- सेवाव्रती: शिबानी जोशी
लोकसेवा समिती ही संस्था धाराशिव जिल्ह्यात शिक्षण, आरोग्य, जलसंधारण अशा क्षेत्रात १९८९ पासून निस्पृहपणे काम करणारी एक अग्रगण्य संस्था आहे. राष्ट्रीय विचाराच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेली ही संस्था सामाजिक कामच्या माध्यमातून समाजासमोर आली आणि नंतर शैक्षणिक कामाचा विस्तार केला. शेषाद्री डांगे आणि अॅड. मिलिंद पाटील यांच्यासारखे संघ कार्यकर्ते धाराशिव जिल्ह्यात समाजकार्य करीत होते.
मागच्या भागात आपण वेंकटेश महाजन महाविद्यालयाची माहिती घेतली ती संस्था आणि ही संस्था या भगिनी संस्था म्हणून हातात हात घेऊन काम करत असतात. तपस्वी ट्रस्ट च्या अध्यक्ष सध्या खासदार पूनम ताई महाजन आहेत, तर लोकसेवा समितीचे अध्यक्षपद अॅडवोकेट मिलिंद पाटील हे सांभाळत आहेत. सुरुवातीला धाराशिव पासून खूप आत असलेल्या ग्रामीण भागात शिक्षण, रहाण्याची काहीच सोय नव्हती त्यामुळे तिथे प्रथम भटके-विमुक्त जमातीतील मुलांसाठी आश्रम शाळा सुरू करण्यात आली आणि नंतर धाराशिव येथे राष्ट्रीय विचार रुजवण्यासाठी शाळा सुरू करण्यात आली.
संस्थेच्या अंतर्गत धाराशिव शहरात आर्य चाणक्य विद्यालय १९९६ पासून सुरू आहे. या शाळेत बालवाडी ते १२वीपर्यंतचे वर्ग आहेत आणि जवळपास १००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. धाराशिवपासून ३० किलोमोटर अंतरावर संस्थेची ‘समर्थ आश्रम शाळा’ ही भटके-विमुक्त संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी काम करणारी शाळा आहे. पहिली ते १२वीपर्यंतचे वर्ग आणि जवळपास ६०० निवासी आणि ३०० अनिवासी विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. सांस्कृतिक उपक्रमात एक वेगळा ठसा या दोन्ही शाळांनी निर्माण केला आहे. विद्याभारतीची पंचकोश आधारित शिक्षण पद्धती शाळेच्या प्राथमिक विभागात प्रभावीपणे राबविली जाते. महिला पालक मेळावे, शिक्षक प्रशिक्षण, विद्यार्थी गृह-भेटी, क्रांती दिनानिमित्त प्रभातफेरी, विविध रोबोटिक्स प्रोजेक्ट्स आदी बाबींवर विशेष भर दिला जातो. अटल लॅब, गणित प्रयोगशाळा हे विद्यार्थ्यांचे विशेष आकर्षण आहेत. दोन्ही शाळांचा १०वी व १२वीचा निकाल ९५% पेक्षा जास्तच असतो. ग्रामीण भागातील आणि वंचित घटकातील विद्यार्थी शाळेत मोठ्या प्रमाणात आहेत. या दोन्ही शाळा संस्थेच्या नॉन प्राॅफिटेबल युनिट आहेत. इथले शिक्षक मेहनती आणि विद्यार्थ्यांसाठी वेळ देणारे आहेत. ‘संस्कृत’ आणि ‘संगीत’ यासारख्या विषयांवर विशेष लक्ष केंद्रित करून विद्यार्थ्यांची जडणघडण ‘राष्ट्रीय चारित्र्य’ घडविण्यासाठी केली जाते. ‘मराठी माध्यमाच्या’ या शाळा मार्क मिळविण्यासाठीच्या स्पर्धेत राहण्यापेक्षा स्वविकासावर भर देऊन विद्यार्थी विकासास चालना देण्याचे काम अविरतपणे करीत आहेत. ‘शिक्षणातून समाज परिवर्तन’ हे ध्येय डोळ्यांसमोर ठेऊन संस्थेच्या खंबीर साथ आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून या शाळा वाटचाल करीत आहेत.
धाराशिव शहरातील एक निष्णात वकील आणि महाराष्ट्र व गोवा बार कौंसिल चे विद्यमान अध्यक्ष अॅड. मिलिंद पाटील हे संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. यांच्या प्रेरणेने आणि संकल्पनेतून या दोन्ही शाळांचा विस्तार झाला आहे. याशिवाय संस्थेतर्फे आरोग्य क्षेत्रातही काम केले जाते. आरोग्य शिबिरे भरवली जातात. शाळेमध्ये विद्याभारती चे उपक्रम राबवून राष्ट्रीय विचार आणि संस्कारांची ओंजळ भरून मुलांना एक चांगला नागरिक घडवण्याचे प्रयत्न केले जातात. कोरोना काळामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण तर दिलेच; परंतु संपूर्ण महाराष्ट्रातल्या जवळपास चारशे ते साडेचारशे शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे कामही संस्थेने केल. त्याचा उपयोग अनेक शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी घेतला.
शालेय उपक्रमाव्यतिरिक्त विविध सामाजिक कार्य समितीतर्फे केली जातात. गेली १२ वर्षे लोकसेवा समितीतर्फे अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून निरलस, निरपेक्ष वृत्तीने काम करणाऱ्या व्यक्तीला ‘लोकसेवा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येते. वृद्धाश्रम चालवणारे श्रीनिवास जोशी, कळंब इथून जाणाऱ्या सर्व दिंड्यांना भोजनाची व्यवस्था करणारे बंडोपंत दशरथ, कोरोना काळामध्ये जवळपास साडेचारशे अंत्यविधी करणारे गोरे नावाचे नगर परिषद कर्मचारी, औरंगाबादला वंचित वस्तीमध्ये स्वतः राहून काम करणारे दिवाकर कुलकर्णी त्यांच्या पत्नी अशा अपरिचित पण निष्ठेने काम करणाऱ्या व्यक्तींना हे पुरस्कार दिले जातात. देशभरात आता नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. त्यात मातृभाषेतील शिक्षणावरही भर देण्यात आला आहे. भावी काळात ‘नवीन शैक्षणिक धोरणास अनुसरून’ मातृभाषेतून शिक्षण आणि शाळा-संकुलाच्या संकल्पनेतून आत्मनिर्भर विद्यार्थी घडविण्यासाठी व्यवसायाभिमुख शिक्षणाचे केंद्र म्हणून या दोन्ही शाळा ओळखल्या जाव्या अशा रीतीने मार्गक्रमण करण्याचा समितीचा संकल्प आहे.