मुंबई : निवडणूक आयोगाचा निकाल एकनाथ शिंदेच्या बाजूने लागला आणि सर्वच राजकीय गणित बदलून गेली. एकनाथ शिंदेना धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचे नाव मिळाल्यावर आधी विधीमंडळातले पक्ष कार्यालय ताब्यात घेतले आणि आता विधान परिषदेतही विप्लव बजोरिया यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केली आहे.
सभागृहात प्रतोदचा व्हिप हा महत्वाचा असतो. विधान परिषदेत उद्धव ठाकरे आमदार आहेत. त्यामुळे आता या एकनाथ शिंदेंचे प्रतोद विप्लव बजोरिया यांच्या व्हिपचे उद्धव ठाकरेंनाही ऐकायला लागेल का? याचीच चर्चा जास्त आहे.
राज्यात ठिकठिकाणी शिवसेना आणि ठाकरे वाद पाहायला मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयात अद्याप सुनावणी सुरु आहे. निवडणूक आयोगानं निकाल दिल्यानंतर शिंदेनी विधीमंडळातलं कार्यालयही ताब्यात घेतलं . विधानसभेतले ४० आमदार शिवसेनेसोबत आहेत तर विधान परिषदेतले एक आमदार शिवसेनेत आहेत. त्यामुळे विधानसभेनंतर शिवसेनेने बजोरियांना प्रतोद म्हणून नेमले आणि ठाकरेंची अडचण करून ठेवली आहे.
कोर्टातल्या युक्तीवादानंतर दोन आठवडे ठाकरे गटाच्या आमदारांवर व्हिपमुळे कारवाई होणार नाही पण दोन आठवड्यानंतर शिवसेनेचे विधानसभा आणि विधानपरिषदेतील प्रतोद भरत गोगावले आणि विप्लव बजोरिया हे ठाकरे गटाच्या आमदारांना कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहेत.