
कल्याण : एकीकडे बीएसयूपी योजनेंतर्गत कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील विविध रस्ते रुंदीकरणात बाधित नागरिकांना मोफत घरे देण्यात आले. मात्र दुसरीकडे अजूनही कल्याण पश्चिमेतील इंदिरा नगर येथील १४७ लाभार्थी घरांपासून वंचित आहेत. जोपर्यंत इंदिरा नगर येथील लाभार्थ्यांना घरे मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे इंदिरा नगर विकास संघ यांनी इशारा दिला आहे.
कल्याण पश्चिमेतील इंदिरा नगर झोपडपट्टी येथील नागरिकांसाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या माध्यमातून बीएसयूपी योजना आणण्यात आली होती. ३३० लाभार्थ्यांचे बायोमेट्रिक पद्धतीने सर्वे केला आणि त्यांची घरे तोडण्यात आली. २००७ साली सर्व्हे करण्यात आला. तर २०१० साली घरे तोडण्यात आली. आज २०२३ हे साल सुरू असून आजही १४७ लाभार्थी घरांपासून वंचित आहेत. याबाबत इंदिरा नगर विकास संघाच्या माध्यमातून पालिका आयुक्त दांगडे यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला. आजच्या सुरू असलेल्या सोडतीत आपली नावे आहेत का? याची माहिती घेण्यासाठी आले असता नावे यात नसल्याचे निदर्शनास आले. यात रस्ता रुंदीकरणातील बाधितांची नावे आहेत. येथील इंदिरा नगर बधीताना घरे मिळत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहणार असल्याचे दीपक थोरात यांनी सांगितले.