Share
  • इंडिया कॉलिंग: डॉ. सुकृत खांडेकर

दिल्लीचे उपमुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे (आप)चे नंबर २ नेते मनीष सिसोदिया यांना सीबीआयने अटक केल्यानंतर पक्षाचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. सिसोदिया आणि पक्षाला वाचवणे हे त्यांचे प्रथम काम आहे. एकीकडे काँग्रेस आणि भाजपला राष्ट्रीय पर्याय म्हणून आपचा विस्तार होत असतानाच सीबीआयच्या रडारवर आपचे नेते आले आहेत. विशेष म्हणजे स्वच्छ प्रतिमा म्हणून गाजावाजा केलेल्या या पक्षाचे डझनभर नेते वेगवेगळ्या घोटाळ्यांत व गैरव्यवहारात गुंतले आहेत. आप बचाव हे अभियान चालविण्याची पाळी केजरीवाल यांच्यावर आली आहे. मनीष सिसोदिया यांच्यासह सत्येंद्र जैन, विजय सिंगला, गीता रावत, जयवंत सिंग, बलबीर सिंग, निशा सिंग, अमानुल्ला खान, युवराज सिंग जडेजा, सोमनाथ भारती, गोपाल इटलिया, ताहिर हुसेन, अशा आपच्या नेत्यांची गंभीर आरोपाखाली चौकशी चालू आहे किंवा त्यांना शिक्षा झाली आहे.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया सीबीआयच्या जाळ्यात सापडले आहेत, सीबीआयच्या तावडीतून आपली सुटका व्हावी म्हणून त्यांनी सर्वोच्च न्यायालयाची दारे ठोठावली. आपमध्ये केजरीवाल यांच्यानंतर सिसोदिया हे सर्वात मोठे नेते आहेत. सीबीआयने केलेल्या अटकेनंतर त्यांच्याभोवती संशायाचे वातावरण निर्माण झाले. आप आणि दिल्ली सरकार यामध्ये सिसोदिया यांची नेमकी काय भूमिका होती? सिसोदिया यांना सीबीआयच्या कोठडीत राहावे लागले, तर पक्षावर त्याचा काय परिणाम होईल? सिसोदिया यांच्या पाठीशी पक्ष भक्कम उभा आहे हे जनतेला दाखविण्यासाठी पक्षाला काय करावे लागणार आहे? आम आदमी पक्षात सिसोदिया यांना पर्याय नाही आणि त्यांच्या तोडीचा दुसरा नेता शोधणे हे इतके सोपे नाही. दिल्ली सरकारमध्ये एकूण ३३ खाती (मंत्रालय) आहेत. त्यापैकी १८ खाती सिसोदिया यांच्याकडे आहेत. पण त्यांचा नेहमी उपमुख्यमंत्री किंवा शिक्षणमंत्री एवढाच वारंवार उल्लेख होत असतो. एवढी आणि महत्त्वाची खाती एकाच व्यक्तीकडे आहेत, याची कधी कोणी चर्चा करीत नाही. सिसोदिया यांच्याकडे शिक्षण, नियोजन, अर्थ, जमीन व इमारती, दक्षता, सेवा, पर्यटन, कला व सांस्कृतिक, कामगार, रोजगार, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग, पाणीपुरवठा आदी खाती आहेत. केजरीवाल यांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास व मोठा भरंवसा आहे, म्हणूनच एवढी भारंभार खाती सिसोदिया यांच्याकडे सोपवली आहेत. एक मंत्री दीड डझन खात्यांना वेळ देऊ शकतो का? एवढ्या खात्यांना न्याय तरी देऊ शकतो का? पण त्याबाबत कोणी प्रश्न विचारत नाहीत. मात्र सिसोदिया यांना मद्य घोटाळा प्रकरणी अटक झाल्यानंतर आपचे कार्यकर्ते सीबीआय विरोधात निदर्शनासाठी रस्त्यावर आणले जात आहेत. एक्कावन्न वर्षांचे मनीष सिसोदिया हे राजकारणात येण्यापूर्वी पत्रकार होते. काही काळ ते आरटीआय कार्यकर्ता म्हणूनही सक्रिय होते. कबीर आणि परिवर्तन ही संस्था ते चालवत होते. अरविंद केजरीवाल यांच्या पब्लिक कॉज रिसर्च फाऊंडेशन या संस्थेचे काम करीत होते. २६ नोव्हेंबर २०१२ रोजी स्थापन झालेल्या आम आदमी पक्षाचे ते कार्यकारिणी सदस्य झाले. २०१३ मध्ये त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक लढवली व पटपडगंज मतदारसंघातून विजयी झाले. अर्थमंत्री म्हणून दिल्ली सरकारच्या आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पाची तयारी तेच करीत होते. आप सत्तेवर येण्यापूर्वी दिल्ली सरकारचे बजेट ३० हजार कोटींचे होते, आता ते ७५ हजार कोटींचे झाले आहे. दिल्लीचे अर्थमंत्री सीबीआय कोठडीत राहणार असतील, तर बजेटच्या तयारीवर निश्चित परिणाम होईल.

