Sunday, May 18, 2025

अध्यात्म

आपले सर्वस्व

आपले सर्वस्व

  • सद्गुरू वामनराव पै


आज जगात फार प्राचीन काळापासून ते आजतागायत “परमेश्वर आहे का?” या विषयांवर आस्तिक व नास्तिक दोन्ही पक्षांकडून अनेक विचार मांडले गेले आहेत. यापुढेही हा वाद संपणार नाही. पण आम्ही जो विषय मांडलेला आहे, तो जर लक्षात घेतला, तर “परमेश्वर आहे का?” हा प्रश्नच निर्माण होणार नाही. कारण, तो १०० टक्के आहेच. परमेश्वर हे आपल्या जीवनाचे सर्वस्व आहे. “सर्वस्व” हा शब्द अधोरेखित करून ठेवायला हवा. “सर्वस्व” याचा अर्थ आपले “सर्व” जे आहे ते या“स्व”मध्ये आहे. आता हे जगसुद्धा एवढे मोठे असले तरी ते “आपल्या”मध्येच आहे. सगळा संसार “स्व”मध्ये आहे. सगळा परमार्थ “स्व”मध्ये आहे. हा “स्व” जो आहे त्यालाच देव म्हणतात. त्याला परमेश्वर, परमात्मा, चैतन्यशक्ती अशी अनेक नावे दिलेली आहेत. भगवद्गीतेने त्याला ईश्वर हे नाव दिले. ही सगळी जी नावे आहेत ती “स्व”ला दिलेली आहेत. या “स्व” शब्दाचा अपभ्रंश “शिव” होतो. ज्याला आपण “शिव” म्हणतो तो “स्व” आहे. “स्व” या शब्दापासूनच “शिव” हा शब्द आला. आपण शंभू म्हणतो हा शंभू म्हणजे “स्वयंभू” आहे. “स्वयंभू” या शब्दापासून “शंभू” हा शब्द निर्माण झाला. स्व, शिव, स्वयंभू, शंभू हे सर्व शब्द पाहिले, तर स्वयंभू म्हणजे ज्याचे अस्तित्व हे अन्य कुणीही निर्माण केलेले नाही. ज्याला कुणी निर्माण केलेले नाही. त्याला स्वयंभू म्हणतात. आम्ही याला नैसर्गिक हा शब्द वापरला. जीवनविद्या तत्त्वज्ञानांत परमेश्वराचे स्थान अपरंपार आहे. तो आपल्या जीवनाचे सर्वस्व आहे. त्याच्याशिवाय आपण एक पाऊलही टाकू शकत नाही. त्याच्याशिवाय आपण बोलू शकत नाही. त्याच्याशिवाय आपण ऐकू शकत नाही. त्याच्याशिवाय आपल्याला पाहता येणार नाही. त्याच्याशिवाय आपल्याला काही करता येणार नाही. आपल्याला आपला हात असा उचलायचा झाला तरी तो पाहिजे. परमेश्वर पाहिजे, तरच ते आपण करू शकतो. त्याने जर तुमच्या संबंध तुटला किंवा तोडला तर? परमेश्वराचा व तुमचे हे जे शरीर आहे, त्याचा संबंध जोडला गेला, तर तुम्ही सर्व काही करू शकता. पण संबंध तुटला किंवा तोडला, तर काही करू शकत नाही. कुणी जर ही ट्यूबलाइट फोडली, तर प्रकाश पडू शकणार नाही तसे माणसे एकमेकांची डोकी फोडतात तेव्हा परमेश्वराचा व शरीराचा संबंध तुटतो. टीव्हीवर जेव्हा मी तुम्हाला दिसतो, माझे बोलणे तुम्हाला ऐकू येते. कारण हे सर्व परमेश्वरामुळेच चाललेले आहे. आत परमेश्वर नसेल, तर माझे बोलणे लोकांना ऐकू येणार नाही. मी तुम्हाला दिसणार नाही. परमेश्वर नसेल, तर हे सगळेच ठप्प होईल. म्हणूनच जीवनात परमेश्वर किती महत्त्वाचा आहे, हे लक्षात घ्या.

Comments
Add Comment