Thursday, March 20, 2025
Homeताज्या घडामोडीमहाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला, त्यावर गुढीपाडव्याला बोलणार

महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला, त्यावर गुढीपाडव्याला बोलणार

राज ठाकरेंची तोफ शिवतिर्थावर धडाडणार

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी बंडाचा झेंडा फडकवल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी घडत आहेत. सध्या कुठला आमदार कुठल्या पक्षात आहे हेच कळत नाही. पूर्वी सगळ्या गोष्टी आमने-सामने व्हायच्या. असा महाराष्ट्र कधीही नव्हता. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे, अशी खंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली. तसेच या साऱ्या राजकीय परिस्थितीवर २२ मार्चला गुढीपाडव्याच्या सभेत सिनेमा दाखवणार आहे, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यामुळे आता या सभेत ते काय बोलणार, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

दरम्यान, शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील गटाला मोठा धक्का बसला आहे. या घडामोडींबाबत आज एका मुलाखतीमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांना विचारले असता त्यांनी महाराष्ट्रात सध्या हे जे काही चालू आहे त्यावर मी २२ तारखेला शिवतीर्थावर गुढीपाडव्यादिवशी सविस्तर बोलणार असल्याचे सांगितले.

हे पण वाचा – …तरच हे शक्य आहे

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज पनवेलमध्ये आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी विविध मुद्द्यांसोबत राज ठाकरेंनी शिवसेनेतील फूट आणि महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीबाबत संक्षिप्त भाष्य केले. यावेळी मनसेचा एकच आमदार आहे. त्याने पक्ष आणि चिन्हावर दावा केला, तर काय निवडणूक आयोग काय करणार, या अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता, राज ठाकरे म्हणाले की, काय आहे ना की, म्हातारी मेल्याचं दु:ख नाही पण काळ सोकावतो.

महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही घडलंय. शिवसेनेचं नावं, पक्षचिन्ह गेलं, हे दुर्दैवी झालं की चांगल्या माणसांच्या हातात शिवसेना गेली, काय वाटतं? असं विचारलं असता राज ठाकरे म्हणाले की, टिझर ट्रेलर नाही २२ तारखेला सिनेमाच दाखवणार, मी आता या विषयावर बोलणार नाही,’’असे राज ठाकरे म्हणाले.

परवा मी बाळासाहेबांच्या फोटोच्या अनावरणासाठी विधिमंडळामध्ये गेलो. तिथे सगळे आमदार समोर बसले होते. त्यातील कोण कुठल्या पक्षातील आहे हेच कळत नव्हतं. एखाद्या आमदाराने ओळख करून दिली तर तू कुठल्या पक्षातला, असं विचारावं लागतं. मला राजू पाटीलला ही विचारून पाहायचे आहे. पक्ष घेता का म्हणून? दिवसरात्र आम्ही बरनॉल लावत असतो. आमचे जे जळते आहे, ते तुम्हाला कळणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

राज ठाकरे म्हणाले की, सध्या वर्तमानपत्र मीच वाचत नाही. चॅनल, वर्तमानपत्रे जाहिरातीवर चालतात. वर्तमापत्र काढण्याचे आता बघू पुढे. मराठी नियतकालिके बंद पडत असल्याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली. मराठी माणसांनी मोठ्या प्रमाणात वाचन वाढवले पाहिजे. वर्तमानपत्रे, मासिक, साप्ताहिके जगवली पाहिजे. त्या लोकांनीही तसा खुराक दिला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

सध्या सगळ्या गोष्टी मोबाइलवर मिळत आहेत. मी खरेच सांगतो. मी खूप वाचतो-बिचतो नाही. मात्र, वाचले पाहिजे. नाही तर विचारांना तोकडेपणा येतो. मुलांशी बोलताना त्यांना आपल्या आई-वडिलांकडे विचारांचा तोकडेपणा आहे, असे कळले की ते बाहेर शोधतात, असे निरीक्षणही राज ठाकरे यांनी नोंदवले.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, तुमची मुळात ओळख काय? मी कोणय? तुम्ही कोण आहात? तर तुम्ही मराठी आहात. मराठी म्हणजे कोण? तर मराठी भाषा बोलणारा व्यक्ती आहे. भाषा तुमची ओळख असते. त्यामुळे तुम्ही जगात ओळखले जाता. मी फ्रान्समध्ये राहतो. त्याला अर्थ नाही. मला फ्रेंच बोलता आले पाहिजे, असे उदाहरणही त्यांनी दिले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -