मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वरकरणी शांत आणि संयमी वाटतात आणि बोलतातही तसेच; परंतु जेव्हा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अकारण त्यांच्या सरकारवर वेगवेगळे आरोप केले, तेव्हा मात्र शिंदे यांनी रविवारी चहापानानंतरच्या पत्रकार परिषदेत बोलताना आपण सणसणीत प्रत्युत्तर देऊन विरोधकांची बोलती बंद करू शकतो, याचे प्रत्यंतर अवघ्या महाराष्ट्राला दाखवून दिले. त्यांना उगाचच भावनिक ट्वीट करावे लागत नाही. अजित पवार यांचे सध्या आपल्या काकांशी पटत नाही आणि त्यातूनच त्यांनी ‘२००४ मध्ये संधी आली असताना राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रीपद घेतले नाही’, याबद्दल खंत व्यक्त केली होती. पहाटेच्या शपथविधीबाबत फडणवीस यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या सल्ल्यानेच तो सारा प्रयोग झाला होता, असे सांगितल्यावर पवारांनी फडणवीस यांच्याबद्दल प्रतिक्रिया दिली. पण त्या पहाटेच्या शपथविधीत एक भागीदार असलेले अजित पवार यांनी अद्यापही तोंड उघडलेले नाही. त्यामुळे अजित पवार यांचे मौन सूचक असल्याचा अर्थ माध्यमांनी काढला. आपल्यावर भाजपबद्दल सॉफ्ट कॉर्नर असल्याचा आरोप होऊ नये, म्हणून अजित पवार सध्या भाजप आणि शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल करत असल्याची चर्चा आहे.
शिंदे यांनी अजित पवार यांच्या प्रत्येक आरोपावर जे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे, त्यामागे ही सारी राजकीय पार्श्वभूमी आहे, हे लक्षात घ्यायला हवे. अजित पवार यांनी जेव्हा वर्षावरील चहापानाच्या बिलासंबंधी आरोप केला, तेव्हा शिंदे यांनी आम्ही वर्षावर आलेल्यांना बिर्याणी खाऊ घालतो का?, असा जोरदार टोला लगावला. याचा संदर्भ वाचकांच्या लक्षात असेल, तर अजमल कसाबशी आहे. जेव्हा राष्ट्रवादीकडे गृहखाते होते, तेव्हा कसाबला बिर्याणी खाऊ घातली होती, असे माध्यमांत चर्चिले गेले होते. वर्षावरील चहापानाच्या बिलावर आरोप करणाऱ्या अजित पवारांवर शिंदे यांनी सिंचन घोटाळ्याचा उल्लेख करून सांगितले की, ७० हजार कोटी रुपयांचा सिंचनावरील खर्च करूनही एक अंशही जमीन भिजली नाही. शिंदे यांच्या या उत्तरामुळे कदाचित आता पवार यांना काय उत्तर द्यावे ते सुचत नसेल. शिवाय आम्हाला प्रायश्चित्त करून क्लेश घ्यावे लागत नाही, असेही शिंदे यांनी पवारांच्या धरणाच्या संदर्भातील भाष्याचा अप्रत्यक्ष उल्लेख करून उत्तर दिले आहे. याचा अर्थ असा की, शिंदे हे राजकारणातील कच्चे खेळाडू नाहीत. तेही ३० वर्षे राजकारणात आहेत. त्यामुळे त्यांनाही खूप गोष्टी माहीत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला अटक करण्याचा डाव रचला होता, असे जेव्हा सांगितले, तेव्हा शिंदे यांनी त्यास दुजोरा दिला आहे. त्यापुढेही जाऊन त्यांनी गिरीश महाजन यांना संघटित गुन्हेगारी कायद्याची कलमे लावण्याची तयारी सरकारने केली होती, असे सांगून महाविकास आघाडीचा खोटारडेपणा चांगलाच उघडकीस आणला.
फडणवीस आणि महाजन यांना अटक करण्याची चर्चा झाली, तेव्हा मीही एक साक्षीदार होतो, असे सांगून त्यांनी महाविकास आघाडीला अडचणीत आणले आहे. फडणवीस यांना अटक करण्याचे कसलेही प्रयत्न झाले नाहीत, असा खुलासा कुणीही न सांगता आणि फडणवीस यांनी ज्यांचे नावही घेतले नाही, त्या माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केला. शिंदे यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे त्यांनी अटकेचा निर्णय तर बदललाच. पण मविआ सरकारलाच घरी बसवले. पण शिंदे यांच्या या सडेतोड उत्तराने सर्वाधिक पंचाईत झाली, ती अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांची. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जेवण्याच्या ताटावरून उठवून तुरुंगात डांबण्याची तयारी करण्यापर्यंत मविआ सरकारची मजल गेली होती. याबद्दलही शिंदे यांनी भरपूर सुनावले आहे. कंगना राणावत वगैरे सारीच प्रकरणे शिंदे यांनी काढून मविआला सध्या तरी बॅकफूटवर पाठवले आहे. त्यामुळे अधिवेशनात भरपूर दारूगोळ्यासहित हल्ला चढवू, असे मनाचे मांडे खात असलेल्या मविआला आता नवीन डावपेच रचावे लागतील. त्यांचे प्रत्येक अस्त्र शिंदे आणि फडणवीस यांनी निकामी केले आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर यांच्याशी पैशाचे व्यवहार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या नवाब मलिक यांचा राजीनामा अखेरपर्यंत घेतला नाही, याबद्दलही शिंदे यांनी जाब विचारला आहे.
चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्याबद्दल बरे झाले, देशद्रोह्यांबरोबर चहा घेण्याची वेळ तरी टळली, हे शिंदे यांचे उत्तर अजित पवार यांना काही दिवस तरी निपचित ठेवेल. आता इतकी सरबत्ती झाल्यावर मविआचे नेते काय उत्तर देतात?, याची उत्सुकता आहे. अजित पवार यांना काहीतरी बोलावेच लागेल. ते जर मौन धारण करून राहिले, तर शिंदे यांचे आरोप सत्यच आहेत, हे आपोआपच सिद्ध होईल. अजित पवारांना प्रत्येक मुद्यावर उत्तर देऊन शिंदे आणि फडणवीस दोघेही विरोधकांच्या विधिमंडळ सभागृहातील हल्ल्याला जोरदार उत्तर देण्यासाठी सज्ज आहेत, याचेच हे निदर्शक आहेत. त्यामुळे कालपासून सुरू झालेले अधिवेशन हे वादळी ठरणार आहे, याचेही संकेत मिळाले आहेत. फडणवीस आणि शिंदे यांनी विरोधकांच्या तोफखान्याला उत्तर देण्यासाठी आपलाही तोफखाना सज्ज केला आहे. शिवाय फडणवीस यांनी ‘पहाटेच्या शपथविधीबद्दल अर्धेच बोललो आहे, उरलेले अर्धे योग्य वेळ येताच बोलेन’, असे सांगून काका-पुतण्याच्या डोक्यावर टांगती तलवार ठेवली आहे. मविआची प्रत्येक चाल यापुढे कुचकामी ठरेल, याचेही संकेत शिंदे यांच्या जोरदार बॅटिंगमुळे मिळाले आहेत.