज्यांना अटक झाली, त्यात केईम रुग्णालयाबाहेरचा चहावाला आहे. त्याच्यावर मे २०२२ मध्ये मी धाड घातली होती,” असे किरीट सोमय्यांनी सांगितले.

किरीट सोमय्या पुढे म्हणाले, “एका चहावाल्याच्या कंपनीला १०० कोटी रुपयांचा कोविड सेंटरचा ठेका देण्यात आला. आदित्य ठाकरेंनी तर पुण्यात पीएमआरडीएने बंदी घातलेल्या या कंपनीला वरळीतील आयसीयू ठेका दिला. पीएमआरडीएचे अध्यक्ष तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यानंतर अवघ्या आठ दिवसात तीन कोविड रुग्णांचे मृत्यू झाले. त्यामुळे या कंपनीवर बंदी घालण्यात आली,” असे गंभीर आरोप सोमय्यांनी केले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -