मराठी राजभाषा दिनानिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे मराठी माणसांना साद घालणारे पत्र
मुंबई : २७ फेब्रुवारी म्हणजे मराठी राजभाषा दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी राजभाषा दिनाच्या लोकांना शुभेच्छा देत लोकांना पत्र लिहिले आहे. मराठी जगाची ज्ञानभाषा व्हावी आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडावा हे आपले स्वप्न असायला हवे. हे स्वप्न वास्तवात यावे, अशा शुभेच्छा राज यांनी पत्रातून दिल्या आहेत.
मराठी भाषा, मराठी भाषेची अस्मिता, मराठी भाषेचे जतन यासाठी नेहमी राज ठाकरे अग्रेसर होते. मराठी भाषेला जपण्याची सुरवात ही स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. मराठी भाषेबद्लचा त्यांचा लढा आता राज ठाकरे पुढे नेत आहे.
‘… मराठी जगाची ज्ञानभाषा व्हावी आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडावा हे आपलं स्वप्न असायला हवं. हे स्वप्न वास्तवात यावं, ह्याच मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा !’ #मराठीराजभाषादिन #MarathiRajbhashaDin pic.twitter.com/a82MFIyveS
— Raj Thackeray (@RajThackeray) February 27, 2023
राज ठाकरे यांनी वेळोवेळी मराठी भाषेविषयी त्यांच्या मनात असलेले प्रेम दाखवून दिले. एवढंच काय तर प्रत्येक मराठी माणसाला मराठी आली पाहिजे, असा अट्टहास त्यांनी धरला. मराठी भाषा जपण्यासाठी, मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा’ दर्जा मिळण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले.
व्यवहारात मराठी, प्रशासनात मराठी, दूरसंचार माध्यमांमध्ये मराठी, दूरदर्शनच्या समालोचनात मराठी असायलाच हवी, असं त्यांचं ठाम मत होतं त्यासाठी त्यांनी अनेकदा ठोस पावले उचलली. मराठी जगाची ज्ञानभाषा व्हावी आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडावा हे आपले स्वप्न आहे, असे राज ठाकरे नेहमी बोलतात.
सर्व दुकानं, आस्थापने आणि कार्यालयांवरील नामफलक अर्थात पाट्या या मराठीत असाव्यात, असा त्यांचा नेहमी आग्रह होता व आहे. मराठी भाषा, मराठी भाषेची अस्मिता जपली पाहिजे आणि मराठी माणूस आणि मराठी माणसाला त्याचे सर्व हक्क मिळायला पाहिजे, यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात.
राज ठाकरेंनी लिहिलेले पत्र वाचा जसेच्या तसे…
सर्वप्रथम मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा
कुसुमाग्रजांच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाला अभिवादन म्हणून तेव्हांच्या सरकारने कुसुमाग्रज जयंती २७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित केला. पण नेहमीप्रमाणे सरकारी उदासीनतेत तो साजरा व्हायचा. कुठल्याही राजकीय पक्षाला देखील तो साजरा करायची इच्छा नव्हती. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तो सार्वजनिक स्वरुपात अत्यंत उत्साहात साजरा करायला सुरुवात केली.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून पत्रव्यवहार करणारा पहिला पक्ष पण आमचाच. हे सगळे सांगायचा उद्देश इतकाच की, आपल्या भाषेसाठी, आपल्या सणांसाठी, आपल्या संस्कृतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून इतर एकही पक्ष हिरारीने पुढे आलेला नाही आणि सध्या जी एकूणच राजकीय दंगल सुरू आहे त्यात कुणी येईल अशी शक्यता वाटत नाही.
असो, त्यामुळेच आजच्या दिवशी आपल्या लाडक्या मराठी भाषेच्या गौरव दिनानिमित्त शुभेच्छा देताना या भाषेसाठी आपल्याला सगळ्यांना उभे राहावं लागणार आहे. हे भान सोडून चालणार नाही. व्यवहारात मराठी असावी. प्रशासनात मराठी असावी इथपासून ते अगदी दूरसंचार माध्यमांमध्ये. दूरदर्शनवरील समालोचनात, अभिजात भाषेच्या दर्जासाठीही आम्ही संघर्ष केला आणि पुढे देखील करू. पण त्यासाठी आमच्या संघर्षाला तुमची साथ हवी तरच हे शक्य आहे. मला माहिती आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनच तुमच्या सगळ्या बाबतीत अपेक्षा असतात पण या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुमच्या साथीचीही नितांत गरज आहे. आपण मराठी एकत्र असू तर सर्वत्र मराठी करायला क्षणाचाही विलंब लागणार नाही.
मी माझ्या विकास आराखड्यात म्हणले आहे तसं मराठी जगाची ज्ञानभाषा व्हावी आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडावा हे आपले स्वप्न असायला हवं हे स्वप्न वास्तवात यावं ह्याच आजच्या दिवसाच्या शुभेच्छा..!
आपले नम्र
राज ठाकरे