सरकार व पक्षात सिसोदिया यांच्यावर मोठी जबाबदारी आहे, त्यामुळे त्यांच्या अटकेचा परिणाम दोन्हींवर होण्याची शक्यता आहे. आम आदमी पक्ष व अरविंद केजरीवाल यांच्या इंडिया अगेंस्ट करप्शन या आंदोलनाला हिंदी भाषिक पट्ट्यात भरपूर समर्थन मिळाले. आपची कार्यपद्धतीही हिंदी भाषिकांचा विश्वास संपादन करणारी ठरली. हिंदी भाषिक पट्ट्यात वर्षानुवर्षे भाजपची मक्तेदारी आहे. तेथे भाजपला आव्हान देण्याचे काम आप करीत आहे. या वर्षी मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. आपने २०१९ मध्ये या राज्यात आपली केडर उभी करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा विस्तार या वर्षी करण्याचा आपचा प्रयत्न आहे. पण सिसोदिया यांच्या अटकेनंतर त्याला खिळ बसण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये मिळालेल्या विजयानंतर अन्य राज्यांत गंभीरपणे निवडणुका लढविण्याचे आपने ठरवले आहे. निवडणुकांचा आराखडा व रणनिती आखण्यात सिसोदिया यांची महत्त्वाची भूमिका आहे.

सिसोदिया यांच्या अटकेनंतर देशात आपची प्रतिमा एक भ्रष्टाचारी व घोटाळेबाजांचा पक्ष अशी होऊ शकते, अण्णा हजारे यांच्या आंदोलनातूनच आपची बीजे पेरली गेली. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारा व स्वच्छ प्रतिमेचा पक्ष असा आपने नेहमीच गवगवा केला. आता मात्र सिसोदियांसह डझनभर नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर येतात, याचा दुसरा अर्थ काय समजायचा? ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्याला समर्थन देणे आणि ज्या यंत्रणांनी कारवाई केली त्यांच्या कार्यालयासमोर पक्षाचे आंदोलन करणे यातून देशाला काय संदेश दिला जातो? मोदी सरकार आपच्या नेत्यांवर केवळ आकसाने कारवाई करीत आहे, असे आरोप करून दिल्लीकर जनतेची सहानुभूती मिळवणे एवढेच आपच्या हातात आहे. जनतेची सहानुभूती मिळविण्यासाठी आपने सध्या सोशल मीडियाचा जोरदार वापर सुरू केलेला दिसतो. राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसला देशात १९ ते २० टक्के मतदान होते. आम आदमीला देशपातळीवर काँग्रेसच्या एक चतुर्थांश सुद्धा मते मिळत नाहीत. त्यामुळेच देशपातळीवर भाजप व काँग्रेसला आम्ही पर्याय आहोत, असे चित्र उभे करणे हे आपला इतके सहज सोपे नाही. दिल्ली व पंजाबमध्ये सत्ता काबीज केल्यानंतर उत्तर प्रदेश किंवा हिमाचल प्रदेशमधील निवडणुकीत आपला आपली जादू दाखवता आली नाही. गुजरातमध्ये आपने हवा निर्माण केली पण भाजपच्या ताकदीपुढे आपला केवळ विधानसभा प्रवेशावरच समाधान मानावे लागले आहे. सिसोदियांची अटक हा मुद्दा भावनिक बनवण्याचा प्रयत्न आपकडून होतो आहे. सीबीआयच्या कार्यालयात चौकशीसाठी जाण्यापूर्वी मनीष सिसोदिया आपल्या मोटारीच्या टपावर उभे राहिले व त्यांनी म्हटले, मी जीवनात नेहमीच इमानदारीने व मेहनत करून काम केले. लोकांनी दिलेल्या प्रेमामुळेच मी दिल्लीच्या उपमुख्यमंत्रीपदावर पोहोचलो. जीवनात मी खूप चढ-उतार पाहिले. मी टीव्ही चॅनेलची नोकरी करीत होतो. तिथे चांगले वेतन होते व बढतीही मिळत होती. पण ते सोडून अरविंद केजरीवाल यांना साथ देण्याचे ठरवले व दिल्लीच्या गरीब वस्तीत, झोपडपट्टीत काम करू लागलो. मी आता जेलमध्ये जाणार आहे, माझी पत्नी घरी आजारी आहे. ती घरात एकटी आहे, तिची तुम्हीच काळजी घ्या…. दिल्ली सरकारने मद्य विक्रीविषयक जे धोरण ठरवले त्यात खासगी ठेकेदारांना खूप लाभ झाला, खासगी कंपन्यांसाठी मार्जिन मनी वाढविण्यात आला. त्यात मोठा भ्रष्टाचार झाला, या खेळात अबकारी कर अधिकारी आपणहून सहभागी होते की, त्यांच्यावर दबाव होता, अशा मुद्द्यावर सीबीआय तपास करीत आहे. शिक्षण मंत्री म्हणून दिल्लीतील शाळा अद्ययावत व आधुनिक बनविण्यात सिसोदियांची महत्त्वाची भूमिका होती. शिक्षण क्षेत्रातील पोस्टर बॉय अशी सिसोदियांची प्रतिमा बनली होती. हाच पोस्टर बॉय आज सीबीआयच्या जाळ्यात हात-पाय मारताना दिसतो आहे. दिल्ली सरकारच्या मद्य घोटाळा प्रकरणी सीबीआयने ७ राज्यांत २१ ठिकणी छापे मारून पुरावे गोळा केले आहेत. सीबीआयने सादर केलेल्या आरोपपत्रात सिसोदियांसह अन्य पंधरा आरोपींची नावे आहेत.

sukritforyou@gmail.com
sukrit@prahaar.co.in

Recent Posts

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंचा अ‍ॅक्शन मोड! अडकलेल्या पर्यटकांना आणण्यासाठी जम्मू-काश्मीरकडे रवाना

मुंबई : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे (Pehalgam Terror Attack) जगभरात एकच खळबळ…

21 minutes ago

NEET Student Suicide : ‘परीक्षा आणि कुटुंब जबाबदार नाहीत’ चिठ्ठी लिहित १८ वर्षीय विद्यार्थ्याने घेतला गळफास!

पटना : बिहारमधील एका नीटची (NEET) परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक…

37 minutes ago

प्रत्येक नागरिकाला सुखरुप घरी परत आणणे हीच प्राथमिकता – अजित पवार

मुंबई : पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मिरमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी…

49 minutes ago

Pahalgam Terror Attack : पुन्हा सर्जिकल स्ट्राईक होणार? पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून राजनाथ सिंहांचा इशारा

नवी दिल्ली: पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात (Pahalgam Terror Attack) देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला…

52 minutes ago

Sanju Rathod Shaky Song : ‘गुलाबी साडी’ नंतर संजू राठोडचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : संजू राठोडने (Sanju Rathod) गायलेले 'गुलाबी साडी' (Gulabi Sadi) हे गाणं प्रचंड लोकप्रिय…

1 hour ago

Pahalgam Terror Attack: प्रविण तरडेवर कोसळला दुःखाचा डोंगर, पहलगाम हल्ल्यात गमावला जीवलग मित्र

पुणे: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात मराठी अभिनेता…

2 hours ago