- यशवंत रामचंद्र हाप्पे, (माजी स्वीय सचिव)
स्वर्गीय वसंतरावदादा पाटील यांनी १९७१च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला भरघोस यशाबरोबर १९७२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्येही पक्षाला भरघोस यश मिळवून दिले. दादांच्या या कुशल नेतृत्वावर व कर्तृत्वावर स्वर्गीय इंदिराजी गांधी बेहद खूश झाल्या व त्यांनी आग्रह करून दादा कोणत्याही सदनाचे सदस्य नसताना त्यांना मंत्रिमंडळात यायला लावले व पाटबंधारे आणि ऊर्जा ही खाती देऊन मंत्रिमंडळामध्ये नंबर दोनचे स्थान द्यायला लावले. दादा त्या खात्यांचे मंत्री म्हणून प्रभावी काम करू लागले. पक्षाचे काम करत असताना स्वतःला झोकून देऊन समर्पित भावनेने काम करण्याची त्यांची हातोटी होती. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष असताना माहीम येथे राहत होते. मंत्री म्हणून काम करण्याची पद्धत विलक्षण अशीच होती. कोणत्याही विषयाचे आकलन व्हायला त्यांना फारसा वेळ लागायचा नाही. इतकी त्यांची चिकित्सक बुद्धी होती. पाटबंधारे खात्याचे अभियंते जेव्हा टीएमसीच्या भाषेत त्यांना काही सांगायला लागायचे, तेव्हा दादा त्यांना सांगायचे की, तुमचे हे टीएमसी बाजूला ठेवा आणि किती एकर जागा ओलिताखाली येईल? इतकेच मला सांगा आणि त्यावरून प्रकल्पाचे आडाखे दादा ठरवायचे. १९७२ ते १९७५ अशी चार वर्षे स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात काम केल्यानंतर सन १९७५ साली स्वर्गीय शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी काम केले. स्वर्गीय दादा हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक होते. त्यामुळे त्यांना चव्हाण गटाचे मानले जात असे. स्वर्गीय शंकरराव चव्हाण आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे राजकारणामध्ये फारसे पटत नव्हते. त्यामुळे त्यांनी दादांना मंत्रिमंडळातून वगळले. मंत्रिमंडळातून बाहेर पडल्यानंतर दादांनी सरकारी कर्मचारी व त्यांच्या वापरात असलेली सरकारी गाडी मंत्रालयातच सोडून दिली आणि घरची गाडी मागवून आपल्या माहीम येथील घरी आले. त्यावेळी मंत्री असताना त्यांनी सरकारी बंगला घेतला नव्हता. आपल्या स्वतःच्याच घरी राहत होते.
मंत्रिमंडळातून अवमानकारकरीत्या बाहेर पडावे लागले ही त्यांच्या मनाला अत्यंत खटकणारी बाब होती. जे मंत्रीपद त्यांनी मागितले नव्हते, ते त्यातून काढले गेले. ही गोष्ट त्यांच्या जिव्हारी लागली होती. म्हणून त्यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निश्चय जाहीर केला आणि १३ नोव्हेंबर १९७६ रोजी त्यांच्या ६०व्या वाढदिवसानिमित्तांनी त्यांनी ही घोषणा करायची ठरविले होते. त्यावेळेस त्यांना त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी, नेत्यांनी या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला; परंतु दादांनी कोणाचेही ऐकले नाही आणि त्यांनी सांगली येथे लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये आपल्या राजकारण संन्यासाची घोषणा जाहीर केली. त्यावेळी नागपूर येथे अधिवेशन चालू होते. तरीही जवळजवळ अर्धे मंत्रिमंडळ आणि बहुसंख्य आमदार या कार्यक्रमाला उपस्थित होते. संन्यासामध्ये जायचे ठरविले होते. तेव्हा त्यांनी आपले पुतणे स्वर्गीय विष्णू अण्णा पाटील यांना बोलावून घेतले आणि पदमाळे या त्यांच्या गावातील शेतावर शिवसदन हौसिंग सोसायटी या तयार घरे उभारून देणाऱ्या संस्थेकडून एक घर बांधून घ्यायला सांगितले, त्या घराला वरून सिमेंटचा पत्रा होता आणि त्यावेळी त्याची किंमत ३० हजार रुपये होती. स्वर्गीय दादा या घरांमध्ये ५/६ महिने वास्तव्यास होते. त्यावेळी मलाही त्यांच्याबरोबर राहण्याची संधी मिळाली होती.
याचदरम्यान महाराष्ट्रामध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागला होता. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता आणि मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहू लागले. त्यावेळी दादांचे अनेक सहकारी सांगलीला आले आणि पक्षाचे घर जळत असताना तुम्ही ते शांतपणाने कसे काय बघत आहात? अशी विचारणा करून दादांना ते अक्षरशः गाडीत घालून मुंबईला घेऊन गेले आणि मग मुंबईमध्ये रिट्झ हॉटेलमध्ये बैठका झाल्या आणि बहुसंख्य आमदारांनी दादांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी गळ घातली आणि त्याप्रमाणे दादा मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार झाले. दादांनी मुख्यमंत्री व्हायला स्वर्गीय राजारामबाबू पाटील यांचा विरोध होता म्हणून त्यांनी स्वर्गीय यशवंतराव मोहिते यांना दादांच्या विरोधात उभे केले. त्यात दादा जिंकले आणि यशवंतराव मोहिते हरले. यशवंतराव मोहितेंविरोधात उभे राहूनही दादांनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्री म्हणून घेतले. दादांचा इतका दिलदार स्वभाव होता. त्यावेळी राजारामबाबू पाटील हे काँग्रेसमधून बाहेर पडले आणि जनता दल पार्टीमध्ये गेले. पुढील काही काळ गेल्यानंतर १९७८ला निवडणुका जाहीर झाल्या. त्यावेळी स्वर्गीय दादा हे स्वर्गीय राजारामबाबू पाटील यांना म्हणाले की, बापू, तुम्ही पक्ष सोडून गेलेले आहात, तर यावेळी मी तुम्हाला निवडणुकीमध्ये पाडणार आहे. त्याप्रमाणे त्यांनी स्वर्गीय विलासराव शिंदे यांच्यासारख्या जि. प. उपाध्यक्ष असलेल्या कार्यकर्त्याला बापूंसमोर उभे करून त्यांचा पराभव केला. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला काही यश मिळाले आणि काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस संयुक्त सरकार तयार होऊन स्वर्गीय दादा मुख्यमंत्री व स्वर्गीय नाशिराव तिरपुढे हे उपमुख्यमंत्री झाले. तिरपुढे हे नेहमीच काहीना काही तरी वादग्रस्त विधाने करायचे, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्यावरही टीका करायचे. दादांना मुख्यमंत्री म्हणून काम करण्यामध्ये अडथळे आणायचे. मग दादाही या कारभाराला कंटाळले होते; परंतु कसे तरी सरकार रेटून नेत होते. याच परिस्थितीचा शरदराव पवार यांनी संधीचा फायदा घ्यायचा विचार केला आणि आपण मुख्यमंत्री बनू शकतो याचे सर्व आडाखे बांधून दादांचे सरकार पाडायचे ठरविले. ‘शरदने माझ्या पाठीत खंजीर खुपसला, ’असे दादांचे त्यावेळेचे वाक्य होते. या घडामोडीनंतर दादांनी इंदिरा गांधी यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला.
दादा आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी मोठ्या संख्येने इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि महाराष्ट्रामध्ये इंदिरा काँग्रेस पक्षाला यश मिळवून देण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रात दौरे केले. पक्षाला मजबुती आणली. या सर्व गोष्टींचा परिपाक हा १९८० साली झालेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीमध्ये इंदिरा काँग्रेस पक्षाला भरघोस यश मिळण्यामध्ये झाला. पुढे १९८० साली दादा लोकसभेवर प्रचंड मतांनी निवडून आले. आपल्याबरोबर आपल्या अनेक सहकाऱ्यांना संधी देऊन त्यांनी महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला प्रचंड बहुमत मिळवून दिले. खरे म्हणजे त्यावेळेला दादांना एका दिवसासाठी का होईना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायचे होते. याचे कारण की, १९७८ साली त्यांना अपमानास्पदरीत्या त्या पदावरून जावे लागले होते. ती खंत त्यांच्या मनामध्ये होती. त्यासाठी मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी त्यांची इच्छा होती. ती इच्छा पूर्ण झाली नसली तरी त्यांनी मुख्यमंत्री पदावर असताना घेतलेले धोरणात्मक निर्णय आजही स्मरणात राहणारे आहेत. दादांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली!