पुणे: होळीच्या आधीच थंडी माघारी फिरली असून फेब्रुवारी महिन्यातील वाढत्या तापमानाने नागरिकांना घाम फोडला. या महिन्यात पारा ४० अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचला. तसेच या पुढील तीन महिने तापमान अधिक उष्ण होईल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. मार्च ते मे महिन्या दरम्यान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
मागील काही वर्षात तापमानात होत असलेली वाढ चिंतेचा विषय ठरतेय. कालच सरलेला फेब्रुवारी महिना गेल्या १४७ वर्षातील सर्वात जास्त उष्ण फेब्रुवारी महिना ठरला आहे. १८७७ साली फेब्रुवारीत सर्वाधिक कमाल तापमान नोंदवण्यात आले होते, त्यानंतर फेब्रुवारी २०२३ हा सर्वात उष्ण फेब्रुवारी महिना ठरलाय. यातच मार्च ते मे महिन्यां दरम्यान गुजरात ते पश्चिम बंगाल पट्ट्यात उष्णतेच्या लाटा थडकतील असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार आहे.
उत्तर कोकणात सोबतच उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अनुभव येणार असून तापमान ४० अंशांपार जाण्याचा अंदाज आहे.
एकीकडे मार्चमध्ये काढणीला आलेल्या पिकांवर उष्णतेच्या माऱ्यामुळे पीक होरपळण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे ला निना वादळानंतर अल निनो वादळाचा प्रभाव वाढत असल्यानं यंदा दुष्काळाची भीती व्यक्त केली जात आहे.