बीड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत. मात्र, यंदाच्या परीक्षेत बोर्डाकडून वारंवार होणाऱ्या चुका काही कमी होण्याचे नाव घेत नाही. इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चक्क उत्तर छापून आल्यानंतर हिंदीच्या पेपरमध्ये चूक आढळून आली होती. आता बीडच्या अंबाजोगाई येथील परीक्षा केंद्रात पेपर देण्यासाठी आलेल्या मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना चक्क इंग्रजीमधून प्रश्नपत्रिका मिळाली. ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला. तसेच सेंटर चालकांवर इंग्रजी प्रश्नपत्रिका मराठीत भाषांतर करून देण्याची वेळ आली.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी बारावीचा कॅम्पुटर टेक्निक नावाचा पेपर होता. मात्र, अंबाजोगाई येथे परीक्षा केंद्रात मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना चक्क इंग्लिश माध्यमाची प्रश्नपत्रिका मिळाली. हे पाहून सर्व विद्यार्थी गोंधळून गेले. त्यांनी त्वरीत संबंधित शिक्षकांना याची माहिती दिली. मात्र, आता करायचे तरी काय? असा प्रश्न सेंटर चालकांसमोर पडला.
विद्यार्थ्यांचे भविष्याचा विचार करता त्यांनी इंग्रजी प्रश्नपत्रिका मराठीत भाषांतर करून विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी दिली. अशा पद्धतीने अंबाजोगाई परीक्षा केंद्रात कॅम्पुटर टेक्निकचा पेपर देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा पार पडली.
दरम्यान, बोर्डाच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांना काही गुण मोफत मिळत असले तरी त्यांचा वेळ वाया जातो आहे. यामुळे बोर्डाने चुकांकडे गांभीर्याने बघणे महत्त्वाचे आहे. बारावी बोर्डाच्या परीक्षेत वारंवार होत असलेल्या चुकांमुळे पालगवर्गाकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे.