भाईंदर: मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या बस चालकाला भर रस्त्यात एका तरुणाने मारहाण केल्यामुळे संतप्त झालेल्या परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांनी मीरा-भाईंदर शहरातील बस सेवा बंद करून निषेध नोंदवला आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे, मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे बस चालक रामेश्वर बिडवे हे क्रमांक १७ ही बस मीरा रोड स्टेशन ते विनय नगर पर्यंत नेत होते. यावेळी एस. के. स्टोन नाक्याजवळ एका मोटासायकलस्वार तरुणाला जाण्यासाठी जागा न दिल्याने त्याने चालकाला बस थांबविण्यास लावली. त्यानंतर त्याने बस चालकाला खाली उतरवून मारहाण केल्याने संतप्त झालेल्या परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांनी मीरा- भाईंदर शहरातील बस सेवा बंद केली. तसेच पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. दरम्यान, हा चक्क परिवहन सेवेच्या ठेकेदाराचा मुलगा गेविन हेरल बोर्जीस असल्याची माहिती मिळत आहे.